Ashok Chavan Latest News: आमदाराचा खासदार झाल्याचे अप्रूप, पण दोनदा मुख्यमंत्री झाल्याचा विसर?

Maharashtra Politics: भाजपमध्ये प्रवेशानंतर मी तीनच दिवसांत आमदाराचा खासदार झालो, हे सहसा घडत नाही, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले आहे.
Ashok Chavan Latest Statement
Ashok Chavan Latest Statement Sarkarnama
Published on
Updated on

काही राजकीय नेत्यांसाठी पक्षनिष्ठेला वगैरे आता मोल राहिलेले नाही. आज एका पक्षात असलेला नेता उद्या कोणत्या पक्षात जाईल, याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांतील नेत्यांवर लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. आयुष्यभर सत्तापदे उपभोगून संघर्षाची वेळ आली, की हत्यारे टाकून सत्ताधारी पक्षात प्रवेश आणि पुन्हा सत्तापदे असा उद्योग सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या मतदानाची किंमत शून्य होत आहे. Ashok Chavan Latest News

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर लागलीच भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी आमदाराचा खासदार झालो, असे सहसा घडत नाही, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. भाजप प्रवेशानंतर 23 फेब्रुवारी रोजी ते पहिल्यांदाच नांदेडमध्ये आले. त्यावेळी ते बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक चव्हाण यांचे वडील दिवंगत शंकरराव चव्हाण यांना काँग्रेसने दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री केले होते. त्यांना केंद्रातही महत्त्वाचे मंत्रिपद मिळाले होते. स्वतः अशोक चव्हाण यांनाही काँग्रेसने दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री केले, राज्यात मंत्रिपदे दिली. खासदारकीची संधी दिली. त्यांच्या पत्नींना विधानसभेची उमेदवारी दिली. वडील आणि मुलगा दोन वेळा मुख्यमंत्री होण्याचे हे पहिलेच उदाहरण होते. तरीही गंमत अशी की अशोक चव्हाण यांना त्याचे काहीही वाटत नाही. आमदाराचा खासदार होणे, याचे मात्र त्यांना आता अप्रूप वाटायला लागले आहे. वडील आणि मुलगा राज्याचे प्रत्येकी दोन वेळा मुख्यमंत्री होतात, हे मात्र सहसा घडते, असे चव्हाण यांना वाटत असेल.

दोनदा मुख्यमंत्रिपद, मंत्रिपद, खासदारकी, आमदारकी मिळूनही मराठवाड्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी अशोक चव्हाण यांनी काय प्रयत्न केले, हा संशोधनाचा विषय ठरावा इतका गहण आहे. भाजपमध्ये जाऊन आमदाराचे खासदार झाल्यानंतर मात्र मराठवाड्यात त्या पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली, त्यावेळी ती यशस्वी करण्यासाठी मोठा वाटा नांदेड जिल्ह्याचा, म्हणजेच पर्यायाने अशोक चव्हाण यांचा होता, हे नाकारता येणार नाही. असे असतानाही पक्षश्रेष्ठींची त्यांचे कुठे बिनसले असेल, हे कळायला मार्ग नाही. त्याबाबत अशोक चव्हाणही फारसे बोललेले नाहीत.

अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्श गृहनिर्माण सोसायटीच्या घोटाळ्यात त्यांचे नाव आले होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्रिपद गेले तरी त्यांचा पक्षातील दबदबा कायम होता. केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेसच्या काळातील गैरव्यवहारांची श्वेतपत्रिका संसेदत मांडली. अर्थातच त्यात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. त्याच्या तीन-चार दिवसांनंतर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने लागलीच त्यांच्यासाठी राज्यसभेचे दरवाजे उघडे केले. फक्त विरोधी पक्षातीलच नेते भ्रष्टाचारी असतात, असा विचार जनमानसांत रुजवण्यात भाजपला यश आल्यासारखे दिसत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप असलेले विरोधी पक्षांतील नेत्यांचे धाबे दणाणले आहे, ते हतबल झाले आहेत.

आपल्या भ्रष्टाचाराचा संसदेत उल्लेख केला जातो आणि तोच पक्ष आपल्याला त्यांच्यासोबत घेऊन राज्यसभेत पोहोचवतो, याचे अशोक चव्हाण यांना कौतुक वाटणे साहजिक आहे. डोक्यावरची टांगती तलवार हटली की माणसाला हायसे वाटते. तसाच हा प्रकार आहे. त्यामुळे आमदाराचे खासदार झाल्याचे कौतुक वाटणेही साहजिक आहे, मग वडील दोनदा मुख्यमंत्री झाले काय आणि स्वतः दोन वेळा मुख्यमंत्री झाले काय... याचा विसर पडतोच. मतदार आपले फारसे काही बिघडवू शकणार नाहीत, असा समज किंवा गैरसमज झाला की अशा राजकीय प्रवृत्तींना बळ मिळत जाते. राज्यात आणि देशात सध्या तेच होते आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Ashok Chavan Latest Statement
Delhi Lok Sabha Election 2024: अखेर ठरलं! दिल्लीत 'आप'ची काँग्रेससोबत 'हात' मिळवणी; 'या'फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com