महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्यापही धगधगता आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच ‘ओबीसी’ नेते लक्ष्मण हाके यांनी टीकेचे लक्ष्य केले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीमधील वातावरण गढूळ होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. मात्र, असे असले तरी महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र सध्या तरी नाही. महायुती एकत्रितपणे या निवडणुकांना सामोरे जाणार की, प्रत्येक घटक पक्ष स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट नाही. तत्पूर्वीच महायुतीच्या घटक पक्षातील काही नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीमधील वातावरण गढूळ होते होते की काय, अशी चिन्हे दिसत आहेत.
महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्याप शमलेला नाही. या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे सोपवल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी प्रचंड गदारोळ करीत नाराजी व्यक्त केली होती.
शिवसेनेच्या भारत गोगावले यांना या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पाहिजे. मात्र, या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पालकमंत्रिपद नियुक्तीस स्थगिती देऊन तात्पुरता कार्यभार स्वतःकडे ठेवला आहे. मात्र, असे असले तरी शासकीय कार्यक्रमांना अदिती तटकरे याच उपस्थित राहत असतात. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अस्वस्थ होणे सहाजिकच आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदाची चर्चा पुन्हा होण्याचे कारण म्हणजे मंत्री भारत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा नुकताच नागरी सत्कार करण्यात आला. वाढदिवस हे निमित्त असले तरी मतदारांचे आभार मानायचे राहून गेले होते. कारण यापूर्वी नियोजित कार्यक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने रहित करावा लागला होता. त्यामुळे मतदारांचे आभार हा या सोहळ्यामागील महत्त्वाचा हेतू असल्याचे गोगावले यांनीच या कार्यक्रमात स्पष्ट केले.
या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) नेते आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणांत भारत गोगावले यांनाच पालकमंत्रिपद मिळावे, अशी जोरदार मागणी केली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे नाव घेऊन टीका केली. ‘सर्वच आपल्याला पाहिजे,’ अशी तटकरेंची भूमिका असल्याचे सांगताना महेंद्र दळवी यांनी पालकमंत्री होण्यापूर्वी जिल्ह्याचे ‘मालकमंत्री’ होऊन दाखवा, असे आव्हान दिले. मात्र, तटकरे यांनी यापूर्वी गोगावले यांची नक्कल एका कार्यक्रमात केली होती. आता दळवी यांच्या या आव्हानाला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी खरमरीत उत्तर दिले आहे.
या आरोप-प्रत्यारोपांची ही मालिका अशीच सुरू राहील. मात्र, जर का ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत सुरू राहिला, तर निवडणुकांमध्ये महायुतीला तोटा होऊ शकेल, हे मात्र निश्चित. याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी समंजस भूमिका घेऊन हा वाद चव्हाट्यावर न आणण्याची विनंती केली आहे.
या विषयावर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेणार असल्याचेही आश्वासनही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. दुसऱ्या एका प्रकारात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच ‘ओबीसी’ नेते लक्ष्मण हाके यांनी लक्ष्य केले आहे. ‘‘अजित पवारांना आता पंख फुटलेत, वाटी-ताटीत नव्हे तर ते समुद्रात तोडपाणी करतात,’’ असा गंभीर आरोप करत त्यांनी नवीनच वादाला तोंड फोडले. यावरून हाके अन् ‘राष्ट्रवादी’काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते नेते आमदार अमोल मिटकरी यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू झाली.
हाके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपाला ‘राष्ट्रवादी’चे आमदार अमोल मिटकरी आणि ‘राष्ट्रवादी युवक’चे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार ‘ओबीसीं’च्या मुलांना वसतिगृह का देत नाहीत? असा सवाल हाके यांनी केला. अजित पवार यांनी माझ्या पाठीमागे त्यांची पलटण लावली आहे. अजित पवार हे शरद पवार यांच्या ‘रिचार्ज’वर चालतात, आता अजित पवार यांना पंख फुटले आहेत, असे अनेक आरोप हाके करीत आहेत. या वादात हाके यांनी तटकरेंना सुद्धा सोडलेले नाही. भारतातील ८० टक्के दारूचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात होणारे दारूचे उत्पादन सुनील तटकरेंच्या पक्षाचे कारखानदार अन् भांडवलदार मंडळी करतात, असे म्हणत हाके यांनी तटकरे यांच्यावर टीका केली.
वास्तविक हाके हेसुद्धा महायुतीच्या जवळचेच आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. गेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. असे असतानाही ते महायुतीचे घटक असलेल्या शिंदेंची शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य का करत असावेत? हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढविल्या तर आता सुरू झालेल्या सुंदोपसुंदीचा प्रतिकूल परिणाम निवडणुकांत निश्चितच दिसणार आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना अन् अजित पवारांचा ‘राष्ट्रवादी’ पक्ष एकमेकांशी भांडत राहिले तर एकमेकांच्या उमेदवारांच्या पाडापाडीचे राजकारण हे दोन्ही गट उत्तमरीत्या करू शकतील. त्याचा भाजपला महायुतीत राहून किती फायदा होईल, हे अनिश्चित आहे. मात्र, तिन्ही घटक पक्ष स्वतंत्रपणे लढल्यास भाजपला मात्र याचा निश्चितच फायदा होईल.
लक्ष्मण हाके यांच्या अजित पवार यांच्यावरील टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चिडले, तर ‘ओबीसी’ नेत्याला अंगावर घेतल्याने ‘ओबीसी’ समाज राष्ट्रवादीँपासून दूर जाऊन त्याचाही फायदा भाजपला होऊ शकेल.
त्यातच ‘राष्ट्रवादी’मधील ‘ओबीसी’ चेहरा छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिले असले, तरी त्यांचा प्रभाव करण्याचा हा महायुतीमधील नेत्यांचा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीत सर्व काही ठीक राहील,, ही भाजपची जास्त जबाबदारी आहे. यासाठी भाजप प्रयत्न करणार का, की होत आहे त्याचा फायदा कसा उठवायचा, असा भाजपचा विचार आहे? तसे असेल तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्याची गरज निर्माण होईल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.