Congress in Maharashtra : लोकसभेतील आत्मविश्‍वासाने केला काँग्रेसचा घात !

Congress in Maharashtra Vidhansabha Election : निवडणूक बदलली की मतदारांचा प्राधान्यक्रम बदलतो, हा अनुभव काँग्रेसच्या लक्षातच आलेला नसावा.
Rahul Gandhi and Kharge
Rahul Gandhi and KhargeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Congress News: लोकसभा निवडणुकीत मतदारांचा मूड विधानसभेत बदलतो, हे महाराष्ट्रातील मतदारांनी २०१४ व २०१९ मध्ये दाखवून दिले होते. महायुतीला २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४० पेक्षा जास्त खासदार मिळाले तरीही जनतेने त्याच वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादीला जवळपास ८० पेक्षा जास्त ठिकाणी विजयी केले होते. निवडणूक बदलली की मतदारांचा प्राधान्यक्रम बदलतो, हा अनुभव काँग्रेसच्या लक्षातच आलेला नसावा. लोकसभेच्या यशातून आलेला आत्मविश्‍वास आणि त्या आत्मविश्‍वासाचे अतिआत्मविश्‍वासात झालेले रुपांतर लक्षात येईपर्यंत काॅंँग्रेसचा निकाल लागला होता.

लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटमुळे काँग्रेसला (Congress) विधानसभा निवडणुकीत किमान १३० जागा मिळण्याची अपेक्षा होती. महाविकास आघाडीतील जागा वाटपाची सुरुवात होण्यापूर्वीच हरियाना विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला. मित्रपक्षाला डावलल्यामुळे काँग्रेसचा पराभव, हा या निकालातून नॅरेटिव्ह सेट झाला होता. त्यातून काँग्रेस एवढी सावध झाली की महाराष्ट्रातील जागा वाटपात काँग्रेसला १०० जागांवर गुंडाळण्यात आले.

काँग्रेसने लढलेल्या १०१ जागांपैकी ७६ जागांवर भाजप (BJP) सोबत सामना झाला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी प्रचारसभा घेतल्या मात्र त्या मोदी-शहांच्या तुलनेत खूपच कमी व विस्कळित होत्या. शेतकऱ्यांना भेडसावत असलेला सोयाबिनचा दर, कापसाचा दर या मुद्यांवर काँग्रेसकडून प्रभावी हल्लाबोल झाला नाही.

‘लाडकी बहीण’वरील टीका भोवली -

महायुतीचे नेते लाडकी बहीण योजनेबद्दल बोलत होते, तर काँग्रेसचे नेते या योजनेच्या विरोधात बोलत होते. महायुती सत्तेतून गेल्यास ही योजना बंद पडेल, असा नॅरेटिव्ह मतदारांत आयत्यावेळी सेट झाला. ही बाब काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही सत्तेत आल्यावर दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली. तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. या निवडणुकीत महायुतीने आखलेल्या प्रचाराच्या ट्रॅपमध्ये ‘मविआ’चे नेते फसत गेले आणि त्यांच्या प्रश्‍नांना आपला प्रचार सोडून उत्तरे देत बसले.

Rahul Gandhi and Kharge
Nana Patole Vs Bunty Shelke : नाना पटोले अन् बंटी शेळके वाद आता पोहचला दिल्ली दरबारी!

शेतकरी हा मुद्दा सुटला आणि राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) तोंडात उद्योजक गौतम अदानी यांना भाजपची, मोदी-शहा यांची होत असलेली मदत हेच मुद्दे आले. त्यामुळे ही निवडणूक स्थानिक जनतेला आपली वाटली नाही. लोकसभा निवडणुकीत आघाडीसोबत राहिलेला मराठा-मुस्लिम-दलित मतदार विधानसभा निवडणुकीतही आपल्यासोबत राहील, असा आत्मविश्‍वास महाविकास आघाडीला विशेषतः काँग्रेसला नडला. राहुल गांधी सर्व सभांमध्ये संविधान हातात घेत होते परंतु विधानसभा निवडणूक आणि संविधान याचा ताळमेळ महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येत नव्हता.

रणनीती आखण्यात अपयश -

भाजपने लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधत त्यावर ठोस कार्यक्रम हाती घेतला. संविधान बदलणार नाही, विरोधकांनी उठविलेली ही अफवा आहे, हे पटवून देण्यासाठी भाजपने विशेष अभियान राबविले. लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरलेला मनोज जरांगे पाटील फॅक्टर आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपने मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त मराठा उमेदवारांना संधी दिली. त्यामुळे मराठा मतदारांनी आपल्या सोयीनुसार निर्णय घेत ‘सगेसोयरे’चा फॅक्टर चालविल्याचे निकालातून दिसू लागले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी जी विशेष रणनिती आवश्‍यक होती, ती रणनिती आखण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याचे दिसते.

Rahul Gandhi and Kharge
Sushma Andhare taunt Gulabrao Patil : '...याचाच दुसरा अर्थ, "रान पेटलंय" हे गुलाबराव पाटील मान्य करताय'; सुषमा अंधारेंचा टोला!

जागा वाटपातील आग्रही भूमिका, उमेदवाराचे इलेक्टिव्ह मेरिट, त्या भागातील सामाजिक स्थिती, उमेदवाराची लोकप्रियता, प्रचाराची रणनिती, महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत प्रचारात ताळमेळ फारसा दिसला नाही. काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वत:चा अजेंडा तयार करण्याऐवजी मित्रपक्षांवर अवलंबून असल्याचे दिसले. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) व उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानभूती आहे आणि त्या सहानभुतीचा आपल्याला फायदा होईल, ही गृहित धरलेली आशा काँग्रेससाठी घातक ठरल्याचेही समोर येऊ लागले आहे.

‘सांगली पॅटर्न’चे उदात्तीकरण भोवले -

लोकसभा निवडणुकीत सांगलीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस नेते विश्‍वजित कदम व विशाल पाटील यांनी विरोध केला. विरोधाला यश येत नसल्याने कदमांच्या भरवशावर पाटलांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढविली.

या निवडणुकीत महाविकासचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना फक्त ६० हजार मते मिळाली तर अपक्ष विशाल पाटील यांनी एक लाखांच्या मताधिक्याने येथून विजय मिळविला. विजयानंतर विशाल पाटील काँग्रेससोबत गेले. काँग्रेसच्या नेत्यांनी नंतर येथील उमेदवारीच्या गंमती-जमती, आतून केलेली मदत जाहीर सभांमधून जगजाहीर केली. निवडणुकीत यश मिळाल्यास बंडखोरी खपवून घेतली जाते, याचा नवीन पॅटर्नच ‘सांगली पॅटर्न’ म्हणून समोर आला.

Rahul Gandhi and Kharge
Balasaheb Thorat : थोरात विरोधकांवर कडाडले; म्हणाले, 'मीही हिंदू, जातीचे विषारी...'

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हाच ‘सांगली पॅटर्न’ आणि या पॅटर्नचे झालेले उदात्तीकरण भोवल्याचे दिसत आहे. विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने परस्पर उमेदवारी यादी जाहीर करण्याची स्पर्धाच महाविकास आघाडीत लागली होती. उमेदवारी मिळाली नाही तर ‘सांगली पॅटर्न’ राबवू, अशी भाषा ठणकावून बंडखोरांच्या तोंडात दिसत होती.

विधानसभा निवडणुकीत २१ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या, या लढतींमुळे तब्बल १७ ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसला. काँग्रेस आणि समाजवादी पक्षात सहा ठिकाणी लढत झाली, त्यातील चार जागा भाजपने जिंकल्या. शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात आठ जागांवर लढत झाली.

महाविकास आघाडीत इतर लहान-लहान पक्षांना सोबत घेण्यात, समन्वय साधण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली. महायुतीतही आठ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, त्यांना फटका मात्र फक्त दोनच ठिकाणी बसला.

दिग्गजांचा पराभव, प्रदेशाध्यक्ष काठावर -

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी, कुणालबाबा पाटील, संग्राम थोपटे, रविंद्र धंगेकर, कै. विलासराव देशमुख यांचे पुत्र धिरज देशमुख, सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना टपाली मतांनी तारल्यामुळे २०८ मतांनी त्यांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडला आहे.

एवढ्या मोठ्या पडझडीमध्ये नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, विकास ठाकरे, विश्‍वजीत कदम, ज्योती गायकवाड यांच्या रुपाने काँग्रेसने आपले पारंपारिक गड राखले आहेत. सत्ता येण्यापूर्वीच मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाचे काय झाले? याची खुमासदार चर्चा आता काँग्रेसच्या वर्तुळात रंगू लागली आहे.

पक्ष संघटनेत हवे नवे नेतृत्व -

राज्यात २०१९ च्या निवडणुकीनंतर काँग्रेस अनपेक्षितपणे सत्तेत आली. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काँग्रेसने संघटनात्मक काहीही बदल केले नाहीत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले समर्थक आणि नाना पटोले विरोधक असे दोन गट आजही कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये असलेले हेवेदावे व वाद हे शांत झाले परंतु संपले नाहीत. त्याचा मोठा परिणाम जागा वाटपाची चर्चा असो किंवा उमेदवार निवड प्रक्रियेत दिसले. काँग्रेसने आतातरी नव्या फळीला संधी देऊन पक्ष संघटनेची बांधणी आवश्‍यक आहे.

लज्जास्पद कामगिरीची नोंद -

काँग्रेसला भक्कम साथ देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची सर्वात वाईट व लज्जास्पद कामगिरी म्हणून २०२४ च्या निवडणुकीची नक्कीच नोंद होईल. काँग्रेस स्वतंत्र लढल्यानंतरही १९९९ मध्ये ७५ तर २०१४ मध्ये ४२ जागा जिंकली होती. यंदा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत असतानाही फक्त १६ जागांवर यश मिळाले आहे.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com