BJP Local Body Elections 2025: ‘स्थानिक स्वराज्य’साठी भाजपचा पुन्हा ‘माधव पॅटर्न’

BJP Revives ‘Madhav Pattern’ for 2025 Local Elections: भाजपने ‘ओबीसी’ मतदारांची हक्काची मतपेढी अधिक मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा ‘माधव पॅटर्न’ (माळी-धनगर-वंजारी) राबविण्यास सुरुवात केली आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यात झालेले मंथन अन् या सोहळ्यात ‘ओबीसी’ आरक्षणाचा राग आळवला गेला आहे.
BJP Revives ‘Madhav Pattern’ for 2025 Local Elections
BJP Revives ‘Madhav Pattern’ for 2025 Local ElectionsSarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने ‘ओबीसी’ मतदारांची हक्काची मतपेढी अधिक मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा ‘माधव पॅटर्न’ (माळी-धनगर-वंजारी) राबविण्यास सुरुवात केली आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यात झालेले मंथन अन् या सोहळ्यात ‘ओबीसी’ आरक्षणाचा राग आळवला गेला आहे.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा मोठा कार्यक्रम चौंडी येथे ३१ मे रोजी झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी उपस्थित होते. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘ओबीसी’ आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून त्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रद्द झालेले २७ टक्के ‘ओबीसी’ आरक्षण कायम राहिले आहे. त्यामुळे ‘ओबीसी’ प्रवर्गात समाधानाचे वातावरण आहे.

अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती भाजपने मोठ्या प्रमाणात साजरी केली. त्यासाठी जिल्हानिहाय, शहरात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. कार्यक्रमासाठी भाजपने मोठी यंत्रणा कामाला लावली होती. अहिल्याबाईंचे धर्मरक्षणाचे कार्य हा हिंदुत्वाचा विषय आहेच. पण धनगर समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न आगामी निवडणुकीसाठी ही साखरपेरणी ठरणार आहे.

जिल्हाध्यक्ष निवड पेच सुटला

भाजपने राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. पहिल्या यादीत अनेक ठिकाणी जुन्याच जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांना संधी दिली आहे. पण काही ठिकाणी निवडीवरून पक्षात अंतर्गत वादंग निर्माण झाल्याने तेथील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आले होते. यात नाशिक, नाशिक उत्तर, नाशिक दक्षिण, अहिल्यानगर, कोल्हापूर, पालघर, वसई विरार, पुणे ग्रामीण बारामती, गडचिरोली, चंद्रपूर, चंद्रपूर ग्रामीण, वर्धा या प्रमुख ठिकाणच्या अध्यक्षांची निवड करताना भाजप नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यात या रखडलेल्या निवडीबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजप नेत्यांना हा तिढा सोडवावाच लागला. पण त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी संपलेली नाही. या वादातील जागांवर आगामी काळात नजर ठेवून काम करून घ्यावे लागणार आहे. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत

फडणवीस वैतागले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका प्रकट मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे संवादात चांगले नाहीत, असे स्पष्टपणे सांगून टाकले. पक्षांतर्गत किंवा राज्य सरकारमधील सहकाऱ्यांवर फडणवीस हे उघडपणे काही बोलत नाहीत. पण यावेळी मात्र त्यांनी बोलताना आडपडदा ठेवला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून तिन्ही घटक पक्षांमध्ये म्हणावा तसा समन्वय नाही.

भाजप बहुमताच्या आसपास असतानाही एकनाथ शिंदेंची शिवसेना अन् अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला सोबत ठेवावे लागले आहे. त्यात शिंदे-पवार यांच्या आमदारांतील सुप्त संघर्ष आता उघडपणे जनतेपुढे येत आहे. त्यातच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य जनतेमध्ये सरकारबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे. शिवसेना व ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांमुळे सरकारला ‘बॅकफूट’वर यावे लागत असल्याने फडणवीस वैतागले आहेत. त्यामुळेच त्यांनी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांबद्दल ‘हे संवादात चांगले नाहीत’ असे मत नोंदवून कान टोचले आहेत.

दुसरीकडे अमित शहा अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरून नाराज नसल्याचेच दिसून आले. भाजपच्या आमदारांनी शहांकडे अजित पवार यांच्याबद्दल तक्रारी केल्यानंतर त्यांनी उलट भाजप नेत्यांनाच ‘तुम्ही अजित पवारांच्या मागे लागा, कामाचा एवढा पाठपुरावा करा की त्यांनीच माझ्याकडे तुमची तक्रार केली पाहिजे’ असा उलट सल्ला दिला आहे. त्यामुळे राज्यातील नेते अजित पवारांवर वैतागले असले तरी दिल्ली मात्र अजित पवारांवर खूष असल्याचे स्पष्ट झाले.

शहांचा महाराष्ट्र दौरा

अमित शहा यांनी नागपूर, नांदेड आणि मुंबई असा दोन दिवसांचा दौरा केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी शहा यांनी विभागनिहाय दौरे करून बैठका घेतल्या होत्या. महाराष्ट्रात पुढील तीन-चार महिने तरी कोणत्याही निवडणुका नाहीत. असे असताना शहा यांची नांदेड येथे झालेला दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आल्यानंतर शहा हे प्रथमच नांदेडमध्ये गेले. आतापर्यंतच्या इतिहासात नांदेड महापालिका, जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता मिळवता आली नाही. चव्हाण यांच्यामुळे आता ही संधी निर्माण झाली आहे. तसेच या दौऱ्याचा प्रभाव मराठवाड्यातील लातूर, परभणी, हिंगोली या नांदेडलगतच्या जिल्ह्यांवरही पडणार आहे. शहा यांच्या दौऱ्यात ‘पुणे, नाशिक, ठाणे अशा प्रमुख महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची तयारी करा,’ असा सल्ला पदाधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यामुळे शहा याचा हा दौरा पक्ष संघटनेला बळकटी देणारा ठरला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com