
तमिळनाडूमधील युती सरकार विरोध: द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोन प्रमुख पक्ष युती सरकारच्या संकल्पनेला पारंपरिक विरोध करतात. इतिहासातही काँग्रेस-द्रमुक युती अपयशी ठरली आहे.
भाजप-अण्णा द्रमुक युतीवरून वाद: अमित शहा यांनी 2026 च्या निवडणुकीनंतर युती सरकारची घोषणा केल्याने अण्णा द्रमुकमध्ये अस्वस्थता निर्माण झाली; पलानीस्वामी यांनी स्वबळावर सत्ता स्थापनेवर भर दिला.
राजकीय फेरजुळणीची शक्यता: अण्णा द्रमुक भाजपपासून विभक्त होऊन टीव्हीके, एनटीके आणि डाव्या पक्षांशी नव्याने आघाडी करण्याच्या हालचाली करत आहे, मात्र अजून अंतिम निर्णय स्पष्ट नाही.
तमिळनाडूत १९६७पासून आलटून पालटून सत्तेत आलेले द्रविड संस्कृतीतील दोन प्रमुख पक्ष द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (अण्णा द्रमुक) हे या राज्यात जरी परस्परांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत.
तरीही तमिळनाडूत युती सरकार होऊ नये यावर त्यांचे एकमत आहे. युती सरकारला दोन्ही पक्षांचा स्पष्ट विरोध आहे. अमित शहा यांनी नुकतेच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-अण्णा द्रमुक युतीला विजय मिळाल्यास राज्यात युती सरकार स्थापन होईल, असे जाहीर केले. त्यामुळे ४५ वर्षांनंतर तमिळनाडूत पुन्हा युती सरकारची चर्चा रंगू लागली आहे. त्याविषयी...
भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजप-अण्णा द्रमुकच्या युतीचे मुख्य शिल्पकार आहेत. त्यांनी नुकतेच जाहीर केले, की २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत या युतीने विजय मिळविल्यास राज्यात युती सरकार स्थापन होईल.
तमिळनाडूत युती सरकारची कल्पना प्रथम १९८० च्या मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुढे आली होती. त्या वेळी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि द्रमुकने समान संख्येने जागा लढविण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी जानेवारीत काँग्रेस-द्रमुक आघाडीने लोकसभा निवडणुकीत ३९ पैकी ३७ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता.
१९७७ मध्ये सत्तेवर आलेले एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्या सरकारच्या कारकिर्दीचे तिसरे वर्ष होते. द्रमुकने केंद्र सरकारकडे एमजीआर सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीत त्यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता अन् जनतेचा विश्वास गमावल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसने ‘एमजीआर’ सरकार पाडले आणि द्रमुकसोबत विधानसभा निवडणुकीत समान संख्येने जागा लढविण्याचा करार केला.
दोन्ही पक्षांचे युती सरकार स्थापन करणे, हा यामागचा उद्देश स्पष्ट होता. मात्र, लोकसभेतील विजयामुळे आत्मविश्वासाने ओसंडून वाहणाऱ्या या युतीचा विधानसभा निवडणुकीत अंत झाला. ‘एमजीआर’ यांनी १७७ जागांवर विजयी होत सत्तेवर पुनरागमन केले. तमिळनाडूच्या जनतेने केवळ ‘एमजीआर’ यांच्या अण्णा द्रमुकला केवळ प्रचंड बहुमत दिले नाही, तर युती सरकारची कल्पनाच फेटाळत काँग्रेस-द्रमुक युतीला पराभूत केले.
२००१ मध्ये अण्णा द्रमुकने केवळ १४१ जागांवर उमेदवारी दिली होती. त्यांच्या इतिहासातील सर्वात कमी जागांवर ते निवडणूक लढवत होते. कारण युतीतील भागीदारीमुळे जागावाटपाचे बंधन होते.
अण्णा द्रमुकला २३४ सदस्यांच्या विधानसभेत साधे बहुमत (११८ जागा) मिळवता येईल की नाही, अन्यथा त्यांना युती सरकार स्थापन करावे लागेल का, अशी चर्चा होती. पण आपल्या राजकीय गुरूंच्या (एमजीआर) मार्गावर चालत जयललिता यांना सत्तावाटपाचा विचार मान्य नव्हता. जनतेचाही तसाच दृष्टिकोन होता, हे स्पष्ट झाले.
अण्णा द्रमुकने १३२ जागा स्वबळावर जिंकून जयललिता यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. लक्षणीय बाब म्हणजे २००६ च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकने केवळ ९६ जागा जिंकल्या, म्हणजेच बहुमतापेक्षा कमी जागा त्यांना मिळाल्या.
तरीही त्यांनी प्रमुख भागीदार काँग्रेससोबत सत्ता वाटून घेण्यास नकार दिला. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींसोबत करुणानिधींचे चांगले संबंध होते अन् त्यामुळे काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला. मात्र, जयललिता यांनी या सरकारची सातत्याने ‘अल्पमतातील सरकार’ म्हणून हेटाळणी केली.
या पार्श्वभूमीवर, एप्रिलमध्ये चेन्नईत अण्णा द्रमुकचे सरचिटणीस अन् माजी मुख्यमंत्री एडापडी के. पलानीस्वामी यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अमित शहांनी भाजप-अण्णा द्रमुक युती पुन्हा सक्रिय झाली असल्याची घोषणा केली.
युती निवडणूक पलानीस्वामींच्या नेतृत्वाखाली लढवेल, असे त्यांनी जाहीर केले तरी विजय मिळाल्यास राज्यात युती सरकार असेल, हे जाहीर करून त्यांनी एकप्रकारे तमिळनाडूत राजकीय भूकंपच घडवला.
पलानीस्वामी यांनी या घोषणेला तत्काळ कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. पण नंतर त्यांनी ठामपणे सांगितले, की अण्णा द्रमुक पक्ष पूर्ण बहुमत मिळवून स्वबळावर एकटाच सरकार स्थापन करेल. यानंतर भाजप व अण्णा द्रमुकमधील तणाव वाढत गेला.
अनेक मुलाखतींमध्ये अमित शहांनी भूमिका पुन्हा स्पष्ट केली. काही दिवसांपूर्वी केरळच्या तिरुअनंतपुरम येथे सभेला संबोधित करताना शहांनी पुन्हा एकदा सांगितले, की भाजप तमिळनाडूत युती सरकारचा भाग असेल.
यावर प्रत्युत्तर देत पलानीस्वामी यांनी पुन्हा स्पष्ट केले, की अण्णा द्रमुक युती सरकारच्या कल्पनेच्या विरोधात आहे. ‘आम्ही पूर्ण बहुमताने सत्ता मिळवू आणि स्वत:चे सरकार स्थापन करू’ असं त्यांनी ‘मक्कळाई कप्पोम् – तमिऴगत्तै मेट्पोम्’ या राज्यभरातील जनसंपर्क अभियानात सांगितले.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, ‘अण्णा द्रमुकला बहुमत मिळाले नाही किंवा मिळाले तरीही तुम्ही युती सरकार कराल का?’ असे विचारल्यानंतर पलानीस्वामी यांनी सांगितले, की मी काल्पनिक प्रश्नांना उत्तर देत नाही. अण्णा द्रमुक पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल.
अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांना भाजपने सत्तावाटपासाठी घातलेल्या अटी खूपच खटकल्या. भाजप नेते अण्णा द्रमुकच्या प्रचारात सहभागी झाले तरी वास्तवात कार्यकर्त्यांमध्ये सुसंवादाचा अभाव दिसून आला.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या आधी अण्णा द्रमुकने भाजपसोबत संबंध तोडले तेव्हा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला होता. शहांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना अण्णा द्रमुकचे ज्येष्ठ नेते अन् प्रवक्ते वैगाई सेल्वन म्हणाले, की तमिळनाडूच्या जनतेकडून युती सरकारची संकल्पना कधीच स्वीकारली जाणार नाही.
अण्णा द्रमुकला मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष भाजपशी युती तोडून अभिनेता विजय यांच्या तमिऴगा वेत्री कळघम (टीव्हीके), सीमान यांच्या नाम तामिऴर कच्ची (एनटीके), थोल थिरुमावळवन यांच्या ‘व्हीसीके’ आणि डाव्या पक्षांसोबत नव्याने आघाडी करण्याचा विचार करत आहे.
त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ‘मी काल्पनिक प्रश्नांना उत्तर देत नाही,’ असे पलानीस्वामी यांनी ज्यावेळी सांगितलं, तेव्हा त्यांना विचारलं गेले होते, की अण्णा द्रमुक भाजपशी नाते तोडून विजयसोबत हातमिळवणी करेल का त्यांनी ही शक्यता फेटाळली नाही, हेच राजकीय वर्तुळात चर्चेचे कारण बनले.
अमित शहांनी एका तमिळ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत असे स्पष्ट केले, की मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अण्णा द्रमुकचा असेल. त्यांनी पलानीस्वामींचं नाव घेतले नाही. त्यावर द्रमुकने टीका करताना नमूद केले, की या वक्तव्यातून अमित शहांचा पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही, हे स्पष्ट होते.
पलानीस्वामींचे नाव न घेण्यामुळे नवीन चर्चेला तोंड फुटले. भाजपचे हे ज्येष्ठ नेते अण्णा द्रमुकमधील दुसऱ्या फळीतील नेते व माजी मंत्री एस.पी. वेलुमणी यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत का? विशेष म्हणजे, वेलुमणी यांनी अलीकडेच सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून सहभाग घेतला होता.
या गोंधळात भर टाकली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी. पलानीस्वामी यांचे ‘सत्तावाटप नको’ हे वक्तव्य पुन्हा-पुन्हा फेटाळून अण्णामलाई यांनी स्पष्ट केले, की अमित शहांनी तीन वेळा स्पष्टपणे सांगितले आहे, की तमिळनाडूत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार स्थापन करेल. मी एक शिस्तबद्ध भाजप कार्यकर्ता असल्यामुळे त्यांच्या वक्तव्यास विरोध करू शकत नाही. जर मी त्यांच्या वक्तव्यास विरोधाभासी वक्तव्य दिले, तर मला या पक्षात राहण्याचा अधिकारच उरत नाही,” असं त्यांनी १७ जुलै रोजी माध्यमांना सांगितले.
अण्णामलाई यांच्या हस्तक्षेपामुळेच अण्णा द्रमुकने भाजपसोबत संबंध तोडले होते. आता तेच पुन्हा शहा यांच्या वक्तव्यांना दुजोरा देत आहेत. दुसरीकडे त्यांचे उत्तराधिकारी नैनार नागेंद्रन आणि केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी या विषयावर सावध पवित्रा घेतला आहे. भाजपमध्ये नेतृत्व बदलल्यानंतरच अण्णा द्रमुकने युती पुन्हा स्वीकारली होती.
अण्णामलाई यांना हटवून अण्णा द्रमुकचे माजी मंत्री नैनार नागेंद्रन यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. त्यांनी २०१४ मध्ये रामनाथपुरम आणि २०२४ मध्ये तिरुनेलवेली येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला.
अण्णा द्रमुक आणि इतर पक्षांची आघाडी अद्याप ठरलेली नाही. पण सरकारच्या स्वरूपाबाबतचा वाद मात्र शिगेला पोहोचला आहे. सध्या तरी द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी सुसंघटित दिसते. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी काही नव्या पक्षांचा समावेश होईल असे सूचित केले आहे.
अण्णा द्रमुकनेही स्पष्ट केले आहे, की द्रमुकला हरवण्यासाठी समविचारी पक्षांसाठी दरवाजे खुले आहेत. आता तरी तमिळनाडूत द्रमुक, अण्णा द्रमुक, टीव्हीके आणि एनटीके यांच्या आघाड्यांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. निवडणुकीला अजून दहा महिने बाकी आहेत, त्यामुळे या चित्रात बदल होण्याची शक्यता कायम आहे.
प्रश्न 1: तमिळनाडूमध्ये भाजप-अण्णा द्रमुक युतीवर वाद का निर्माण झाला?
उत्तर: अमित शहांनी युती सरकारची घोषणा केली, पण अण्णा द्रमुक स्वबळावर सत्ता स्थापनेच्या भूमिकेवर ठाम आहे.
प्रश्न 2: अण्णा द्रमुकच्या इतिहासात युती सरकारचं स्थान काय आहे?
उत्तर: अण्णा द्रमुकने अनेकदा युती टाळून स्वबळावरच सत्ता मिळवली आहे.
प्रश्न 3: द्रमुकने 2006 मध्ये काँग्रेससोबत सरकार का बनवलं नाही?
उत्तर: बहुमत नसतानाही त्यांनी काँग्रेसचा फक्त बाहेरून पाठिंबा घेतला, सत्तावाटप नाकारलं.
प्रश्न 4: अण्णा द्रमुक पुढील निवडणुकीसाठी कोणत्या नवीन आघाड्यांचा विचार करत आहे?
उत्तर: टीव्हीके, एनटीके आणि डाव्या पक्षांसोबत आघाडीची चाचपणी सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.