
भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार, याची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मुदत संपून काही महिने उलटले आहेत. पण तरीही भाजपच्या पातळीवर अध्यक्ष निवडीसाठी फारशा हालचाली होताना दिसत नाहीत. अंतर्गत चर्चा किंवा प्रक्रिया सुरू असेलही पण नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे त्याला ब्रेकलाही लागलेला असू शकतो. यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विधान.
संसदेच्या हिवाळी अधिवेशात संविधानावरील चर्चेदरम्यान अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील विधानावरून विरोधकांनी रान उठवले आहे. शहांनी आंबेडकरांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. देशभरात शहांच्या विधानाविरोधान आंदोलन सुरू आहे. त्याला भाजपकडून तितकेच जोरकसपणे प्रत्युत्तर दिले जात आहे. पण असे असले तरी भाजप बॅकफुटवर असल्याचे सध्याचे चित्र आहे.
संविधान आणि आंबेडकरांचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीतही गाजला होता. भाजपचा 400 पारचा नारा आणि भाजपच्या काही खासदारांनी संविधान बदलासाठी 400 खासदार हवे असल्याचे केलेले वादग्रस्त विधान... काँग्रेससह इतर विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरत भाजप संविधान बदलणार असल्याचा प्रचार निवडणुकीत केला. डॉ. आंबेडकर पुन्हा आले तरी संविधान बदलू शकत नाहीत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपने त्यातून सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण तोपर्यंत सोशल मीडियाने आपले काम केले होते.
निवडणुकीच्या निकालानंतर भाजपसह एनडीएच्या जागा 300 च्या आतच राहिल्या. संविधान बदलाबाबत विरोधकांनी निर्माण केलेल्या फेक नॅरेटिव्हमुळे प्रामुख्याने महाराष्ट्रात जागा कमी झाल्याचा दावा येथील नेत्यांनी केला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, दलित मते भाजपपासून दुरावली होती. त्यामुळेच नरेंद्र मोदींनी विजयानंतर पहिल्यांदा संसदेत पाऊल ठेवताच संविधानावर माथा टेकवला होता.
आता शहांच्या विधानावरून पुन्हा एकदा संविधान आणि आंबेडकरांचा मुद्दा काँग्रेसने बाहेर काढत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसनेच आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान केल्याचा पलटवार भाजप करत आहे. आता काँग्रेसवर थेट वार करण्यासाठी भाजपकडून अध्यक्षपदासाठी दलित चेहऱ्याचा विचार केला गेल्यास नवल वाटायला नको.
विरोधकांचे राजकारण जिथे थांबते, तिथून भाजपचे राजकारण सुरू होते, असे म्हणतात. त्यामुळे विरोधकांची तोंडे बंद करण्यासाठी भाजपकडून अध्यक्षपदासाठी मोठे पाऊल उचलले जाऊ शकते. मोदी-शहांनी यापूर्वी दिलेले राजकीय धक्के अजूनही विस्मरणात गेलेले नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.