अजित पवार म्हणाले होते, ‘मतांच्या ओझ्याने मी वाकलो पाहिजे...अन्‌ सभासदांनी ते खरे करून दाखवले!

सोमेश्वरच्या निवडणुकीत विधानसभा निकालाची पुनरावृत्ती : भाजपच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
Ajit pawar
Ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : 'इतक्या प्रचंड मतांनी माझा पॅनेल निवडून द्या की मतांच्या ओझ्याने मी वाकलो पाहिजे' हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांनी शब्दशः खरे केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती सोमेश्वरच्या सभासदांनी केली असून सुमारे सोळा हजारांच्या भव्यदिव्य फरकाने विजयश्री बहाल करत सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले आहे. दरम्यान, यानिमित्ताने ‘भाजप’चा कारखान्याच्या निवडणुकीत थेटपणे प्रथमच प्रवेश झाला असून पराभव निश्चित असतानाही लढाईत उतरून विरोधकांची भूमिका वठविली आहे. (Deposits of all BJP candidates in Someshwar Sugar Factory elections confiscated)

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर विकास पॅनेल राज्यातील आजवरच्या सर्वात अभूतपूर्व विजयाच्या दिशेने घौडदौड करीत आहे. पवार यांनी सलग सातव्यांदा कारखान्यावर आपले एकहाती वर्चस्व राखले आहे. सायंकाळपर्यंत मोजलेल्या मतमोजणीत चार गटांत तब्बल १६ हजार मतांच्या फरकाने राष्ट्रवादीप्रणित पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले आहेत. हाच ट्रेंड यापुढेही कायम राखून राष्ट्रवादीची ऐतिहासिक विजयाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.

Ajit pawar
अजितदादांची विक्रमी कामगिरी : ‘सोमेश्वर’मध्ये राष्ट्रवादीचे सहा जण १६ हजारांच्या फरकाने विजयी

ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी एकतर्फी होणार अशीच चिन्हे कायम होती. अशातच ‘सोमेश्वर’चे परंपरागत विरोधक असलेल्या काकडे गटाने शेतकरी कृती समितीद्वारे स्वतंत्र अर्ज दाखल केले. मात्र, शेवटच्या टप्प्यात युती केली. शिवाय आमदार संजय जगताप यांनी आघाडीधर्म पाळत मनापासून साथसोबत केली. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली. सोमेश्वरच्या बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण या चारही कार्यक्षेत्रात पवारांना मानणारे आमदार असल्याने विजयाच्या मताधिक्याचीच चर्चा होती.

...अन्‌ भाजपला हात चोळत बसावे लागले

अजित पवारांनी प्रचाराच्या शुभारंभापासून नाराज मंडळींनी रूसू-फुगू नये. मी फोनबिन करणार नाही, असे सुनावले होते. भविष्यात काहींना अन्य ठिकाणी संधी आहेत, असेही आश्वासन दिले होते. यानंतरही काही ठिकाणी नाराजीनाट्य निर्माण झाले. परंतु सांगता सभेला असे फटकारले की सगळे जीव तोडून कामाला लागले. शेतकरी कृती समितीनेही आपल्या गटाचे सर्व अर्ज माघारी घेण्यात यश मिळविले. त्यामुळे नाराज उमदेवार अथवा मतांवर डोळा असलेल्या भाजपला हात चोळत बसावे लागले.

‘छत्रपतीला’ही फटकारले

खरे तर सोमेश्वर काखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांच्या संचालक मंडळाने कर्जाचा डोंगर उतरविला आणि मागील चार वर्षांत राज्यातील उच्चांकी भाव दिला. तसेच, साखर उतारा, गाळप, तांत्रिक क्षमता उजवी ठरली, हे वास्तव आहे. आजूबाजूला ‘खासगी’ जोमात वाढत असताना ‘सोमेश्वर’च्याही साखर, डिस्टिलरी, कोजनरेशन युनिटच्या विस्तारीकरणाचा विकास हाती घेतला. यामुळे सभासद समाधानी होते. अजित पवारांनी याच मुद्द्यावर प्रचार करत अडचणीत आलेल्या कारखान्यांची उदाहरणे देत अगदी स्वतः सभासद असलेल्या ‘छत्रपतीला’ही फटकारले.

Ajit pawar
‘आदिनाथ’साठी बबनदादांचा मुलगाही मैदानात : बारामती ॲग्रोला अडचण असेल तर आम्ही महिन्यात सुरू करू

सहाव्यांदा चढत्या क्रमाने पवारांवर विश्वास

‘पवार खासगी कारखानदारीचे पुरस्कर्ते आहेत’ या आरोपाची मात्रा ‘माळेगाव’प्रमाणे ‘सोमेश्वर’वर काही चालली नाही. माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुबत्ता पाहिजे; म्हणून आम्ही पवार कुटुंबीय दिवसरात्र राबतोय. काही कमी पडू देत नाही. कारखाना अजून मोठा करायचाय. गुंजवणीचे, पुरंदर उपसाचे पाणी आणायचेय, असे भावनिक आवाहन पवारांनी केले. मागील निवडणुकीतही कारखाना कर्जबाजारी असताना आणि विरोधक प्रबळ असताना अजित पवारांच्या शब्दावर सभासदांनी कारखाना त्यांना सोपविला. १९९२, १९९७, २००२, २००७, २०१५ आणि २०२१ असे चढत्या क्रमाने सहाव्यांदा अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट केला.

भाजपचा पॅनेल प्रथमच कारखाना निवडणुकीत

पराभव निश्चित असतानाही तडजोड करण्यापेक्षा लढाईत उतरणे कधीही धाडसाचे. उपमुख्यमंत्र्यांनीही समोरच्यांना कमकुवत समजून गाफील राहू नका, असे सांगत ज्याला माझे विचार पटत नाहीत, त्याने नाराज होण्यापेक्षा दिलीप खैरे, पी.के. जगतापांसारखा पॅनेल टाकावा, अशा शब्दांत विरोधकांचा आदरच केला होता. खरे तर फाटक्या कपड्यातील आणि पेट्रोलला महाग असणारी बिनचेहऱ्याची माणसे उपमुख्यमंत्र्यांच्या पॅनेलविरोधात उभी राहतात. कमी वेळेत सभासदांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतात, हे कौतुकास्पद आहे. त्यांना लढाईत पुरेसे मुद्दे नव्हते, तयारीला वेळ नव्हता, प्रचाराला मर्यादीत कालावधी होता. निवडणुकीआधी दोन-चार वर्ष रान पेटवावे लागते, त्याशिवाय सभासद स्वीकारत नाहीत, हा धडाही त्यांना मिळाला आहे. परंतु साठ वर्षांत भाजपने कारखान्याच्या निवडणुकीत प्रथमच थेटपणे प्रवेश केला आहे. पूर्वी ते कृती समितीच्या माध्यमातून निवडणूक लढायचे. पण यंदा प्रथमच भाजपचा पॅनेल निवडणुकीला सामोरे गेला आहे, याची नोंद सत्ताधाऱ्यांनाही घ्यावी लागणार आहे. सत्ताधाऱ्यांना यानिमित्ताने सगळी यंत्रणा ताकदीने राबवावी लागली, हेच लोकशाहीचे यश आहे. अर्थात, त्यामुळे सोमेश्वर विकास पॅनेलच्या भव्यदिव्य विजयाचे महत्व अजिबात कमी होत नाही. समोर नवखा प्रतिस्पर्धी असतानाही गांभीर्याने कसे लढतात, हे पॅनेलच्या कार्यकर्त्यांच्या फळीने दाखवून दिले आहे. राज्यातील सर्वाधिक मतांचा विजय प्राप्त करत पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com