अभिनेता Sushant Singh याची आत्महत्या की मृत्यू हा पुन्हा राजकीय मुद्दा होऊ पाहत आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीच जाहीरपणे यात आरोप केल्याने पुन्हा राळ उठली आहे. त्यांच्याकडे इतकी महत्वाची माहिती होती तर त्यांनी ती या आधीच सीबीआयला का दिली नाही, अशी शंका व्यक्त होत आहे. पण आता तरी त्यांनी ती द्यावी आणि एखाद्या अभिनेत्याच्या मृत्यूचा बनलेला हा राजकीय खेळ थांबवावा, अशी अपेक्षा असणे चुकीची नाही.
महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आता हा रोजचाच तमाशा झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत सकाळी नऊ वाजता बोलणार.. त्यानंतर किरीट सोमय्या त्याविरोधातील तुणतुणे वाजवणार. अतुल भातखळकर राऊतांना सल्ला देणार. भातखळकरांना किशोरी पेडणेकर बोलून न बोलल्यासारखे करणार. राऊत पुन्हा गंभीरपणे फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना ओरखडे काढणार. फडणवीस मग राणेंना पुढे करणार. राणे मातोश्रीविरुद्ध आदळआपट करणार. राऊत मग पुन्हा ठाकरेंच्या वतीने उत्तर देणार. नवाब मलिकही आपल्यापरीने मग यात मुद्दे मांडणार आणि चक्र आलटून किंवा पालटून सुरूच राहणार. गेल्या अडीच वर्षांत हे सातत्याने घडत आहे.
ही नेते मंडळी एकमेकांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे, खूनाच्या घटनेचे इतके पुरावे असल्याचा दावा करतात की जणू काही सारा निकाल लागलेला आहे. फक्त समोरच्याला शिक्षा होण्याचेच बाकी आहे, असा अविर्भाव असतो. काही मोठ्या खूनांच्या प्रकरणातही अशी काही वक्तव्ये केली जात आहेत की जणू काही आपली डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. त्याला असे उत्तर दिले जात आहे की जणू राऊतांची साॅलिसिटर फर्म आहे.
राणे काय म्हणाले?
अभिनेता सुशांतसिंह आणि दिशा सलीयान यांच्या आत्महत्या नसून त्या हत्याच असल्याचा आरोप पुन्हा नारायण राणे यांनी केला आहे. त्यातील काही दुवे त्यांनी मांडले आहेत. सलीयान हिच्यावर तर बलात्कार झाल्याचेच त्यांनी म्हटले आहे. या वेळी कोणत्या मंत्र्याची गाडी होती? तेथील सोसायटीचे रजिस्टर कसे फाडण्यात आले? तिचा पोस्टमाॅर्टेम रिपोर्ट अद्याप का आला नाही, असे अनेक संशय व्यक्त करणाऱ्या बाबी मांडल्या. खरे तर या प्रकरणी दिशाच्या घरच्यांनी आणि पोलिसांनीही ती आत्महत्या असल्याचे अनेकदा सांगितले आहे. तरी राणेंचा त्यावर विश्वास नसावा.
सुशांतसिंहच्या प्रकरणातही तसेच घडले आहे. सीबीआयकडे तपास देऊनही त्यावर ठोस असा प्रकाश दोन वर्षांनंतरही पडला नाही. रिया चक्रवर्तीचे नाव घेतले गेले. पण तिला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक झाली. थेट सुशांतसिंहच्या आत्महत्येला तिच कारणीभूत आहे, असा ठोस निष्कर्ष सीबीआय काढू शकली नाही. दिशावर बलात्कार झाल्याचे सुशांतला माहीत होते. तिच्यावर अन्याय करणाऱ्यांना सोडणार नाही. हे तो काही ठिकाणी बोलला होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यात आला, अशी थिअरी राणे यांनी मांडली आहे. दोन वर्षे तपास करूनही सीबीआयला जे कळाले नाही त्याचा राणेंना घरासंदर्भात नोटीस आल्यानंतर साक्षात्कार झाला, असेच म्हणावे लागेल.
मुंबई पोलिसांनी या केसचा आधी तपास केला. सीबीआयकडे ही केस दोन वर्षे होती. तरीही त्यात ठोस निष्कर्ष निघू शकला नाही. सीबीआयने दिशाच्या आत्महत्येचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी लावलेला नाही. तरी राणेंनी तो संबंध कशाच्या आधारे जोडला, याचे उत्तर आता सीबीआयलाच द्यावे लागेल. सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी राणेंना कशासाठी फोन केला, याचाही उलगडा या निमित्ताने सीबीआयने करावा. कारण नार्वेकर, राणे आणि सुशांतसिंह मृत्यू याचा संबंध सीबीआयने पुढे काढण्याची गरज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.