नवी दिल्ली : पंजाबमधील रणजीत सागर धरणात 75 दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला होता. हे हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. त्यापैकी एका पायलटचा मृतदेह घटनेनंतर तेरा दिवसांनी सापडला. पण अत्याधुनिक साधनांचा वापर करूनही पायलट कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह सापडत नव्हता. अखेर रविवारी (ता. 17) 75 दिवसांनी त्यांचा मृतदेह शोधण्यात लष्कर व हवाई दलाला यश आलं आहे. ते 27 वर्षांचे होते.
पठाणकोटमधील रणजीत सागर धरणामध्ये तीन ऑगस्ट रोजी जोशी यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. तेव्हापासून लष्कर व हवाई दलाने संयुक्तपणे दोन्ही पायलटला शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. धरणाची खोली 65 ते 70 मीटर असल्याने मृतदेह सापडत होते. अखेर 16 ऑगस्ट रोजी पायलट लेफ्टनंट कर्नल ए. एस. बाथ यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे जोशी यांचाही मृतदेह लवकरच सापडेल, अशी आशा शोध घेणाऱ्याला पथकाला होती.
पण, अत्याधुनिक साधनांचा वापर करूनही जोशी यांचा मृतदेह सापडत नव्हता. पण त्यानंतरही ही मोहिम थांबवण्यात आली नाही. लष्कर व हवाई दलाने 75 दिवस शोध सुरूच ठेवला होता. अखेर रविवारी मृतदेह सापडला. धरणाच्या विस्तीर्ण जलाशय व खोलीमुळे शोध मोहिमेत अनेक अडथळे आली. धरण स्कॅन करण्यासाठी अत्याधुनिक मल्टी बीम सोनार या उपकरणाचा वापरही करण्यात आला. त्यानंतर रिमोटवरील एका साधनाद्वारे मृतदेह शोधण्यात आला.
शोध मोहिमेदरम्यान 65 ते 70 मीटर खोल तळाशी मृतदेह सापडला. स्थानिक वैद्यकीय तपासणी पथकाच्या तपासणीनंतर जोशी यांचा मृतदेह पठाणकोट येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आला. आर्मी एव्हीएशन विंगचे रुद्र हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन जोशी व त्यांचे सहकारी पायलट होते. प्रशिक्षणादरम्यानच या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. त्यांचा शोध घेण्यासाठी देशातील सर्वोत्तम साधनांचा वापर केला जात असल्याचे लष्कराकडून सुरूवातीला सांगण्यात आले होते.
दरम्यान, जंयत जोशी यांचे वडील हरीश जोशी यांनी लष्कराकडून शोधमोहीम थांबवली जाण्याची भिती काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. मृतदेह सापडेल, या आशेवर त्यांनी कोणतेही अंतिम विधी केले नव्हते. हवाई दलाकडून त्यांना काही दिवसांपूर्वी धरणाजवळ तसे करण्यास सांगितले होते. पण हरीश जोशी यांनी त्यास नकार दिला होता. मृतदेह सापडल्याशिवाय कोणताही विधी करणार नसल्याचे ते म्हणाले होते. त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडेही मृतदेहाचा लवकर शोध घेण्याबाबत याचिका केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.