सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार अशी चर्चा सुरू असलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीला हजेरी लावली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या बैठकीला त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली, त्यामुळे माजी आमदार पाटील यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याची चर्चा सोलापूरमध्ये रंगली आहे. (Rajan Patil attends NCP's meeting)
जयंत पाटील सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सायंकाळी सोलापुरात दाखल झालेल्या पाटील यांनी सोलापूर जिल्हा आणि शहर राष्ट्रवादीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला माजी आमदार राजन पाटील यांनी आवर्जून हजेरी लावली. एरवी त्यांच्या उपस्थितीची चर्चा रंगली नसतील मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः गेल्या चार दिवसांपासून पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे पाटलांची उपस्थिती विशेष ठरते.
‘राजन पाटील बोले आणि मोहोळ तालुका डोले’, अशी या तालुक्याची स्थिती काही दिवसांपर्यंत होती. मात्र, गेल्या पंचवार्षिकपासून त्यांना पक्षातील सहकारी तथा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्याकडून आव्हानाची भाषा बोलली जाऊ लागली. त्यामुळे एकमुखी कारभाराची सवय असलेल्या पाटील परिवाराला ते अडचणीचे वाटू लागले. राजन पाटील यांनी ही बाब पक्षश्रेष्ठींच्या दरबारात नेली. मात्र, श्रेष्ठींनी कान पिळताच मौन धारणारे उमेश पाटील पुन्हा काही दिवसांनी माजी आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शरसंधान साधत असायचे.
पक्षांतर्गत मिळणारे आव्हान, साखर कारखान्यासंदर्भातील काही प्रश्न आणि ‘नक्षत्र’बाबत सुरू असलेली चर्चा यामुळे पाटील हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यातूनच त्यांच्या चिरंजीवांच्या सोशल मीडियातील पोस्टमुळे राजन पाटील यांच्याबाबत राष्ट्रवादीत संशयाचे वातावरण तयार होत गेले. चार दिवसांपूर्वी त्यांनी केलेले विधानही पक्षांतरांच्या चर्चांना खतपाणी घालणारे होते. तसेच, त्यांच्या भाजप प्रवेशाची तारीख सांगितली जाऊ लागली. मात्र, त्यांचे विरोधक भाजप प्रवेशावरून त्यांची खिल्ली उडवत होते, त्यातच त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावल्याने राजन पाटील हे खरंच भाजपमध्ये जाणार की नुसताच धुराळा उडवणार, अशी चर्चा कालपासून सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.