Maharashtr Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट केले आहे. मध्य प्रदेशातील भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांवर भष्टाचाराचे आरोपही केले. त्यामध्ये शरद पवार यांच्यावरही मोदींनी जोरदार टीका केली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राज्याच्या राजकारणात 2019 मध्ये निवडणुकीनंतर झालेला पाहटेचा शपथविधी शरद पवार यांच्या संमतीनेच झाला होता. पवारांनी आमचा डबलगेम केला त्यामुळेच आमचे सरकार येऊ शकले नाही. सगळी चर्चा शरद पवारांशीच झाली होती, असा गौप्यस्फोट केला. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'पुलोद' सरकारच्या प्रयोगावरही फडणवीसांना निशाणा साधला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात पवार विरिद्ध फडणवीस असा सामना रंगला.
मात्र, नरेंद्र मोदी यांनीही पहिल्यादाच थेट राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर टीका केली. शरद पवार यांना लक्ष्य केले. मात्र, आताच का भाजपाने (BJP) पवारांना टार्गेट केले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पाटण्यातीमध्ये देशातील 16 विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे हजर होत्या. पाटण्यातील बैठकीमध्ये सर्व विरोधकांना एकत्र करण्यामध्ये शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. सगळ्या विरोधकांना देश पातळीवर एकत्र ठेवायचे असेल तर पवार महत्त्वाचे आहेत.
महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये पवार हेच मुख्य होते. पवार यांच्यामुळेच काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ शकली. त्यामुळे देश पातळीवरही पवार महाविकास आघाडीचा प्रयोग करु शकतात. विरोधकांची एकी झाली तर भाजपाला 2024 ची लोकसभा निवडणूक जड जाऊ शकते. यामुळे पवार यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असावा अशी एक चर्चा आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी पवार म्हणाले, पाटण्याला देशातील सोळा राजकीय पक्षांची बैठक झाली. ही बैठक झाली तेव्हा प्रधानमंत्री अमेरिकेत होते. त्यांना बैठकीची माहिती कळल्यानंतर त्यांची अस्वस्थता वाढलेली दिसते. त्यामुळे व्यक्तिगत हल्ले करण्यास त्यांनी सुरुवात केली असावी.
देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर उत्तर देताना पवार म्हणाले, २०१४ च्या निवडणुका झाल्यानंतर भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा घेतलेली होती. २०१९ ला फडणवीस भेटले त्यात अनेक गोष्टींवर चर्चा झाली. त्यांनी सांगितले की पवार साहेबांनी धोरण बदलले. मी धोरण बदलले तर नंतर दोन दिवसांनी शपथ घेण्याचे कारण काय होते किंवा अशी चोरून पहाटे शपथ का घेतली?
त्यांच्या शपथविधीनंतर दोन दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला. याचा स्पष्ट अर्थ आहे की सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, आम्ही किती अस्वस्थ आहोत, ही त्यांची अस्वस्थता महाराष्ट्रासमोर यावी, यादृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या. माझे सासरे सदू शिंदे हे देशातील उत्तम बॉलर होते. त्यांनी गुगलीने अनेक मोठमोठ्या लोकांच्या विकेट घेतल्या होत्या. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे गुगली कशी टाकायची आणि कुठे टाकायची हे माहिती होते. विकेट दिली तर ती घेतलीच पाहिजे. पण विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून सांगतो का? असा टोला लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.