Loksabha Election 2024 : गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यांनी अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथे भेटी दिल्यात. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या वेळी स्थानिक, राज्यस्तरीय भाजप नेत्यांनी अनेक लोकसभा मतदारसंघांवर दावा केला. यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांवर भाजपने दावा केला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये चलबिचल आहे. या निमित्त अमित शाह यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विधानसभा निवडणुकीचे मोठे चाॅकलेट भाजपने देऊ केले असून, लोकसभा निवडणुकीत 400 पार चा मंत्र भाजपचे सर्वच नेते जपत आहेत. त्यांनी मित्र पक्षांना अपेक्षित जागा देण्यास नकार दिल्याची माहिती असून, शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांना भाजपच्या राष्ट्रीय नेते मंडळीसमोर नमते घ्यावे लागेल काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या वेळी नमते घेत विधानसभा निवडणुकीत हव्या तितक्या जागा पदरी पाडण्याची तयारी या नेत्यांना करावी लागेल. पण, भाजप ज्या आक्रमकपणे लोकसभा जागांवर दावा करत आहे ती आक्रमकता पाहता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या वेळी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 23 जागा लढवित 18 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस ने 19 जागा लढविल्या होत्या 4 जागा जिंकल्या होत्या. पण, दोन्ही पक्षांच्या फुटीनंतर यात मोठा फरक खासदारांच्या संख्याबळावर दिसून आला. आता शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे यांच्याकडे 13 खासदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्याकडे एक खासदार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे रायगड लोकसभेची जागा आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेला केवळ 11 जागा देण्याची तयारी भाजपने केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 13 खासदार असताना त्यांना 11 जागांवर समाधान मानावे लागेल. आता नेमके कोणते दोन लोकसभा मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात गेले हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. या दोन खासदारांचे पुनर्वसन कसे करणार हा ताप शिंदे यांच्या डोक्याला राहणार आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा 18 जागा दावा, तर भाजपने धुडकावून लावला. त्याच बरोबर त्यांच्याकडे असलेल्या 13 जागांपैकी केवळ 11 जागा देत शिवसेनेला समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे शिंदे सेनेत चांगलीच चलबिचल सुरू आहे. त्यात केसरकरांनी आदित्य ठाकरे अमित शाह यांना भेटल्याचे सांगून शिवसेनेत खळबळ माजून टाकली आहे. शाह महाराष्ट्रात असतानाच बरोबर केसरकर यांनी आदित्य ठाकरे हे अमित शाह यांना भेटल्याचा गौप्यस्फोट करण्याचे कारण काय होते हे हळूहळू उलगडत जाईल. 13 विद्यमान खासदारांपैकी दोन खासदारांना डच्चू तर बसेल पण, त्या जागा भाजपच्या ताब्यातदेखील जाणार आहे. भाजप शिंदे गटाच्या शिवसेनेच्या 2 जागा आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 2019 मध्ये जिंकलेल्या 5 जागा आणि हरलेल्या 5 जागा स्वतःच्या ताब्यात घेत तिथेदेखील भाजप उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडे शिवसेनेच्या एकूण 12 जागा जाणार असे चित्र आज तरी दिसून येत आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत 25 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी 21 जागांवर भाजप खासदार विजयी झाले होते. असे विजयी खासदार आणि शिवसेनेच्या ताब्यातील 12 असे एकूण 33 जागांवर भाजप लढण्याची शक्यता राजकीय गोटातून व्यक्त केली जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागा पदरी पडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 13 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला पक्षाने 10 लोकसभा मतदारसंघांवर दावा केला होता. पण, पदरात केवळ 4 लोकसभा मतदारसंघ पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अशा सर्व परिस्थितीत 400 पार चा भाजपचा नारा पाहता त्यादृष्टीने मित्रपक्षांना भाजपला साथ द्यावी लागेल. 2047 मध्ये विकसित भारत पाहण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आता लोकसभा निवडणुकीत त्याग करावा लागणार आहे. भाजपच्या 400 पार चा नारा पाहता त्यात केवळ मित्रपक्षांना 30 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात महाराष्ट्रातील किती असा प्रश्न कायम आहे. महाराष्ट्रात मित्रपक्षाला 15 जागा दिल्या जात असतील तर मित्रपक्षावर सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा दबाव कायम राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर लगेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक आहे. असे असताना त्या दृष्टीने महायुतीच्या चर्चेत नेमके किती जागांवर भाजपने मित्र पक्षांना होकार दिला हे मात्र गुलदस्तात आहे. भाजपने दोन्ही मित्रपक्षांना विधानसभेचे काही आश्वासन दिले की नाही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच काय ते सांगू शकतील. लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता आता तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे नेमते घेतील अशी च काय ती चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या मुद्यांवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शह देत लोकसभेचे गणित फिक्स केल्याची चर्चा आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर केंद्रात मिळणारे मंत्री पद किमान 2024 मध्ये या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या पदरी पडेल काय ? अशी विचारणा सामान्य कार्यकर्ता करत आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.