Vidhan Sabha Election 2024 : नव्या समीकरणांची चाहूल...

Maharashtra Assembly Elections 2024: प्रत्येक विभाग व मतदारसंघातील राजकीय, सामाजिक घटक राजकीय पक्षांशी कसा व्यवहार करतील त्यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
Vidhan Parishad Election 2024
Vidhan Parishad Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक व आचारसंहिता दहा ते पंधरा दिवसांत कधीही लागू शकते. त्यादृष्टीने सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण होत आल्याचा बातम्या आहेत. गतपंधरवडा पितृपक्षाचा होता. त्यामुळे राजकीय घटना-घडामोडी फारशा काही घडल्या नव्हत्या. त्या आता वेगवान होतील.

राज्याच्या राजकीय प्रवासात गेली पाचही वर्षे विविध राजकीय घटनांनी उलथापालथीची ठरली. तीस वर्षांपासून सोबत असलेली भाजप-शिवसेनेची आघाडी फुटली. या फुटीतूनच पुन्हा दोन वर्षांनंतर एक व नंतर एक अशा दोन फूट घडून आल्या. आधी शिवसेना व नंतर राष्‍ट्रवादी काँग्रेस या पक्षांची दोन शकले झाली. ही फाटाफूट कशी घडली, कुणी घडवली हे सर्वश्रुत आहे.

या फाटाफुटीनंतरचे राजकारणही सर्वांना माहीत आहे. या गदारोळात पाच वर्षांत आलेली दोन्ही सरकारे आपल्या आश्वासनांना विसरली. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सरकारचा बहुतेक कालावधी कोविडची साथ आटोक्यात आणण्याच्या बंधनामुळे बंदिस्त अवस्थेत गेला. तर विद्यमान एकनाथ शिंदेंच्या महायुती सरकारलाही आश्वासनपूर्तीसाठी इतर कारणांनी कमी वेळ मिळाला.

Vidhan Parishad Election 2024
Rahul Gandhi in kitchen - Video : अन् राहुल गांधी म्हणाले 'मी जास्त तिखट खात नाही'

लोककल्याणकारी योजनांवर भर-

राजकीय पक्षांच्या साठमारीने जनतेला उबग आला होता. लोकसभेत सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या सत्तेचा फायदा घेत आपल्या अटीशर्तींवर निवडणूक लावता येईल व ती जिंकताही येईल, या आत्मविश्वासाने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती कामाला लागली आहे. त्यादृष्टीनेच हरियानासोबत निवडणूक न लावता अजून तयारीसाठी महायुतीने वेळ घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसा आरोप विरोधक करत आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवक कार्य प्रशिक्षण मोहीम, शेतीपंपांना मोफत वीज यांसारख्या लोककल्याणकारी योजनांवर स्वार होऊन पुन्हा सत्ता प्राप्त करता येईल, असे आडाखे मांडले जात आहेत. अशा लोकप्रिय योजना जाहीर करून मते मिळविण्याची सवय महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना कधी नव्हती. दाक्षिणात्य राज्यात हा प्रघात होता.

तो आता आपल्याकडेही बेमालूमपणे सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने पुन्हा तीच गत विधानसभेत होऊ नये, या काळजीने महायुती कामाला लागली आहे. भाजपचे चाणक्य अमित शहा राज्यात तळ ठोकून महायुतीची मोट मजबूतपणे आवळताना दिसत आहेत. त्यांनी राज्याच्या पाचही विभागांत जाऊन बैठका घेतल्या.

महायुतीतील जागावाटपाचे गणित नीट सुटले तर विधानसभेचे गणित नीट सुटू शकते, याची खात्री असल्याने भाजप काळजी घेत आहे. गेल्या कांही महिन्यांपासून महायुती जोरात कामाला लागलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा(Modi) दौरा, लाडकी बहीण योजना लाभार्थी मेळावे याद्वारे मतदारांशी सकारात्मक संवाद साधण्यात आला.

दोन्ही आघाड्यांना समन्वयाचे आव्हान -

महायुतीतील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अनेक नेते मूळ राष्ट्रवादी पक्षात चालले असल्याने त्याची चिंता त्यांच्या पक्षाबरोबरच महायुतीलाही लागली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तीनपैकी राष्ट्रवादी कॉँग्रेसची कामगिरी खूपच खालावलेली होती.

त्यातच अजित पवार यांच्यामुळे महायुतीला पराभव पत्करावा लागल्याचा समज महायुतीतही पसरविला गेला. अजित पवार महायुतीत राहतात की जातात, याची चर्चा घडून आली. या चर्चेचे खंडन करण्यात आल्याने ती चर्चा हवेतच विरली.

आता पुन्हा महायुतीच्या समन्वयाच्या बैठकांनी वेग घेतला असला तरी महायुती एकजिनसीपणे मतदारांना सामोरी जाणार का, हा प्रश्नच आहे. महाविकास आघाडीतही सर्व काही आलबेल नाही.

शिवसेना उद्धव ठाकरे व काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेला वाद दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला. जागावाटप निश्चित झाल्याचे दावे केले जात असले तरी तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. ‘पहले आप’च्या धर्तीवर निवडणूक जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंत जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरू राहणार हे निश्चित.

Vidhan Parishad Election 2024
Kiren Rijiju News : ''..तर आमची सत्ता येईल, त्यानंतरच 'त्यांना' सत्तेत वाटा मिळेल'' ; रिजिजू यांचं पुण्यात वक्तव्य!

‘वंचित’ व आंबेडकरांचे दावे... -

प्रमुख राजकीय पक्षांच्या आघाड्यांची ही स्थिती असताना तिसरी आघाडी म्हणून गणल्या गेलेल्या परिवर्तन महाशक्तीचा एक मेळावा नुकताच संभाजीनगरला झाला. ही महाशक्ती महाविकास आघाडीची मते विभागण्यासाठी उभी राहिल्याची टीका होत आहे.

या गदारोळात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आपल्या अकरा उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली आहे. हे एकीकडे घडत असले तरी प्रकाश आंबेडकर आपला खेळ पुन्हा बिघडवू शकतात, त्यामुळे महाविकास आघाडीने पुन्हा त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा आंबेडकर यांच्याशी बोलणी होऊ शकतात तर आंबेडकर यांनीही भाजप वगळता इतर पक्षांसाठी आमची दारे खुली असल्याचे वक्तव्य केले आहे.

मात्र लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता आंबेडकर महाविकास आघाडीशी कितपत जुळवून घेतील हा प्रश्नच आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मोठ्या पक्षांबरोबरच छोट्या पक्षांच्या आघाड्याही तयार होतील. या आघाड्या सत्ताप्राप्तीजवळ जाणार नसल्या तरी मोठ्या पक्षांचे किंवा उमेदवारांची मते खेचू शकतात.

लोकसभेसारख्या निवडणुकीत उमेदवारांचे मताधिक्य घटले आहे. विधानसभेत तर चुरशीच्या लढती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने छोट्या पक्षांनाही मोठे महत्त्व मिळणार आहे. त्यातून नवी समीकरणे आकाराला येऊ शकतात. प्रत्येक विभाग व मतदारसंघातील राजकीय, सामाजिक घटक राजकीय पक्षांशी कसा व्यवहार करतील त्यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क : ९८८१५९८८१५

(Edited by - Mayur)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com