Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन जवळपास सव्वा महिन्याचा कालावधी लोटला आहे. या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे सध्या प्रचार शिगेला पोचला होता. दिवसेंदिवस राज्यातील तापमानासोबतच ऐन उन्हाळ्यात निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यापैकी सात मतदारसंघांतून विजयी होणारा उमेदवार प्रथमच संसदेत जाणार आहे. त्यात सोलापूर, रामटेक, चंद्रपूर, हिंगोली, जळगाव, अकोला व मुंबई उत्तर पूर्व या सात लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
या मतदारसंघातील उमेदवार नवखे आहेत तर काही जणांना आतापर्यंत एकदाही लोकसभेची निवडणूक जिंकलेली नाही. त्याशिवाय काही ठिकाणचे उमेदवार प्रथमच निवडणूक लढवत आहेत, तर काही ठिकाणी उमेदवारांमध्ये ज्येष्ठ आमदार व मंत्र्यांचा समावेश करण्यात आल्याने निवडणुकीत चुरस असणार आहे. (Lok Sabha Election 2024 News)
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantivar) विरुद्ध काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर (Parathiba Dhanorkar) अशी लढत होत आहे, तर रामटेकमध्ये शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार राजू पारवे विरोधात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे अशी लढत होत आहे.
हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम विरोधात ठाकरे गटाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर अशी लढत होत आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) व भाजपचे राम सातपुते या विद्यमान आमदार आमने-सामने उभे ठाकले आहेत.
त्यासोबतच जळगावमध्ये भाजपचे उमेदवार स्मिता वाघ यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्यात पहिल्यांदाच लढत होत आहे. अकोलामधून भाजपने अनुप धोत्रेंना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपने मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात मुंबई उत्तर पूर्व शिवसेना उमेदवार संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्याशिवाय मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार अद्याप उमेदवार ठरलेला नाही. त्याशिवाय मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. या ठिकाणी भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट केला तर या ठिकाणी नवख्या उमेदवारात लढत होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय जर नाशिकमध्ये हेमंत गोडसेंची उमेदवारी कापली तर या ठिकाणी नवख्या उमेदवारात लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणाहून संसदेत पहिल्यांदा कोण पोचणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
R