Mumbai News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक महिने एसटी आंदोलन आणि संप सुरु होता. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar),तर कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केले होते. पण आता महायुती सरकारच्या काळात पुन्हा एकदा एसटी कर्मचार्यांचा विलिनीकरणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
एसटी कामगारांच्या संपाला विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर- सदाभाऊ खोत यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यव्यापी एसटी आंदोलनाने महाविकास आघाडी सरकारविरोधात रान पेटवणारे खोत - पडळकर आता महायुती सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने मंगळवारी(ता.3) बेमुदत संपाची हाक दिली आहे.त्यामुळे ठिकठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलन केले जात आहे.त्याचा मोठा फटका राज्यभरातील प्रवाशांना बसताना दिसून येत आहे.ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने प्रवाशांना विशेषत: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी बुधवारी(ता.4) बैठक बोलवलेली आहे.आता एसटी कामगारांच्या संपावर आज तोडगा निघणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, एकीकडे या आंदोलनावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात सीएम शिंदे आहे.अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे लाडके नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे मात्र सरकारविरोधातच उभे ठाकणार आहे.एसटी कामगारांच्या संपाबाबत दोन आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारची चांगलीच झोप उडवली होती. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणासह एकूण 16 मागण्यांसाठी पडळकर आणि खोत यांनी आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडले होते.
त्यानंतर या आंदोलनाचं नेतृत्व गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते. जवळपास सहा महिने एसटी कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्हवर ओक या निवासस्थानापर्यंत या आंदोलनाची झळ पोहचली होती.
आता पुन्हा एकदा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनात उतरणार आहे. यासोबत सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना सुध्दा आंदोलनात सहभागी होणार आहे. रात्री 12 पासून चक्काजाम करून संप करावा, आम्ही पाठिशी आहोत, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी बेमुदत संपाची हाक देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहेत.
पडळकर यांनी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांनीही पगार देण्यात यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे.एसटी महामंडळाचं विलिनीकरण करता येणं शक्य आहे की नाही याची स्पष्टता कामगारांना हवी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगार संप आणि सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले,गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील पारंपारिक सण आहे.मग लोकांना असे वेठीस पकडणे कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच एसटी कामगारांना योग्य तो न्याय मिळावा हीच भूमिका सर्वांची आहे. पडळकर, खोत यांच्याशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील.सरकार सकारात्मक असताना आंदोलन कशाला हवे? असेही सामंत यावेळी म्हणले.
महाविकास आघाडी सरकारविरोधात उभे ठाकलेले पडळकर आणि खोत सध्या सत्तेत सहभागी असूनही या एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा दर्शवला आहे.यामुळे विरोधकांना शिंदे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आयते कोलीत मिळण्याची शक्यता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.