
Ajit Pawar Vs Sangram Jagtap : अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर आधारलेली आहे. सर्व समावेशक, अशी ही विचारसरणी आहे. पण अहिल्यानगर शहरातील त्यांच्या पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी पक्षाच्या या विचारसरणीला छेद देत, आक्रमक हिंदुत्व स्वीकारलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी ही भूमिका अधिकच आक्रमक घेतली. हीच भूमिका आता पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादांसाठी डोकेदुखी बनली आहे. यामुळे अजितदादांनी आता आमदार संग्राम जगतापांविरोधात नोटीस बजावण्याची भाषा केली आहे. परंतु राजकीय तज्ज्ञांनी अशा नोटिशींनी काहीच होत नसतं, असं मत नोंदवलं आहे. वेळप्रसंगी याचा परिणाम उलटा होण्याची शक्यता आहे. आमदार जगताप अधिक आक्रमक होतील, असा अंदाज देखील वर्तवला.
करमाळा इथं झालेल्या सभेत आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिक मांडली. दिवाळीची (Diwali) खरेदी करताना, हिंदूंकडून करा, असं थेट आवाहन संग्राम जगताप यांनी केलं. यावरून पुन्हा वाद उफळला आहे. संग्राम जगताप यांच्या या विधानाची पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली. अजितदादांनी थेट संग्राम यांना सुनावलं आहे. वडिलांचं छत्र राहिलं नसल्याची आठवण करून देत, जबाबदारीने वागलं आणि बोललं पाहिजे. हा शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र सर्वांना पुढे घेऊन जाणारा आहे, अशा शब्दात अजितदादांनी संग्राम जगताप यांचे कान टोचले.
परंतु अजितदादांच्या (Ajit Pawar) या शिलेदारानं, संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीनंतर आक्रमक हिंदुत्व का स्वीकारलं, यावर चर्चा करताना, विश्लेषणकांच्या म्हणण्यांनुसार याचं गणित विधानसभा निवडणुकीत दडलं आहे. विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आले. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत ही लढत झाली.
लोकसभा निवडणुका होऊन गेल्यानं निवडणुकीवर प्रभाव होता. भाजपचे सुजय विखे पाटलांचा शरद पवार यांच्या शिलेदारानं, म्हणजेच नीलेश लंकेंनी पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीला देखील लोकसभा निवडणुकीसारखी भूमिका परिस्थिती राहिल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु त्यावेळी संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप मैदानात होते. निवडणुकीसाठी ते फिल्डिंग लावत होते. थेट जनसंपर्क असलेला अरुण जगतापांची मुस्लिम समाजात मोठी लोकप्रियता होती. पण मुस्लिम मतदारांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पसंती दिली. निवडणुकीनंतर मतदारांच्या विश्लेषणानंतर ही बाब समोर आली, अशी संग्राम जगताप यांच्याजवळील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
विधानसभेला मुस्लिम समाजाकडून मतदान झालं नाही, तसंच लोकसभा निवडणुकीवेळी मुस्लिम समाजाने शरद पवार यांच्यामागे ताकद उभी केली. यातूनच संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीनंतर विजय मिळताच, विधानसभेत आमदारकीची शपथ घेताच, थेट आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. यातच मध्यंतरी शरद पवार श्रीरामपूर दौऱ्यावर येऊन गेले. अहिल्यानगर शहर मार्गे जाताना, त्यांनी मुकुंदनगरमध्ये संग्राम जगताप यांच्या जवळच्या मुस्लिम कार्यकर्त्यांच्या नातेवाईकाच्या घरी हजेरी लावली. आज हे कार्यकर्ते जगतापांबरोबर नाहीत.
संग्राम जगतापांच्या हिंदुत्वाच्या भूमिकाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपकडून देखील बळ मिळताना दिसतं आहे. संग्राम यांच्याभोवती हिंदुत्ववादी कार्यकर्ते अधिक दिसतात. तसंच त्यांच्याबरोबर असलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचं समर्थन करताना दिसतात. यावरून अजित पवार यांच्याकडे देखील पूर्वी तक्रारी झाल्या आहेत. अजित पवार यांनी त्यावेळी समज दिली होती. त्यावर संग्राम जगतापांनी नरमाईची भूमिका घेतील, असं वाटत असतानाच, ते उलट अधिक आक्रमक झाले.
अजित पवार यांनी आता पुन्हा संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर आक्रमक झाले आहे. पक्षाच्या विचारसरणीशी विसंगत भूमिका घेत असल्याचा सुनावत थेट नोटीस बजावणार असल्याचं सांगितलं. पहिली समज, आता नोटीस, यामुळे अजितदादा संग्राम यांच्याविषयी गंभीर झाले आहेत का? या नोटिशीचा काय परिणाम होणार? पक्षाने भूमिका घेतल्यास संग्राम जगताप यांची आमदारकी धोक्यात येईल का? असे ऐक ना अनेक प्रश्न चर्चेत आले आहेत.
परंतु, राजकीय अभ्यासकांच्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या मते, 'पक्षाच्या सर्वेसर्वांनी एखाद्या आमदाराला, अशी नोटीस काढल्याने त्याचा आमदारकीवर काहीच परिणाम होत नाही. ती त्यांच्या पक्षांतंर्गत बाब असते. अशा अनेकांना नोटीस, पत्र पक्षाकडून समज देताना दिली जातात. पण पक्षाने पुढे जाऊन कायदेशीर मार्ग अवलंबल्यास संबंधित पदाधिकारी, लोकप्रतिनिधीला अडचणीचं ठरू शकतं. परंतु सत्ताधारी असल्यानं, असा कायदेशीर मार्ग स्वीकारणं शक्य नाही. कारण आपल्याच पक्षाची कोण बदनामी करून घेईल!'
विशेष म्हणजे, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. अशा वेळी भूमिका घेणे म्हणजे, जपून घ्यावी लागणार आहे. पण आता तरी, ही भूमिका म्हणजे, 'मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर', असंच होईल. या पलीकडे काहीच होणार नाही, असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आलं. पण हाच मुद्दा विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या गृहापर्यंत पोचल्यास पक्षाची डोकेदुखी वाढेल, असेही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आले आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या या मतानुसार, संग्राम जगताप यांची ही आक्रमक भूमिका अजितदादांची डोकेदुखी वाढवणारीच ठरणार आहे. आता उद्या शहरात महामोर्चाचं आयोजन केलं आहे. महापुरूषाचा अवमान केला म्हणून हा निषेध मोर्चा आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात मुस्लिम समाजाचा आरोपी आहे. अजितदादांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर संग्राम जगताप या मोर्चात काय भाष्य करतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.