बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) विधानसभा पोटनिवडणुकांत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांना त्यांच्या जिल्ह्यातच मोठा धक्का बसला होता. हनगळमध्ये काँग्रेसचा (Congress) विजय झाला आहे. बोम्मई हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांना लक्ष्य केले जात आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) हे बोम्मईंच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
कर्नाटकात सिंदगी आणि हनगळ या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या होत्या. यातील हनगळची जागा भाजपकडे तर सिंदगीची जागा धर्मनिरपेक्ष दलाकडे (जेडीएस) होती. हनगळचे आमदार सी.एम.उदासी यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. जेडीएसचे एम.सी.मानगुळी यांच्या निधनाने सिंदगीची जागा रिक्त जागा झाली होती. या जागांसाठी भाजपसह काँग्रेस आणि जेडीएसने जोर लावला होता.
राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असल्याने बोम्मई यांच्यासाठी या पोटनिवडणुका नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या होत्या. परंतु, त्यांना फटका बसला होता. हनगळ हा मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. येथून काँग्रेसचे श्रीनिवास माने विजयी झाले. भाजप दुसऱ्या तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर राहिला. सिंदगीमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. येथे भाजपचे उमेदवार रमेश भुसानूर हे 31 हजार 185 मतांनी विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे अशोक मानगुळी होते. भुसानूर यांनी 93 हजार 856 तर मानगुळी यांना 62 हजार 680 मते मिळाली.
यानंतर भाजपच्या नेत्यांनीच बोम्मईंना लक्ष्य करण्यास सुरवात केले आहे. यावर येडियुरप्पा हे ठामपणे बोम्मईंच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ते म्हणाले की, सर्वांनी मिळून एकत्रितरीत्या पोटनिवडणुका लढल्या. त्यामुळे निकालाची जबाबदारी सर्व नेत्यांची आहे. यामुळे हनगळ पोटनिवडणुकीच्या आधारावर कुणीही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही. राज्यात 2023मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप 140 जागा जिंकेल.
येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.