
BJP Wins Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाने सर्वजण आश्चर्याच्या धक्क्यात आहेत. त्यातही विशेष चर्चा होते आहे ती, भाजपने जिंकलेल्या तब्बल १३३ जागांची. कारण, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या प्रचंड धक्क्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून स्वत:ची ताकद आणि निवडणुकीतील नियोजन दाखवून दिलं आहे. आता भाजपच्या या यशाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, विविध कारणे दिली जात आहेत. एकूणच भाजपचं जोरदार कमबॅक सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
सत्ता राखणे ही भारतीय जनता पक्षाची गरज होती आणि त्यासाठी अठरापगड जातींची एकत्र मोट बांधतानाच कुठेतरी हे सूत्र चालले नाही तर धर्माच्या आधारावर निवडणूक नेण्याचा निर्णय भाजपने एका विशिष्ट टप्प्यावर घेतला. भगवे वस्त्र धारण करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अकोला या कमालीच्या हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाच्या भागात ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा केली.
जातीच्या आधारावर सुरू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जो रंग आला होता, तो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ने अधिकच गहिरा झाला. खरे तर महाराष्ट्राने यापूर्वी धर्माच्या आधारावर मतदान केले ते मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर. यंदा मात्र अशी कोणतीही परिस्थिती नव्हती. राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार होते. पण मराठा -ओबीसी वाद टिपेला पोहोचला होता. या जातीय मतविभाजनाचा फटका बसेल, अशी भीती होती. मग बहुसंख्याकांचे गणित हाताशी धरत भारतीय जनता पक्षाने ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा दिला.
खरे तर योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात कुठे प्रचाराला जावे याच्या अत्यंत सोईस्कर जागा ठरविण्यात आल्या होत्या. जेथे ध्रुवीकरणाचा फार त्रास होऊ शकणार नाही, अशा विधानसभा मतदारसंघातूनच हा संदेश जावा याची काळजी पूर्णतः घेण्यात आली. अकोला, नांदेड, सोलापूर या भागामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा घ्यायच्या असे ठरले होते.
‘निर्भय बनो’ या लोकसभा निवडणुकीचे गणित बदलणाऱ्या भाजप (BJP)विरोधी मोहिमेला उत्तर देण्यासाठी ‘सजग रहो’ असे नाव दिले गेले. हे आंदोलन उजव्या परिवारांनी हाती घेतले होते. कुठेतरी ‘बटेंगे तो कटेंगे’ याची गरज लक्षात घेतली गेली आणि त्यानुसार हे विधान केव्हा करायला हवे, याची गणिते निश्चित झाली.
काँग्रेस आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठीशी अल्पसंख्याक उभे राहिल्यामुळे त्यांना लोकसभेची निवडणूक जिंकता आली होती. हे लक्षात घेत हिंदू ध्रुवीकरणाचा घाट रचला गेला तो कमालीचा यशस्वी झाल्याचे निकालांनी दाखवून दिले आहे. या आक्रमक नाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी ‘एक है तो सेफ है’ हा तुलनेने सौम्य नारादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दिला होता. या दोन्ही घोषणांचा परिपाक म्हणून महाराष्ट्राच्या धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी भूमीत भारतीय जनता पक्षाचे आज १३३ आमदार निवडून आले व त्यांनी यश मिळाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.