

Suhas Shirsat News : जालना छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अनपेक्षितपणे सुहास शिरसाठ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकत भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. शिवसेनेकडे असलेली ही जागा भाजपने संख्याबळाच्या जोरावर आणि दबाव तंत्राचा वापर करत खेचून आणली.
सुहास शिरसाट यांचे नाव कुठेही संभाव्य उमेदवारांच्या यादीत नसताना थेट त्यांनी उमेदवारी मिळवली. शिरसाट यांची उमेदवारी मिळने, हा भाजपमधील इतर इच्छुकांसाठी मोठा धक्का होता.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना विधान परिषदेवर घेतले जाईल, अशी दाट शक्यता होती. गेल्या वेळी त्यांची संधी हुकली मात्र जालना महापालिकेत भाजपची शतप्रतिशत सत्ता आणण्यात त्यांचा असलेला सिंहाचा वाटा पाहता पक्ष नेतृत्व त्यांना संधी देईल अशी अपेक्षा होती.
महानगर प्रमुख भास्कर दानवे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र या सर्वांवर मात करत फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते सुहास शिरसाट यांचे नाव जाहीर झाले. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीतच सुहास शिरसाट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जाते.
हरिभाऊ बागडे यांचा फुलंब्री विधानसभा मतदारसंघ जीव की प्राण आहे. 2024 मध्ये सुहास शिरसाट यांनी उमेदवारीवर दावा केला होता. मात्र त्यावेळी चव्हाण की शिरसाट? अशा विवंचनेत हरिभाऊ बागडे होते. त्यावेळी त्यांनी आपले वजन अनुराधा चव्हाण यांच्या पारड्यात टाकले.
विधान परिषदेसाठी रविवारी भाजपच्या उमेदवारांमध्ये सुहास शिरसाट यांचे नाव जाहीर झाल्यानंतर फडणवीस बागडे भेटीचे हे फलित असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. सुहास शिरसाठ हे हरिभाऊ बागडे यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जातात. संघटनात्मक विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. फुलंब्रीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.
सुहास शिरसाट यांच्या उमेदवारीने बागडे नाना यांची अजूनही फुलंब्री मतदारसंघाकडे आणि आपल्या समर्थकांकडे बारकाईने लक्ष असल्याचे दिसून आले आहे. फुलंब्री मतदारसंघात आता दोन आमदार झाल्यामुळे काही प्रमाणात सत्तेचे विकेंद्रीकरण देखील होणार आहे. महायुतीकडे बहुमत असल्यामुळे सुहास शिरसाट यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेसोबत युती न करता स्वबळावर महापालिका लढण्याचा निर्णय देखील गोरंट्याल यांचाच होता. भाजपाची एकहाती सत्ता आणत आपला निर्णय किती योग्य होता, हे गोरंट्याल यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांच्या या कामगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड खुश झाले. गेल्या वेळी विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी कैलास गोरंट्याल यांच्या नावाचा विचार होईल अशी दाट शक्यता होती. मात्र त्यावेळी त्यांच्या पदरी निराशा आली.
17 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर जालना संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून कैलास गोरंट्याल हेच उमेदवार असतील असे छातीठोकपणे सांगितले जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेत गोरंट्याल समर्थक नगरसेवकांनी घातलेला राडा, हत्यारांचा झालेला वापर आणि आपल्याच पक्षाच्या सभापतीवर हल्ल्याचा प्रयत्न याचे पडसाद कुठेतरी पक्षात उमटले. महापालिकेतील भाजपचे स्थायी समिती सभापती मकरंद पांगारकर यांच्यावर गोरंट्याल समर्थक नगरसेवकांनी जीवघेणा हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न गोरंट्याल यांच्या उमेदवारीसाठी अडसर ठरल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.
कैलास गोरंट्याल आमदार झाले तर त्यांचा जिल्ह्यात आणि राज्यातील नेतृत्वाकडेही प्रभाव वाढेल, यातून पक्षांतर्गत विरोधक त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून प्रयत्न करत होते. आणि विरोधकांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात आहे. भास्कर दानवे यांचा दावा तितकासा प्रबळ नव्हता केवळ कैलास गोरंट्याल यांना स्पर्धा असावी म्हणून भास्कर दानवे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती अशीही चर्चा आहे.
जालना छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर शिवसेनेचे प्राबल्य होते. मात्र दुभंगलेली शिवसेना आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपचे वाढलेले संख्याबळाच्या जोरावर भाजपने ही जागा सोडवून घेतली. शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर यांच्यासाठी तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाठ, खासदार संदिपान भुमरे यांचे नेतृत्वही जागा सोडवून घेण्यात कमकुवत ठरले.
जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला दूर ठेवत सत्ता मिळवली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खासदार आणि सहा आमदार अशी मोठी ताकद असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घसरणीमुळे शिवसेनेला भाजप पुढे इथे लोटांगण घालावे लागले. याचे दूरगामी परिणाम शिवसेनेला भविष्यात भोगावे लागणार आहेत.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि सहा आमदार आहेत. जालना छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे आता जिल्ह्यात चार आमदार होणार आहेत. शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीत आता पुढे येऊ द्यायचे नाही, अशीच रणनीती स्थानिक आणि राज्य पातळीवरून आखली जात असल्याचे यावरून स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.