
Karjat Mayor News : राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी (ता. जामखेड) इथं पुढील चार दिवसात होत आहे. तत्पूर्वी भाजपचे विधान परिषदेचे आमदार तथा सभापती प्रा. राम शिंदे यांनी कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का दिला. कर्जत नगरपालिकेत सत्तांतर घडवले. आमदार पवार गटाची सत्ता राम शिंदेंनी उलथून लावली. काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. अतिशय नाट्यमयरित्या कर्जत नगरपालिकेत हे सत्तांतर घडलं.
आमदार पवारांनी एकहाती असलेली ही सत्ता अलगद का सोडली? नगरपालिकेतील हे सत्तांतर म्हणजे, सभापती राम शिंदेंना बोनस, तर नव्हे? आमदार पवार हे सत्तेची गाडी सोडणाऱ्यांमधील नाहीत. शांत बसणाऱ्यांमधील नाहीत. त्यामुळे कर्जत नगरपालिकेतील या सत्तांतरामागे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कंगोरे देत स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. या सत्तांतराचा उलगडा भविष्यात नक्कीच होईल, त्यावेळी मात्र यावरून कर्जतमध्ये चांगलेच राजकारण तापलेले अनुभवायला मिळेल.
कर्जत नगरपालिकेत 2022 मध्ये आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस (Congress) पक्षाच्या साह्याने 17 पैकी 15 जागेवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्तांतर घडवले. भाजपचा धुळ चारली होती. या निवडणुकीत भाजपचे फक्त दोनच नगरसेवक निवडून आले. एकप्रकारे कर्जत नगरपालिकेत आमदार रोहित पवार यांची एकहाती सत्ता होती.
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) यश मिळवले. विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याविरोधात राम शिंदे यांचा निसटता पराभव झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना रोखण्यासाठी राम शिंदेंना विधान परिषदेवर घेतले. हे एवढ्यावर थांबले नाहीत, तर राम शिंदेंना विधान परिषदेवर सभापती केलं. राम शिंदे राज्याच्या मोठ्या संविधानिक पदावर विराजमान झाले.
प्रा. राम शिंदेंनी आता राज्यात झंझावात सुरू केला आहे. अशातच त्यांनी त्यांच्या गृहमैदानावर आमदार रोहित पवारांना शह देण्याची रणनीती आखत कर्जत नगरपालिकेतील त्यांची सत्ता मोडून काढली. एकहाती वर्चस्व असलेली रोहित पवार यांची ही सत्ता राम शिंदेंनी अलगद काढून घेतली. आमदार पवार यांना आपलेच नगरसेवक पाच वर्षे एकसंघ ठेवता आले नाही. आणि यातील 11 जणांनी सव्वा तीन वर्षातच तत्कालीन नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या कारभारावर टीकास्त्र सोडत सत्तेतून बाहेर पडले. हे काही अनेकांच्या पचनी पडेनासे झाले आहे. त्यामुळे या सत्तांतरावर आता वेगळीच राजकीय चर्चा होऊ लागली आहे.
कर्जतच्या नगराध्यक्षा म्हणून सभापती राम शिंदे गटाच्या रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा आज शुक्रवारी पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी केली. आमदार रोहित पवार गटाच्या प्रतिभा भैलुमे यांनी मंगळवारी आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मंगळवारीच माघारी घेतली.
राम शिंदे गटाचे 10, तर रोहित पवार गटाचे 4 नगरसेवक विशेष सभेसाठी उपस्थित होते. तर भाजपाचे आश्विनी दळवी, मोहिनी पिसाळ आणि काँग्रेसच्या मोनाली तोटे या तिन्ही नगरसेविका अनुपस्थित होत्या. रोहित पवार गटाच्या नगरसेवकांनी आधीच बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
नगरपंचायतीतील गटनेता बदलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा अर्ज होता. जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता फेटाळला होता. रोहित पवार गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. उच्च न्यायालयाने हा निर्णय अमान्य असून, नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. परंतु न्यायालयाच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. हाच निर्णय दोन दिवस आधी आला असता, तर दोन टर्मपासून नगरसेवक तसेच नगराध्यक्ष म्हणून सक्षमपणे काम केलेल्या आमच्या उमेदवार प्रतिभा भैलुमे यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली नसती, एवढीच प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी देत शांत बसण्याची भूमिका घेतली. रोहित पवारांची ही भूमिका अनेकांना विचार करायला लावणारी ठरली आहे.
कर्जत नगरपंचायतीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडाळी करीत सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भाजपच्या दोन नगरसेवकांना देखील आपल्या सोबत घेत 13 जणांनी तत्कालीन नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव देखील आणला. या सर्वांना एकत्र आणण्यासाठी जेष्ठ नेते प्रवीण घुले यांनी पुढाकार घेतला. तर सर्वांना न्याय देण्याची किमया सभापती राम शिंदेंनी पार पाडलं. कोणी नाराज होणार नाही, यासाठी उर्वरीत कालावधीसाठी चार पदाधिकारी देण्याचा फार्म्युला सभापती राम शिंदेंनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.