Modi- Shah Politics : आमदार फोडले, पक्ष बळकावले; तरीही सत्ताधाऱ्यांना ठाकरे - पवारांचा धसका...?

Lok Sabha Election 2024 News : पक्षांची ही फोडाफोडी राज्यापुरती मर्यादित राहिली नाही, अन्य राज्यांतही विरोधकांचे आमदार फोडण्यात आले. एवढे सगळे करूनही भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भीती का वाटत असेल?
Amit Shah, Sharad Pawar
Amit Shah, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Political News : गेल्या दोन - अडीच वर्षांपासून राज्यात फोडाफोडी, राजकीय नेत्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या पाहिल्या की, राजकारणाची किळस आल्याशिवाय राहणार नाही. या काळात राज्यातील दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली. फुटलेले आमदार भाजपसोबत गेले आणि सत्तेत सामील झाले. त्यामुळे मूळ पक्ष कमकुवत झाले. त्यांच्याकडे बोटावर मोजण्याइतकेच आमदार शिल्लक राहिले. तरीही केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला या पक्षांची भीती वाटत आहे, त्याला कारणेही तशीच आहेत.

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे आणि महत्त्वाचे नाव आहे. त्यांना टाळून राज्यातील राजकारण करणे अशक्य असते. राजकारणाचा त्यांचा इतका प्रदीर्घ अनुभव असलेला, संघर्ष केलेला, चढ-उतार पाहिलेला दुसरा नेता राज्यात नाही. त्यांचा जनसंपर्क इतका दांडगा आहे की, राज्यातील गावागावांतील कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखतात. दुसरे महत्त्वाचे नाव आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे. हे नावही राज्यातील घराघरांत पोहोचलेले आहे.

Amit Shah, Sharad Pawar
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा मास्टरस्ट्रोक; मोठ्या पक्षाची साथ मिळणार?

या दोन्ही नेत्यांचे पक्ष गेल्या दोन-अडीच वर्षांत फोडण्यात आले. त्यांची कोंडी करण्याची एकही संधी सत्ताधाऱ्यांनी सोडली नाही. हे दोन्ही नेते कमकुवत झाले आहेत, संपले आहेत, अशी उपरोधिक टीका भाजप आणि अन्य सत्ताधारी पक्षांकडून सातत्याने केली जाते. ते संपले असतील तर मग वारंवार त्यांच्या नावाचा जप प्रबळ अशा सत्ताधाऱ्यांकडून का केला जात असेल?

याचे उत्तर अत्यंत सोपे आहे. भाजप (BJP) आणि सत्ताधारी अन्य पक्षांना शरद पवार आणि ठाकरे यांना संपवण्याचा अतोनात प्रयत्न केला गेला. पक्षासह पवार यांच्या तर घरातही फूट पाडण्यात आली. शरद पवारांच्या एकेकाळच्या निकटवर्तीयांनी जिव्हारी लागेल अशी टीका त्यांच्यावर सुरू केली. त्यांच्या वयाचा मुद्दा उकरून काढण्यात आला. या टीका, आरोप करणाऱ्यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्तेचे सर्व लाभ दिले होते, पक्षसंघटनेतील महत्त्वाची पदे दिली होती. याद्वारे राजकारणातील सुसंस्कृतपणाच्या सर्व चौकटी मोडीत निघाल्याचे राज्याने पाहिले. शरद पवार यांच्या आधी हे सर्व प्रसंग उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आले होते. दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या त्या वेळी त्या आरोपांना उत्तरे दिली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या दोन्ही पक्षांसह काँग्रेसही फोडण्यात आली. मुख्यमंत्री, मंत्री राहिलेले, पक्षसंघटनेत महत्त्वाची पदे उपभोगलेले नेतेही काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. विरोधी पक्षांना निवडणुकीपर्यंत टप्प्या-टप्प्याने गळती लागत राहील, याची भाजपकडून जाणीवपूर्वक काळजी घेण्यात आली. भाजप आणि सहयोगी पक्षांचे नेते तसे संकेत वारंवार देत होते.

राज्यात कधी भूकंप होणार याच्या तारखा जाहीर करत होते. विरोधी पक्षच नको, अशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांची वाटचाल सुरू होती. पक्षांची ही फोडाफोडी राज्यापुरती मर्यादित राहिली नाही, अन्य राज्यांतही विरोधकांचे आमदार फोडण्यात आले. एवढे सगळे करूनही भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भीती का वाटत असेल?

राज्याच्या दौऱ्यावर येणारे भाजपचे केंद्रीय नेते पवार आणि ठाकरे यांच्यावर टीका करायला विसरत नाहीत. राज्यात दोन - अडीच वर्षे आणि केंद्रात 10 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. या दहा वर्षांत भाजपने काय केले, किती लोककल्याणकारी योजना राबवल्या, किती बेरोजगारांना काम दिले, जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? निवडणुकीच्या निमित्ताने या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित असतात. हे न करता महाराष्ट्रात आले की, केंद्रातील सत्ताधारी नेते पवार आणि ठाकरे यांच्यावर निशाणा साधत असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मंगळवारी राज्याच्या दौऱ्यावर होते. त्यादरम्यान त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केली.

Amit Shah, Sharad Pawar
Loksabha election 2024 : उमा खापरेंनी सांगितला 'मावळ'वर दावा! म्हणाल्या, 'उमेदवार कमळाच्या...'

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार यांच्याबाबत राज्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूती निर्माण झाली होती. ती कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केले, मात्र त्याचा उपयोग झाला नसेल का, अशी शंका सत्ताधाऱ्यांकडून या दोन नेत्यांवर अद्यापही केल्या जाणाऱ्या टीकेवरून येते. आपल्या 10 वर्षांच्या सत्तेच्या काळातील हिशेब न देता सत्ताधारी आता विरोधकांना त्यांच्या काळातील हिशेब मागत आहेत.

पक्षफुटीमुळे अनेक ठिकाणी विरोधकांकडे नेते, कार्यकर्त्यांची वानवा निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी आहे म्हणून ठीक, अन्यथा वेगळे लढले तर तिन्ही घटकपक्षांना अनेक ठिकाणी उमेदवारही मिळणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. जेथे विरोधक अत्यंत कमकुवत झाले आहेत तेथे आता जनताच विरोधकांची भूमिका निभावणार की काय, अशी परिस्थिती आहे. विरोधक इतके कमकुवत झालेले असतानाही सत्ताधाऱ्यांनी मात्र अजूनही शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा धसका घेतल्याचे दिसत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Amit Shah, Sharad Pawar
Nitin Gadkari : नितीन गडकरींचं काम खूप मोठं, त्यांना कुणीच छोटं करू शकत नाही..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com