

Mumbai Politics : मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाला, त्या वेळेस ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना शिंदे पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला असतानाही त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारी ही विलक्षण निवडणूक ठरली आहे. या निवडणुकीने उद्धव ठाकरेंना लढण्यासाठी बळ दिले, तर एकनाथ शिंदेंना त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा आता खाली बसला आहे. सत्ताधारी भाजपने अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र, या संपूर्ण निवडणुकीत राज्याचे आणि देशाचे लक्ष लागून राहिले होते ते मुंबई महापालिकेकडे. मुंबईत भाजपने ८९ आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने २९ जागा जिंकून बहुमताचा ११४चा आकडा पार केला असला, तरी या विजयापेक्षा सर्वाधिक चर्चा रंगली ती उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या कडव्या झुंजीची.
शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला मोठी घरघर लागली होती. २०१७च्या निवडणुकीत निवडून आलेले आणि त्यापूर्वीचे असे १२०हून अधिक माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले होते. नगरसेवकांसोबतच स्थानिक शाखाप्रमुख आणि कार्यकर्तेही पक्ष सोडत असल्याने मुंबईतील ठाकरे यांच्या शाखांचे जाळे पार विस्कळित झाले होते. साधनसामग्री आणि हक्काचे चिन्ह (धनुष्यबाण) हातचे गेल्यामुळे ही निवडणूक ठाकरेंसाठी केवळ अस्तित्वाची नव्हे, तर ‘ठाकरे’ नावाचे वलय टिकवण्याची लढाई होती. मात्र, निवडणुकीच्या निकालांनी सिद्ध केले की, महापालिकेत ‘शिवसैनिक’ आणि ‘मुंबईकर’ आजही ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत.
या निवडणुकीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) घेतलेली भूमिका. मुंबईच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झालेला समझोता ठाकरेंच्या पथ्यावर पडला. पूर्वी मनसेमुळे शिवसेनेची मराठी मते फुटायची आणि त्याचा फायदा भाजपला व्हायचा. मात्र, यावेळी तो फटका बसला नाही. मनसेने सहा जागा जिंकल्या असल्या, तरी मनसेने शिवसेना ठाकरे पक्षाला प्रचारात चांगली साथ दिली. ‘
मराठी अस्मिता’ वाचवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एका अदृश्य धाग्याने जोडले गेल्याचा परिणाम मतपेटीवर दिसून आला. यामुळेच भाजप-शिंदे युतीला काठावर रोखण्यास ठाकरे बंधूंना यश मिळाले. ठाकरे बंधूंच्या शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या सभेचा उल्लेख करावा लागेल. या सभेतील राज ठाकरेंच्या भाषणाने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यास मोठी भूमिका बजावली. मात्र प्रचाराच्या माध्यमातून जे सांगायचे आहे, तो मुद्दा पटून मतमेटीत बंधिस्त करण्यासाठीची प्रक्रिया अपुरी राहिल्याने ठाकरे बंधूंचा वारू रोखला गेला.
मुंबईत काही वर्षांपासून मराठी भाषेला मिळणारे दुय्यम स्थान, गुजराती समाजाचे वाढते प्राबल्य, मांसाहार करणाऱ्यांना घरे नाकारण्याचे वाढते प्रकार आणि मुंबईतील मराठी टक्का कमी होण्यावरून सुप्त संताप होता. या प्रश्नांना वाचा शिवसेनाच फोडू शकते याचा विश्वास लोकांमध्ये आहे. उद्धव ठाकरे यांनी नेमके यावरच बोट ठेवले. उद्धव ठाकरे यांची मुंबई, ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्येकी एक अशा केवळ चार सभा झाल्या. मात्र ठाकरेंनी मुंबईतील शाखा-शाखांमध्ये प्रत्यक्ष भेटी देत स्थानिक पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न केला.
शाखांमध्ये उद्धव ठाकरे स्वत: गेल्याने शिवसैनिकांनाही आत्मविश्वास मिळत होता. त्यामुळे मोठ्या सभांऐवजी शाखा भेटीचा उपक्रम ठाकरेंना फायद्याचा ठरला. ‘मुंबईत ठाकरेच हवे’ याचा मतदारांनी विचार केला. मुंबईतील लालबाग, परळ, वरळी या पट्ट्यात शिवसेना ठाकरे पक्षाच्या निवडून आलेल्या जागा पाहता मराठी भाषिकांमध्ये ठाकरेंचे वलय, आकर्षण कायम असल्याचे स्पष्ट होते. शाखांचे जाळे विस्कळित असूनही शिवसेना ठाकरे पक्षाने ६५ जागा जिंकून महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला. या निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या शाखा नव्याने बांधण्याची आवश्यकता असल्याचे उद्धव ठाकरेंच्या आता लक्षात आले आहे. त्यामुळेच तरुणांना रोजगारासाठी मार्गदर्शन केंद्र उघडण्याचा नवीन उपक्रम त्यांनी जाहीर केला आहे. नियमित शाखांना भेट देणार असून, पक्ष बांधणीसाठी ते स्वत: मैदानात उतरणार असल्याने शिवसैनिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
शिवसेनेला मिळालेला जनाधार हा अधिक नोंद घेण्यासारखा आहे. २०१७ मध्ये शिवसेनेला २२७ जागा लढवून १४ लाख ४३ हजार ९३९ मते मिळाली होती. पक्ष फुटीनंतर शिवसेना ठाकरे पक्षाने १६४ जागा लढवून ६५ जिंकल्या आहेत. त्यांना १३ लाख २३ हजार २७९ (२४.२२ टक्के) मते मिळाली आहेत. मनसेच्या ६ जागा निवडून आल्या असल्या तरी ३ लाख ३२ हजार ९६० मते त्यांना मिळाली आहेत. शिवसेना शिंदे पक्षाने ९० जागा लढवून त्यांच्या २९ जागा निवडून आल्या आहेत. त्यांना ६ लाख ९८ हजार २८९ ( १२.७८ टक्के) मते मिळाली आहेत. शिवसेना ठाकरे आणि मनसे या युतीला मिळालेल्या मतांवरून मुंबईत मराठी मताला दुहीचा शाप नसेल, तर मराठी अस्मितेचे राजकारण टिकवण्यासाठी याही पुढे वाव असणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभाला षण्मुखानंद हॉलमध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणे, हे या निवडणुकीनंतरचे सर्वांत मोठे राजकीय संकेत होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ‘मुंबईवरचा भगवा उतरवून तुम्हाला काय मिळाले? फक्त एक महापौर पद?’ हा त्यांचा सवाल शिंदेंच्या सत्तेला नैतिकदृष्ट्या कमकुवत करणारा आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अत्यंत समर्पकपणे पक्षफुटीचे वर्णन केले. ते म्हणाले, ‘पाने सडली की गळून पडतात, पण त्यानंतरच झाडाला नवी पालवी फुटते.’
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीने सत्ता मिळवली असली, तरी नैतिक विजय हा उद्धव ठाकरे यांचाच झाला आहे. विस्कळित संघटना, पक्ष सोडून गेलेले नेत्यांपासून नगरसेवकांपर्यंत आणि आर्थिक बळाचा अभाव असतानाही ६५ जागा जिंकणे ही सामान्य बाब नाही. मात्र मुंबईबाहेर ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या महापालिकांमध्ये आलेले अपयश ठाकरेंसाठी चिंतेची गोष्ट आहे. पक्ष बांधणी मुंबईतच नव्हे तर राज्यभर करण्याची आवश्कता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणूक निकालांनी राज्याच्या राजकारणात एक नवा पेच निर्माण केला आहे. भाजपने ८९ जागा जिंकून स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले असले तरी, सत्तेच्या चाव्या २९ जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या हातात आहेत. वरकरणी शिंदेंची ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढल्याचे चित्र दिसत असले तरी, राजकीय गणितांच्या खोलवर गेल्यास एकनाथ शिंदे यांच्या मनात भाजपबद्दल असणारी ‘अस्तित्व संपवण्याची भीती’ या निकालांमुळे अधिक गडद झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या दशकापर्यंत मुंबईत शिवसेना (अविभक्त) ही मोठ्या भावाच्या भूमिकेत होती आणि भाजप २७ ते ३५ जागांवर निवडून येत असे. मात्र, २०१७ मध्ये भाजप मुंबई महापालिकेत स्वतंत्र लढून ८२ जागांपर्यंत पोहोचली. यावेळी भाजपने ८९चा टप्पा गाठला आहे, तर शिंदे गटाला केवळ २९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मुंबईच्या मैदानात भाजपने ज्या वेगाने आपला विस्तार केला आहे, तो पाहता भविष्यात भाजपला कोणत्याही प्रादेशिक पक्षाची गरज उरणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. हीच बाब एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरली आहे.
विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या पक्षाने ‘स्ट्राइक रेट’ राखला होता, तशी कामगिरी त्यांना मुंबई महापालिकेत करता आली नाही. शिवसेनेचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह असूनही मुंबईकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदे गटापेक्षा अधिक पसंती दिली आहे. यामुळे भाजपला आता हे उमजले आहे की, शिंदेंची ताकद केवळ ठाणे जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. एखादा मित्रपक्ष कमकुवत होतो, तेव्हा भाजप त्याला ‘गिळंकृत’ करतो किंवा बाजूला सारतो, असा इतिहास आहे. बिहारमधील संयुक्त जनता दल, उत्तर प्रदेशातील पक्ष अशी अनेक उदाहरणे आहेत.
भाजप आणि शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही. अंबरनाथ नगरपालिकेत भाजपने शिंदे गटाला शह देण्यासाठी चक्क काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षात प्रवेश करून घेतला. कल्याण-डोंबिवलीतही सत्तेसाठी भाजपने शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भाजप आपल्या बालेकिल्ल्यात (ठाणे जिल्हा) आपल्याला संपवण्यासाठी विरोधकांशी हातमिळवणी करू शकते, तर मुंबईत ते आपल्याला किती काळ सामावून घेतील? हा प्रश्न शिंदेंना सतावत आहे.
निकालानंतर लगेचच शिंदे यांनी आपल्या २९ नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. हे केवळ विरोधकांपासून संरक्षण नसून, भाजपपासूनही स्वतःच्या नगरसेवकांना वाचवण्याचा प्रयत्न आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सत्तेसाठी आवश्यक असलेला ११४चा आकडा गाठण्यासाठी भाजप शिंदे गटाचे नगरसेवक फोडू शकते किंवा त्यांना आपल्या पक्षात विलीन करून घेऊ शकते, ही भीती या ‘हॉटेल मुक्कामा’मागे दडलेली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबईचा महापौर भाजपचाच होईल’ असा जो आत्मविश्वास दाखवला आहे, तो शिंदेंच्या अस्तित्वावर घाला घालणारा ठरू शकतो. भाजपला आता मुंबईत कोणाच्याही ‘उपद्रवमूल्या’ची सवय राहिलेली नाही. मुंबई महापालिकेत भाजपचा पूर्ण वर्चस्व असलेला महापौर बसला, तर येत्या काळात मुंबईतून शिंदे गटाचे नामोनिशाण मिटवण्याचे प्रयत्न भाजपच्या यंत्रणेकडून होऊ शकतात, हे राजकीय सत्य शिंदेंना ठाऊक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.