Pune, 25 August : ज्येष्ठ नेते शरद पवार आज (ता. 25 ऑगस्ट) जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे पवारांना भेटले. आमदार अतुल बेनकेंना पवारांनी भेट नाकारली, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र, रिॲलिटी फॅक्ट काय आहे? ‘सरकारनामा’ने रिॲलिटी फॅक्ट समोर आणली आहे. पवारांच्या जुन्नर दौऱ्यात आमदार बेनकेंबाबत नेमकं काय घडलं, हे जाणून घेऊयात.
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात आज कृषी तंत्रज्ञान सादरीकरण कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे साडेनऊ वाजता कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. त्यानंतर पावणे दहाच्या सुमारास आमदार अतुल बेनके (Atul Benke) हे कृषी विज्ञान केंद्रात आले. पवार आणि बेनके परिवाराचे नाते हे राजकारणापलीकडचे आहे, त्यामुळे अतुल बेनके यांनी आल्यानंतर प्रथम शरद पवारांना वाकून चरणस्पर्श करत नमस्कार केला.
व्यासपीठावर शरद पवार यांच्याशेजारी जगनाथ शेवाळे बसले होते. त्यांच्या शेजारी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक देवदत्त निकम (Devdatta Nikam) हे बसले होते. अतुल बेनके आल्यानंतर देवदत्त निकम यांनी त्यांना बसण्यासाठी उठून जागा दिली. निकम यांच्या जागी आमदार बेनके हे बसले.
आमदार अतुल बेनके यांच्यानंतर या भागाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे साधारणपणे दहाच्या आसपास व्यासपीठावर आले. पवारांना नमस्कार करून तेही बसायला गेले. त्या वेळी त्यांना पवारांच्या शेजारी बसलेले कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी उठून जागा दिली.
सर्वांच्या उपस्थितींमध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचा कार्यक्रम झाला. तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार बेनके यांनी शरद पवारांचे स्वागत केले. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांसाठी घेत असलेल्या विविध योजनांची माहिती अध्यक्ष मेहेर यांनी दिली. केंद्राच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर शरद पवारांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्राचा हा सर्व कार्यक्रम सुमारे साडेदहाच्या सुमारास संपला. त्यानंतर शरद पवार हे ओतूर येथील नियोजित पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्याच पद्धतीने खासदार अमोल कोल्हे, अतुल बेनके हेही ओतूरच्या कार्यक्रमासाठी निघून गेले.
जुन्नरच्या दौऱ्यात आमदार अतुल बेनके यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट नाकारली. बेनके यांना ताटकळत ठेवले, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पवारसाहेबांनी भेट नाकारली, असा कोणताही प्रकार घडलेला नाही : बेनके
यासंदर्भात आमदार अतुल बेनके म्हणाले, नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमासाठी आणि ओतूर येथील तांबेंच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यासाठी शरद पवार आज जुन्नरच्या दौऱ्यावर आले होते. तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी साहेबांचे स्वागत केले. त्या ठिकाणी पवारसाहेबांशी माझा संवादही झाला. त्यात त्यांनी माझ्या आईची तब्येत कशी आहे? व इतर गोष्टींची चौकशी केली. मात्र, आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पवारसाहेबांनी मला भेट नाकारली, असा कोणताही प्रकार घडलेला नाही. त्यात कोणतेही तथ्य नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.