Abhijeet Patil In Trouble : पवारांच्या गाडीचे स्टेअरिंग हाती घेणारे अभिजित पाटील अडचणीत का आले? पाहा कारणे...

Vitthal Sugar Factory Issue : तब्बल 20 वर्षे बंद असलेला सांगोला कारखाना पाटील यांनी अवघ्या 35 दिवसांत सुरू केला होता.
Abhijeet Patil-Sharad Pawar
Abhijeet Patil-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : अभिजित पाटील... महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीतील बडे प्रस्थ... सर्वपक्षीय नेत्यांशी निकटचा सलोखा... त्याचीच साखर कारखानदारीत साम्राज्य उभे करण्यास मदत झालेली... बघता बघता या पंढरपूरच्या तरुण नेत्याने जवळपास पाच साखर कारखाने चालविण्याची किमया करून दाखवली. मात्र, हाच तरुण नेता सध्या राज्य सहकारी बँकेच्या भूमिकेमुळे अडचणीत सापडला आहे. (Why did Abhijeet Patil get into trouble?)

अभिजित पाटील यांच्याकडे सध्या राज्यातील पाच साखर कारखाने आहेत. धाराशिवच्या चोराखळीतील धाराशिव, नाशिकमध्ये एक, बीड जिल्ह्याच्या गेवराईत गणेश कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी कारखाने हे साखर कारखाने अभिजित पाटील यांच्या ताब्यात आहेत. यामध्ये तीन सहकारी, तर दोन खासगी कारखान्यांचा समावेश आहे. तब्बल 20 वर्षे बंद असलेला सांगोला कारखाना पाटील यांनी अवघ्या 35 दिवसांत सुरू केला होता. (Abhijeet Patil In Trouble)

पंढरपूर तालुक्यातील देगाव हे अभिजित पाटील यांचे गाव. सुरुवातीच्या काळात वाळू ठेकेदारीचा व्यवसाय केला. मात्र, नियमांचा भंग केल्याने त्यांना दहा वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. ते जवळपास तीन महिने तुरुंगात होते. त्या गुन्ह्यातून सुटका झाल्यानंतर अभिजित पाटील यांनी नवी भरारी घेतली. त्यासाठी सर्वपक्षीय राजकारण्यांशी असलेले संबंध कामी आले आणि पाटील यांची साखर कारखानदारीत एन्ट्री झाली. त्यासाठी आता सत्तेत असलेल्या एका मोठ्या पक्षाच्या नेत्याची त्यांना मदत झाली. त्यातून त्यांनी धाराशिव हा साखर कारखाना घेतला आणि अभिजित पाटील यांची साखर कारखानदारीत वाटचाल सुरू झाली.

धाराशिवपासून सुरू झालेला साखर कारखानदारीचा प्रवास विठ्ठलपर्यंत आला. एकामागून एक साखर कारखाने चालवायला घेणारे अभिजित पाटील यांची घोडदौड प्राप्तिकर विभागाच्या (इन्कमटॅक्स) नजरेत आली आणि ऑगस्टमध्ये 2022 मध्ये त्यांच्या घरावर, कारखान्यांवर आणि पंतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाचा छापा पडला. तब्बल दोन दिवस ही चौकशी सुरू होती. त्यावेळी विधान परिषदेतील भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे पाटील यांची विचारपूस करायला आले होते. पाटील यांना दरेकर यांच्या माध्यमातून मदत झाल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले हेाते.

दरेकर यांच्याशिवाय भाजपमधील अनेक बड्या नेत्यांशी पाटील यांचा संबंध आहे, अशी चर्चा त्यावेळी होत हाती. मात्र, राज्यात त्या वेळी महाविकास आघाडी सरकार होते. सरकारच्या माध्यमातून अभिजित पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली जात होती. त्यातूनच पाटील यांनी कोरोनाच्या काळात धाराशिवमध्ये पहिला ऑक्सिजननिर्मितीचा कारखाना सुरू केला. जेव्हा महाराष्ट्राला गरज होती, त्यावेळी अभिजित पाटील यांनी कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरविण्याचे काम केले होते. त्याचे उद्‌घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.

तब्बल वीस वर्षे बंद असलेला सांगोला साखर कारखाना पाटील यांनी चालवायला घेतला आणि अवघ्या 35 दिवसांत त्यांनी सुरू करून दाखवला. त्यामुळे पुढे झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांनी पाटील यांच्या झोळीत मताचे दान टाकले आणि अभिजित पाटील यांची राजकीय क्षेत्रात एन्ट्री झाली. एवढे दिवस राजकारणापासून दूर असलेले पाटील हे राजकारणात ओढले गेले. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारातूनच त्यांना विरोध झाला. पण त्यांनी बंद असलेला विठ्ठल कारखाना चालू करून दाखवला. शेतकरी आणि कामगारांची देणीही दिली. उसाला जिल्ह्यात एक नंबरचा भावही दिला. त्यामुळे कामगारवर्गात पाटील यांच्याविषयी आपुलकीची भावना आहे.

विठ्ठल कारखान्याच्या बायोसीएनजी प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच सभेत पवारांनी पंढरपूर-मंगळवेढ्यातून पाटील यांच्या उमदेवारीचे संकेत दिले. त्यानंतर पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही अभिजित पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर जाणे पसंत केलेले असताना अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले.

पवारांच्या राष्ट्रवादीचे ते सोलापूर जिल्ह्यातील चेहरा बनले. सोलापूर जिल्ह्यातील अनेक निर्णय त्यांच्याशी चर्चा करून पक्षश्रेष्ठी घेऊ लागले. पवारांचा सोलापूर दौरा म्हटलं की अभिजित पाटील हे गाडी चालवणार हे पक्कं ठरलेलं. त्यामुळे अभिजित पाटील यांचे राजकीय वजन वाढत होते. खरं अभिजित पाटीलही आपल्यासोबत येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाटत होते. मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाला.

राज्य सहकारी बॅंकेने 12 जानेवारी रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष या नात्याने अभिजित पाटील आणि 20 संचालकांच्याविरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर 24 जानेवारी रोजी सायंकाळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. खरं तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कर्ज कोणी उचलले आणि त्यांची शिक्षा कोणाला, याची चर्चा पंढरपूर तालुक्यात सर्वत्र होत आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी या तक्रारीच्या अनुंषगाने केलेले आरोप आणि गुन्हा दाखल होणे यामुळे पंढरपूरचे राजकारण ढवळून निघाले आहे.

योगायोगाने रोहित पवार यांचीही बुधवारी ईडीकडून चौकशी करण्यात आली आणि त्याच रात्री अभिजित पाटील यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे पवारांच्या पक्षाचे आणि गाडीचेही स्टेअरिंग सोलापूर जिल्ह्यात सक्षमपणे चालविणारे अभिजित पाटील यांना कोण अडचणीत आणत आहे, असा सवाल विचारला जात आहे.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com