सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची दोस्ती सर्व महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. दोघांचे पक्ष वेगवेगळी असली तरी त्यांनी एकमेकांची माणसे आतापर्यंत फोडली नव्हती. मात्र, आज सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले पवार यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या खास विश्वासातील, कॉंग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले आणि सोलापूरचे कॉंग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी काही महिन्यांपूर्वी त्यांनी माजी महापौर महेश कोठे यांच्यावर महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली आहे, तेही एकेकाळी शिंदे यांचे अत्यंतू विश्वासू असलेल्या (स्व.) विष्णूपंततात्या कोठे यांचे चिरंजीव आहेत, त्यामुळे पवारांनी आपल्या मित्राला जोरदार धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Congress leaders including former mayor of Solapur Nalini Chandile join NCP)
ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रदीर्घ कालावधीनंतर आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमात चंदेले, खरटमल यांच्यासह भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षाच्या सुमारे ३४ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
कॉंग्रेस पक्षाने राज्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण, निवडणुकीच्या तोंडावरच कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. सोलापुरात कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात ही भूमिका कॉंग्रेसने जाहीर केली होती. शिवाय त्याची जबाबदारी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर सोपविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. त्या दृष्टीने आमदार शिंदे यांनीही पावले टाकण्यास सुरुवात केली होती. त्यांनी शहरात कॉंग्रेसची संपर्क मोहीम सुरू केली होती. त्या कार्यक्रमात पक्षांतर केलेले हे दोन्ही शिंदे यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीला वैतागून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे.
सुधीर खरटमल हे सुशीलकुमार शिंदे यांच्या मर्जीतील नेते आहेत. त्यांनी शिंदे यांच्या अनेक निवडणुकीची जबाबदारी संभाळली आहे. तसेच, नलिनी चंदेले यांनाही कॉंग्रेसची सत्ता असताना महापौरपदाचा मान देण्यात आला होता. राष्ट्रवादीची शहराची सूत्रे महेश कोठे यांच्या हातात येत असल्याचे पाहून त्यांनीही कॉंग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. या दोघांच्या जाण्याने कॉंग्रेस पक्षासह शिंदे यांना धक्का असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, एमआयएमचे सहा नगरसेवकही राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. तेही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. याशिवाय महेश कोठे यांच्या गटाचे शिवसेनेतील काही नगरसेवकही राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा शहरात गेल्या काही दिवसांपासून रंगलेली आहे. त्यामुळे पुढील काळात शहरात पक्षांतरे वाढल्यास नवल वाटण्याचे काही एक कारण नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.