Maharashtra Political News : सुचेता कृपलानी या 1963 ते 1967 दरम्यान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. त्या देशातील पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या. त्यानंतरही या पदावर अनेक महिलांना संधी मिळाली. आता ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. सद्यःस्थितीत त्या देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. आपल्या नावासमोर पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला मात्र अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही.
गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार, असे वक्तव्य केले होते. त्यावेळी सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी अधूनमधून चर्चेत येत असतात.
राज्यात 2019 च्या आकडेवारीनुसार महिला मतदारांची संख्या 47 टक्के आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 3237 उमेदवार रिंगणात होते. यात महिलांची संख्या केवळ 235 होती. 2014 च्या निवडणुकीत एकूण 288 आमदारांमध्ये फक्त 20 महिला आमदार निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये 24 महिला आमदार निवडून आल्या. हे प्रमाण 8.33 टक्के आहे. राज्याच्या इतिहासातील महिला आमदारांची ही सर्वाधिक संख्या आहे.
33 टक्के आरक्षण लागू होईल तेव्हा महिला आमदारांची संख्या 96 इतकी होईल. महिला मतदार 50 टक्क्यांच्या घरात असूनही महिलेला मुख्यमंत्री करण्याचा विचार महाराष्ट्रात झाला नाही, हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात महिलेला मुख्यमंत्री करणार, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री तशी जगजाहीर आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये काडीमोड झाल्यानंतर त्याचा पुढचा अध्याय सुरू झाला. उद्धव यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यात शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
2019 मध्ये मुख्यमंत्री तर शिवसेनेचाच करायचा होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय अन्य नेता मुख्यमंत्री झाला तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील दिग्गज नेते काम करण्यास तयार झाले नसते. त्यामुळे प्रशासनाचा अनुभव नसतानाही राजकीय डावपेचांचा भाग म्हणून पवार यांनी उद्धव ठाकरे यांना राजी केले होते. या सर्व प्रक्रियेत सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती.
महाविकास आघाडी कायम राहिली आणि 2024 ला बहुमत मिळाले, तर सुप्रिया सुळे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येऊ शकते, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी त्या वक्तव्याद्वारे दिले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे जे बोलले ते त्यांनी करून दाखवले तर इतिहासात त्याची नोंद होईल. उद्धव यांनी किमान ही चर्चा तरी सुरू केली, हे महत्त्वाचे आहे.
या महिलांनी भूषवले मुख्यमंत्रिपद
पुरोगामी, विकसित महाराष्ट्राच्या तुलनेत काही अविकसित राज्यांनाही महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या सुचेता कृपलानी या 1258 दिवस उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी कार्यरत होत्या. त्यानंतर नंदिनी सतपथी या 14 जून 1972 रोजी ओडिशाच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांचा कार्यकाल 1278 दिवसांचा होता, यात त्या दोन टर्म मुख्यमंत्री होत्या.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या शशिकला काकोडकर 12 ऑगस्ट 1973 रोजी गोव्याच्या मुख्यमंत्री बनल्या, त्या 2084 दिवस त्या पदावर राहिल्या. काँग्रेसच्या सय्यदा अनवरा तैमूर या 6 डिसेंबर 1980 रोजी आसामच्या मुख्यमंत्री बनल्या, त्यांचा कार्यकाल 206 दिवसांचा राहिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एआयएडीमएकेच्या व्ही. एन. जानकी रामचंद्रन या जानेवारी 1988 मध्ये 23 दिवस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी होत्या. याच पक्षाच्या जयललिता या तामिळनाडूच्या पाच वेळा मुख्यमंत्री बनल्या, त्या एकूण 5238 दिवस या पदावर राहिल्या.
काँग्रेसच्या शीला दीक्षित या सलग 5504 दिवस दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होत्या. राष्ट्रीय जनता दलाच्या राबडीदेवी या 2746 दिवस बिहारच्या मुख्यमंत्री राहिल्या. बहुजन समाज पक्षाच्या मायावती या 2562 दिवस उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी राहिल्या.
भाजपच्या वसुंधरा राजे शिंदे या राजस्थानच्या मुख्यमंत्री बनल्या. त्यांचा कार्यकाल 3659 दिवस राहिला. ममता बॅनर्जी या सलग 4577 दिवस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी आहेत. काँग्रेसच्या राजिंदरकौर भट्टल (पंजाब, 83 दिवस), भाजपच्या सुषमा स्वराज (दिल्ली, 52 दिवस), भाजपच्या उमा भारती (मध्य प्रदेश, 259 दिवस), भाजपच्या आनंदीबेन पटेल (गुजरात, 808 दिवस), पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती (जम्मू आणि काश्मीर, 807 दिवस) मुख्यमंत्रिपदी राहिल्या.
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षाच
पुरोगामी महाराष्ट्राला मात्र अद्याप एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, अशी नुसती महत्त्वाकांक्षा व्यक्त केल्यानेच भाजप नेत्या पंकजा मुंडे साइड ट्रॅकवर गेल्याची चर्चा आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले आणि त्याच्या काही महिन्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. हा कदाचित योगायोगही असू शकतो, तरीही मनात शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही.
महिलेला मुख्यमंत्री करायचे म्हटले तर सध्या सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांचीच नावे समोर येतात. राज्यातील कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळणे अशक्य आहे, अशा परिस्थितीत सरकार स्थापन करण्यासाठी पक्षांना तडजोडीची भूमिका घ्यावी लागते. या तडजोडीत मुख्यमंत्रिपदासाठी महिलेचे नाव समोर येईल का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.