Radheshyam Mopalwar : राधेश्याम मोपलवारकडे 3000 कोटी आले कसे? कारनाम्यांची A टू Z कहाणी

Radheshyam Mopalwar samruddhi mahamarg work corruption : राधेश्याम मोपलवार यांनी त्यांच्या 26 वर्षांच्या सेवा काळात 3000 कोटी रुपयांची माया जमवल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला
Radheshyam Mopalwar
Radheshyam MopalwarSarkarnama

Radheshyam Mopalwar : एक आयएएस अधिकारी 26 वर्षांच्या सेवा काळात किती कोटी कमावू शकतो? स्वत:च्या नावावर 1500 कोटी, दुसऱ्या बायकोच्या नावावर 150 कोटी, तिसऱ्या बायकोच्या नावावर 300 कोटी. थांबा अजून यादी संपलेली नाही.पहिल्या मुलीच्या नावावर 500 कोटी, दुसऱ्या मुलीच्या नावावर 350 कोटी आणि भावाच्या नावावर 200 कोटी रुपयांची संपत्ती. म्हणजे एकत्रित आकडा मिळून ही रक्कम होते तब्बल 3000 कोटी! या सरकारी अधिकाऱ्याचं नाव आहे राधेश्याम मोपलवार. हा अधिकारी इतक्या साऱ्या संपत्तीचा मालक बनला तरी कसा?

समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी त्यांच्या 26 वर्षांच्या सेवा काळात 3000 कोटी रुपयांची माया जमवल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. राधेश्याम मोपलवार यांनी तर अदानी आणि अंबानींनाही मागं टाकलंय, असं म्हणत शिवसेनेचे आमदार विकत घ्यायला मोपलवारांच्या पैशांचा वापर केला गेला का? असा खडा सवाल रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांनी तर राधेश्याम मोपलवार यांच्या घरातील कोणत्या सदस्याच्या नावावर किती संपत्ती आहे, याची यादीच जाहीर केली.

घरातील सदस्यांच्या नावे किती संपत्ती?

राधेश्याम मोपलवार यांच्या नावावर 1500 कोटी, दुसऱ्या बायकोच्या नावावर - 150 कोटी, तिसऱ्या बायकोच्या नावावर 300 कोटी, पहिल्या मुलीच्या नावावर - 500 कोटी, दुसऱ्या मुलीच्या नावावर 350 कोटी, भाऊ सदानंद मोपलवार यांच्या नावावर 200 कोटी एकत्रित रक्कम एकूण 3000 कोटी!

राधेश्याम मोपलवार यांनी आयएएस म्हणून 26 वर्षे सेवा बजावली खरी पण या 26 वर्षांत कुंपणानंच शेत खाल्ल्याचा प्रकार आता समोर आलाय. मोपलवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिलं आहे. त्यांच्याच देखरेखीखाली समृद्धी महामार्गाची बांधणी झाली आणि त्यांनी स्वत:च्या 'समृद्धी'त वाढ केली. राधेश्याम मोपलवार हे आजच्या घडीला देशातील श्रीमंत सरकारी अधिकारी म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान मोदींनी देखील राधेश्याम मोपलवार यांच्यावर कारवाई करा, असं सांगितलं होतं मात्र 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तात्पुरती कारवाई करुन नंतर थेट मोठी जबाबदारी टाकली.

Radheshyam Mopalwar
Eknath Shinde Goverment : शिंदे सरकारच्या आणखी एका मंत्र्याचा पाय खोलात? कंत्राटं देताना नियम,कायदे पायदळी?

मोपलवार निवृत्त झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉररुमचे प्रमुख हे कसं काय? याकडंही रोहित पवार यांनी लक्ष वेधलं. राधेश्याम मोपलवार यांची भारत आणि भारताबाहेर मिळून एकूण 3000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. समृद्धी महामार्गाच्या कामाबाबत 4 महिन्यात पुन्हा टेंडर काढण्यात आलं आणि त्यात वाढीसाठी मंजुरीही देण्यात आली. त्यानंतर हे टेंडर 55 हजार कोटींवर गेलं. त्यामुळं समृद्धी नेमकी कुणाची झाली? सर्वसामान्य माणसाची झाली की अधिकाऱ्यांची हे यातून कळून येतं, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक 11 चं काम गायत्री प्रोजेक्टला देण्यात आलं. हे टेंडर 1900 कोटी रुपयांचं होतं. पुढं 2021 मध्ये हे काम जमणार नाही, असं गायत्री प्रोजेक्टकडून सांगण्यात आलं. त्यानंतर हेच काम हुजूर मल्टी प्रोजेक्टला देण्यात आलं. आता ही हुजूर मल्टी प्रोजेक्ट कंपनी नक्की कुणाची? या कंपनीत एकूण 1 कोटी 52 लाखांचे समभाग आहेत. यापैकी 23 लाख समभाग हे दस्तुरखुद्द मोपलवार कुटुंबीयाकडं आहेत. राधेश्याम मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार हिच्याकडं हुजूर मल्टी प्रोजेक्ट कंपनीचे 3 लाख 98 हजार समभाग आहेत तर भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडं 23 हजार 645 समभाग आहेत शिवाय हुजूर मल्टी प्रोजेक्टचे 4 लाख 98 हजार समभाग असणारी मेलोरा इन्फ्रा कंपनी ही मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार यांची आहे.म्हणजे समृद्धीच्या कामातून मोपलवार यांनी स्वतःच्या कुटुंबासह कंत्राटदारांचं भलं केलं. या राधेश्याम मोपलवारांच्या नावावर घोटाळेच घोटाळे जमा आहेत.

मोपलवारांच्या नावावर घोटाळेच घोटाळे!

जालना- नांदेड या समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करताना एक हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी गेल्या वर्षी विधिमंडळ अधिवेशनात केला होता. या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी देखील गोरंट्याल यांनी केली होती. जालना-नांदेड या समृद्धी महामार्गाचा प्लॅन तीन वर्षांपूर्वी लिक झाला होता. हा महामार्ग होणार असल्याची कल्पना येताच काहींनी ग्रीन झोनमध्ये असलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात खरेदी केल्या आणि जमीन खरेदी केल्यावर त्या ठिकाणी रातोरात फळबागा दाखवत कोट्यवधी रुपये मिळवले.

तेलगी स्टँप पेपर घोटाळा

स्टँप पेपर घोटाळ्यातील तेलगी प्रकरणात देखील मोपलवार यांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीये. 1995 मध्ये स्टँप कार्यालयात अधीक्षक पदावर कार्यरत असताना आपणच अब्दुल करीम तेलगीला स्टँप आणि पेपर वेंडरचे लायसन्स दिल्याची कबुली मोपलवार यांनी कोर्टात दिली होती.

भ्रष्टाचाराचा आरोप : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

समृद्धी महामार्ग प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एका मध्यस्थामध्ये सेटलमेंट सुरू असल्याचं संभाषण होतं. या ऑडिओमध्ये समृद्धी महामार्गातीलजमीन लाटल्याचं देखील सांगितलं जात होतं. या ऑडिओ क्लिपवरून राज्य सरकारनं मोपलवार यांना एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन दूर केलं खरं मात्र त्यानंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनं मोपलवारांना क्लीन चीट दिली.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू प्रशासकीय अधिकारी म्हणून राधेश्याम मोपलवार यांची ओळख आहे, हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. मात्र सत्ता महायुतीची असो किंवा महाविकास आघाडीची सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर कायमच सत्ताध्याऱ्यांची मेहेरनजर राहिली आहे. निवृत्तीनंतर तब्बल सात वेळा मोपलवार यांना विक्रमी मुदतवाढ मिळाली. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या सर्वांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मोपलवारांना ही मुदतवाढ मिळाली होती हे विशेष! यालाच म्हणतात सत्ताधारी मेहरबान तो...! मोपलवार 2018 मध्येच हे निवृत्त झाले होते पण निवृत्तीनंतरही त्यांना तब्बल सात वेळा विक्रमी मुदतवाढ देण्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा काय उद्देश होता, अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक का करण्यात आली नाही, मोपलवारच का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं आता विचारण्यात येत आहेत.

राधेश्याम मोपलवार नेमके आहेत तरी कोण?

- नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याचे रहिवासी

- नांदेड येथे शिक्षण

-डाव्या पक्षाशी संबधित विद्यार्थी चळवळीत काम

- तत्कालीन मराठवाडा ग्रामीण बँकेत नोकरी

- एआयबीईए या डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटनेत सक्रिय

-एमपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

- 1995 मध्ये त्यांना IAS केडर मिळाले

- अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत

- नांदेडच्या गुरु-ता-गद्दी सोहळ्याशी संबंधित कामं मोपलवार यांच्याच देखरेखीखाली पूर्ण

- केंद्र सरकारच्या दोन हजार कोटींच्या निधीतून नांदेडमध्ये रस्त्यांसह विविध विकासकामं पूर्ण

- त्यानंतर रस्तेकामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित

- कोकणचे विभागीय आयुक्त, ठाण्याचे विभागीय आयुक्त म्हणून काम

- ठाणे विभागीय आयुक्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक

- दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही जवळीक

- भ्रष्टाचाराचे आरोप मात्र राज्यकर्त्यांच्या जवळीकीमुळं कठोर कारवाई नाही

- 2018 मध्ये सेवानिवृत्त

- त्यानंतर शासनाकडून मुदतवाढ, समृद्धी महामार्गाच्या कामाची सोपवण्यात आली जबाबदारी

(Edited By Roshan More0

Radheshyam Mopalwar
Video BJP Politics : शिंदे गटाला 70 तर भाजपला 160 जागा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर दबावतंत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com