Mumbai News : लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर आता पक्षफुटीचे लोन काँग्रेसपर्यंत आले आहे. गेल्या महिनाभरात काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, माजी आमदार बाबा सिद्धिकी व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करीत महायुतीमध्ये प्रवेश केला.
या प्रवेशानंतर देवरा व चव्हाण यांनी खासदारकी मिळवली आहे. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात काँग्रेसला घरघर लागण्याची शक्यता असून, त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमध्ये भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील अनेक दिग्ग्ज मंडळी महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
राज्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. लातूरच्या राजकारणात देशमुख घराण्याचे चांगलंच वर्चस्व आहे. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते. लातूर जिल्ह्यात देशमुख घराण्याला मोठा जनाधार लाभला आहे. मात्र, अमित देशमुखांनी काँग्रेसला रामराम करून कमळ हाती घेतल्यास हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो.
महिनाभरापूर्वी झालेल्या भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर आहेत. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत राखण्यासाठी अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचे निलंगेकर यांनी म्हटले होते. मात्र, आता त्यांच्या वक्तव्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा एकदा रंगली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले होते. या विधानानंतर लातूरचे काँग्रेसचे नेते तथा आमदार अमित देशमुख हेदेखील भाजपत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावरच खुद्द अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळली आहे. काँग्रेस पक्षाने बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीस अमित देशमुख गैरहजर राहिल्याने पुन्हा एकदा ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांनी कामानिमिताने बैठकीस गैरहजर असल्याचे सांगितले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुशीलकुमार शिंदे यांनी मला एका नेत्याकडून भाजप प्रवेशाची ऑफर आली असल्याचा गौप्यस्फोट केला, तर सुशीलकुमार शिंदे हे सुसंस्कृत नेते आहेत, असे सांगत भाजपकडून त्यांच्या प्रवेशासाठी पायघड्या अंथरल्या जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव पाठविल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेशाचा प्रस्ताव आला असल्याचा गौप्यस्फोट करून काँग्रेसमधून कदापि बाहेर पडणार नाही, असा शिंदे यांनी निर्वाळा दिला असला तरी राजकारणात काहीही घडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ऐन निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता नसली तरी त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा जोरात सुरू आहे. आगामी काळात जर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव झाली तर त्या भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि आमदार वैभव नाईक यांची नुकतीच गुप्त भेट झाली. त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत अचानक गुपचूप भेट घेतली.
या भेटीमुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. वैभव नाईक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या अधूनमधून बातम्या येत होत्या. या भेटीनंतर आता वैभव नाईक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? या शक्यतेभोवती चर्चा फिरत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आमदार वैभव नाईक यांच्यामागे एसीबीच्या कारवाईचे शुक्लकाष्ठ लागले आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले आमदार वैभव नाईक यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अनेकदा अँटी करप्शन ब्युरो म्हणजेच एसीबीची नोटीस आली आहे. त्यामुळे येत्या काळात वैभव नाईक (Vaibhav Naik) शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, की भाजपमध्ये याची चर्चा रंगली आहे.
जोगेश्वरीतील एका भूखंडामुळे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वायकरांविरुद्ध ईडीची कारवाई सुरू आहे. त्याची चौकशी सुरू असतानाच आता ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.
त्यांच्यावर शिवसेना सोडण्यासाठी दबाव असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात ते शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबतच आणखी काही नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर हे दोन आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात आहे. ही सर्व मंडळी आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार, की विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे.
R