✅ 3-Point Summary:
रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा नेतृत्वबदल करण्यात आला असून, चव्हाण यांच्यावर पक्ष संघटनात्मक समन्वयाचे मोठे जबाबदारी आहे.
भाजपचा आक्रमक पक्षविस्तार — काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), उद्धव ठाकरे गटातील अनेक माजी आमदार, नगरसेवक भाजपमध्ये दाखल; स्थानिक पातळीवरील प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न.
कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर — नव्या नेत्यांचा प्रवेश होत असताना जुन्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि पदनियुक्त्यांची टांगणी भाजपसाठी आगामी निवडणुकांमध्ये अडथळा ठरू शकतो.
रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. आधीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतरच संघटनेचा हा नेतृत्व बदल अपेक्षित होता. मात्र तो झाला नव्हता. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघड वाजायला सुरूवात झाल्यानंतर भाजपने हा नेतृत्वबदल केला आहे. तर दुसरीकडे कोणत्याही निवडणुका सामोऱ्या येताच विरोधी पक्षांतील नेते गळाला लावायचे व त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणायचे, हा अलीकडे नव्याने सुरू केलेला प्रकार स्थानिक स्वराज्य संस्थांतील स्थानिक नेत्यांचे महत्त्व लक्षात घेता पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे या नव्या आणि आधीच्या जुन्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कसरत नव्या प्रदेशाध्यक्षांला करावी लागणार आहे.
पूर्वीच्या काळी एखादा नेता राजकीय पक्ष सोडून जाणार अशी चर्चा सुरु झाली तरी राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून जात होते. अगदी २०१४ पर्यंतही हीच स्थिती होती. पण गेल्या ११ वर्षांत भाजपमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात राजकीय प्रवेशाचा सुकाळ झाला आहे. हा ओघ अजूनही सुरुच आहे. या प्रवेशातून राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी खासदार, माजी आमदार ते ग्रामपंचायतीचा सदस्यही सुटला नाही. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरु असताना सुद्धा मुंबईतील प्रदेश कार्यालयात रोज राज्याच्या विविध भागातील नेत्यांचा जाहीर प्रवेश होत होते.
ज्यांच्या पिढ्यान पिढ्या काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नांदल्या, अशा घराण्यातील नेते सहजपणे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यात आता त्या नेत्यांना, विरोधकांना आणि जनतेलाही काहीच विशेष वाटत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, २०२९ ची लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून हे प्रवेश करून घेतले जात आहेत. पण हा भाजपचा पक्ष विस्तार आहे की वैचारिक दिशाभूल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे तसे पाहता ना एकनाथ शिंदेंची गरज आहे ना अजित पवारांची. पण आता युतीधर्म निभवावा लागणार असल्याचे हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्तेत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुती राहील असे तिन्ही पक्षाचे नेते सांगत असले तरी काही अपवाद वगळता भाजप बहुतांश ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढवेल याचीच शक्यता जास्त आहे.
महायुती सत्तेत आल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे शिंदे यांचे स्वप्न भंगले आणि ते तेव्हापासून अस्वस्थ आहेत. ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदेंच्या साम्राज्याला धक्का लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करण्यामागे हे एक कारण आहे. डोंबिवलीकर असणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल यासह अन्य महापालिकांवर सत्ता काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष असताना संघटना बांधणीसाठी सतत पाठपुरावा केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांकडून प्रचंड काम करून घेतले. सदस्यता नोंदणीसाठी तर प्रत्येकाला मोठे उद्दिष्ट दिले. बावळकुळे यांनी आम्हाला अक्षरशः पिळून काढले आहे, असे सर्वसामान्य कार्यकर्ते खासगीत बोलत असतात. चव्हाण यांच्या पुढे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आव्हान आहे. त्यापूर्वी त्यांना प्रत्येक शहर व जिल्ह्यातील कार्यकारिणीचा तिढा सोडवावा लागणार आहे.
कायकर्त्यांना लोकसभा, विधानसभेला भरपूर काम केले आहे. त्यातून विजय साकारला गेला आहे. त्यामुळे आता संघटनेत सन्मानाचे पद मिळाले पाहिजे यासाठी कार्यकर्ते फिल्डींग लावून बसलेले आहेत. जुलै अखेरपर्यंत सर्व नियुक्त्या पूर्ण करा, असा आदेश चव्हाण यांनी दिलेला असला तरी यातून निर्माण होणारे नाराजीनाट्य रोखताना चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कस लागणार आहे.
महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत २३० आमदारांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या तयारीकडे महायुतीने मोर्चा वळवला आहे. यामध्ये भाजप अतिशय आक्रमकपणे पक्षप्रवेशाची रणनीती आखत आहे. केवळ शहरी भागात नाही तर लातूर, नांदेड, धुळे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, कोकणातील काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना फोडून भाजपमध्ये प्रवेश केला जात आहे. मुंबईत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम होत आहेत.
विधानसभेत भाजपचे १३२ आमदार निवडून आल्यानंतर विरोधकांचे अवसान गळून गेले आहे. काँग्रेसच्या संघटनेत पुन्हा प्राण फुंकण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, पण त्यांना काँग्रेसमधील गळती रोखता आलेली नाही. अशीच स्थिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची अन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे. भाजपची हिंदुत्ववादी विचारसरणी पटणारी नसली तरीही अनेक बडे नेते भाजप प्रवेशासाठी दारात उभे आहेत. विरोधात बसण्यापेक्षा सत्तेची फळ चाखण्यासाठी आणि तहान भागविण्यासाठी विरोधक आसुसलेले आहेत.
भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा सपाटा सुरू आहे. भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांचा विरोध असला तरी त्यांची फारशी चिंता न करता पक्षाचे नेते प्रतिस्पर्धी नेत्यांना भाजपमध्ये घेत आहेत. यामध्ये भाजपमधील अंतर्गत कुरघोड्यांचे राजकारण असून,आपली ताकद वाढली पाहिजे यासाठी भाजपचे नेते पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता हे प्रवेश करत आहेत. यामध्ये चाळीसगाव येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भूषण काशिनाथ पाटील, माजी उपनगराध्यक्ष भगवान बापू पाटील, नांदेड मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, किनवट बाजार समितीचे सभापती आणि आठ संचालकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
श्रीगोंदा साखर कारखान्याचे माजी संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाषराव काळाने, बेलवंडी व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे उत्तमराव डाके, तांदळी दुमालाचे सरपंच व उद्योजक संजय निगडे यांनीही मुंबईत भाजप प्रवेश केला. कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, उत्तम कोराणे, चंद्रपूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी अनेक कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश केला. कोकणातील मालवण नगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, सेजल परब यांनी हातातील शिवबंधन सोडून कमळासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
लातूर जिल्ह्यातील चाकूर नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष व प्रहारचे नेते कपिल माकणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद पवार गटाचे निळकंठ मिरकले यांनी पक्ष प्रवेश केला. गेल्यावर्षी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ. अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता चाकूरकर यांचे समर्थक भाजपच्या वाटेवर आहेत.
नाशिक मधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन मराठे, प्रशांत दिवे, कमलेश बोडके, उपजिल्हाप्रमुख कन्नू ताजणे यांनी प्रवेश केला. त्यापूर्वी काही दिवस आधी जिल्ह्यातील माजी आमदार अपूर्व हिरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल मादनाईक यांनीही भाजप प्रवेश केला होता. धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कामगार सेनेचे डॉ. प्रशांत काकडे, ठाकरे यांच्या पक्षाचे मुंबईतील माजी नगरसेवक ईश्वर तायडे, माजी नगरसेविका आकांक्षा शेट्टी यांनीही प्रवेश केला.
नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपप्रवेश करण्यात आला. बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपच्या अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. पण त्यास न जुमानता प्रवेश झाला. सोबत बबन घोलप यांनीही प्रवेश केला. ही यादी अजून मोठी होऊ शकते.
पुणे शहरात भाजपचा जम बसला असला तरी जिल्ह्यात मात्र गेले अनेक वर्ष प्रयत्न करूनही भाजपची डाळ शिजलेली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचा जिल्ह्यात चांगला पगडा आहे. त्यामुळे भाजपला तेथे फारशी संधी मिळत नव्हती. दौंडचे राहुल कुल हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. भाजपने २०२४ च्या निवडणुकीत मिशन बारामती राबवून शरद पवार यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. खुद्द अजित पवार यांच्या पत्नी निवडणुकीत उभ्या असूनही भाजपला सुप्रिया सुळे यांचा पराभव करता आला नव्हता.
आता अजित पवार सत्तेत असल्याने भाजपने राष्ट्रवादीतील मंडळींऐवजी काँग्रेसच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. भोरचे थोपटे, पुरंदरचे जगताप कुटुंबीय काँग्रेसचे एकनिष्ठ होते, गेले अनेक दशके त्यांनी काँग्रेससाठी काम केले. विधानसभा निवडणुकीनंतर तेथे भाजपला खिंडार पाडण्यात यश आले आहे. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या गळाला लागले आहेत. तर इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांचे विरोधक प्रवीण माने यांचाही भाजपप्रवेश झाला आहे.
२०२९च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची कोंडी करण्यासाठी भाजपकडून आत्तापासूनच फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. त्याला काँग्रेसच्या माजी आमदारांकडून हातभार लागत आहे. पुण्यातही काँग्रेसचा एका माजी आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतच हा प्रवेश होणार होता, पण तेव्हा भाजपमधील विरोधामुळे हा प्रवेश टळला होता. आता पुन्हा एकदा माजी आमदार आणि त्यांचा मुलगा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे. पुणे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे दोन माजी आमदार भाजपमध्ये आले त्यानंतर आता हा शहरातील माजी आमदारही प्रवेश करणार का याकडे लक्ष आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी विविध महामंडळ, समित्यांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केले जाणार होती. पण त्याचा अंतिम निर्णय झाला नाही. निवडणुकीनंतर राज्यात सत्ता येऊनही शासनाच्या कोणत्याही समितीवर, महामंडळावर कार्यकर्त्यांची नियुक्ती झालेली नाही. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जून महिन्यात महामंडळ, जिल्हा नियोजन समिती, राज्य शासनाच्या विविध समित्यांवरील नियुक्त्या होतील असे सांगितले होते. पण आता जुलै महिना संपत आला असला तरीही याचा निर्णय घेण्याला पक्षाला वेळ मिळालेला नाही.
या ठिकाणी नियुक्ती करण्यापूर्वी महायुतीत त्याची वाटाघाटीही होणे आवश्यक आहे, त्याची चर्चा सुरु असली तरी अजूनही ती अंतिम निर्णयापर्यंत येण्यास वेळ आहे. भाजपच्या नेत्यांनी, आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शासकीय समित्यांवर नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. पण संपूर्ण बहुमत असताना देखील पक्षनेतृत्वाकडून हा विषय बाजूला टाकला जात आहे.
एकीकडे दुसऱ्या पक्षातील नेत्यांचे वाजत गाजत स्वागत केले जात असताना दुसरीकडे वर्षानूवर्षे सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निर्णय घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. असे झाल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, नगर पालिका निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो. त्यामुळे हा विषय मार्गी लावण्याचे आव्हान रवींद्र चव्हाण यांच्या पुढे आहे.
✅ 4 FAQs with 1-line answers:
प्र.1: रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड का झाली?
→ स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मजबूत नेतृत्वासाठी त्यांची निवड करण्यात आली.
प्र.2: भाजपमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांचे प्रवेश का वाढले आहेत?
→ आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक प्रभाव वाढवण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून हे प्रवेश घडवले जात आहेत.
प्र.3: पक्षात नव्या नेत्यांचा प्रवेश झाल्यामुळे काय परिणाम होतो आहे?
→ जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असून पदनियुक्तीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
प्र.4: पुणे आणि बारामतीमध्ये भाजप कोणती रणनीती आखत आहे?
→ काँग्रेस व राष्ट्रवादीतील माजी आमदारांना सहभागी करून 2029 साठी सशक्त तयारी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.