

जयसिंगपूरच्या या कन्येने सातासमुद्रापार आपला ठसा उमटवत पुन्हा एकदा जयसिंगपूरचे नाव उज्ज्वल केले आहे. उर्मिला अशोक पुरंदरे – अर्जुनवाडकर यांची अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील होपवेल टाउनशिप येथे उपनगराध्यक्षपदी फेरनिवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण आहे.
उर्मिला अर्जुनवाडकर यांचा जन्म, बालपण आणि शिक्षण जयसिंगपूरमध्येच झाले. जनार्दन अर्जुनवाडकर यांच्या त्या कन्या आहेत. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आणि समाजाभिमुख विचार असलेल्या उर्मिलांनी पुढील शिक्षणानंतर अमेरिकेची वाट धरली. गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ त्या न्यू जर्सीतील एका नामांकित औषधनिर्मिती कंपनीत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती डॉ. अशोक विनायक पुरंदरे हे वैद्यकीय क्षेत्रात कार्य करतात.
व्यावसायिक यशासोबतच सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. होपवेल टाउनशिपमध्ये त्यांनी चार वर्षे नगरसेविका म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. २०२४ मध्ये त्यांची पहिल्यांदा उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि नेतृत्वगुणांचा विचार करून यंदाही त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आरोग्य सेवा, शाश्वत पर्यावरण विकास, पर्यावरण संवर्धन आणि शहर संरचना या महत्त्वाच्या विभागांमध्ये उल्लेखनीय काम केले. कोविडनंतर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी योग्य नियोजन, आरोग्यविषयक उपाययोजना आणि जनजागृतीवर भर दिला. औषध क्षेत्रातील अनुभवामुळे आरोग्याशी संबंधित निर्णय अधिक प्रभावीपणे राबवता आले, याचा थेट लाभ स्थानिक नागरिकांना झाला.
अमेरिकेसारख्या प्रगत देशात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महत्त्वाच्या पदावर एका मराठी महिलेची फेरनिवड होणे ही केवळ त्यांची वैयक्तिक यशोगाथा नाही, तर जयसिंगपूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. कष्ट, चिकाटी आणि समाजसेवेच्या जोरावर उर्मिला अर्जुनवाडकर यांनी जागतिक व्यासपीठावर जयसिंगपूरचा डंका वाजवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.