Devendra Fadnavis : कुणाची कितीबी होऊदे चर्चा! महाराष्ट्र भाजपमध्ये फडणवीसच 'बॉस'?

Devendra Fadnavis Supreme in Maharashtra BJP Politics : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे स्थान अबाधित राहील का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
Bjp-Devendra Fadnavis
Bjp-Devendra FadnavisSarkarnama

Bjp-Devendra Fadnavis : पक्ष म्हटलं की अंतर्गत गटबाजी आलीच, ती भाजपलाही चुकलेली नाही. पक्षाच्या सरशी होत असतानाच्या काळात त्याची फारशी चर्चा होत नाही. पडत्या काळात मात्र गटबाजी पटकन नजरेत भरते. महाराष्ट्र भाजपमध्ये सध्या असेच काही होत असल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत कमी जागा काय मिळाल्या, भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय अन्य नावांची चर्चा सुरू झाली, मात्र ती जास्त काळ टिकणार नसून फडणवीसांचे स्थान अबाधित राहण्याचीच शक्यता जास्त आहे.

2104 पासून भाजपच्या महाराष्ट्रातील पक्षसंघटनेवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एकहाती पकड आहे. 2014 आणि 2019 ला मोदी लाट होती. त्या लाटेत फडणवीसांचेही निभावून गेले. 2019 ला भाजपचे 105 आमदार निवडू आले. 2014 पेक्षा ही संख्या कमी होती, मात्र राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप होता. त्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे कुणाचेही धाडस झाले नाही.

सर्वाधिक आमदार असूनही शिवसेनेशी मतभेदांमुळे आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) डावपेचांमुळे भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले. त्याचा वचपा फडणवीसांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडून काढला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न केला.

हिशेब चुकता करण्याची ही पद्धत भाजपच्या अंगलट येईल, असे फडणवीस आणि त्यांचे सहकारी वगळले तर सर्वांना वाटत होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्याची प्रचीती आली. गेल्या पाच वर्षांत तोंडाचा पट्टा सुरू ठेवलेल्या, विरोधकांवर टीका करताना भाषेची मर्यादा न पाळणाऱ्या आपल्या काही सहकारी नेत्यांना आवरण्याकडे फडणवीस यांचे दुर्लक्ष झाले, की त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केले, असा प्रश्न आहे.

Bjp-Devendra Fadnavis
Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत कुठं, काय चुकलं? एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

अभ्यासू, दमदार, सभागृहात विरोधकांना घाम फोडणारे मुद्दे आपल्या विशिष्ट वक्तृत्वशैलीत उपस्थित करणारा नेता म्हणून महाराष्ट्र फडणवीसांकडे पाहत होता. भाजपची चलती असल्यामुळे पुढेमागे केंद्रात त्यांना मोठी संधी मिळू शकते, अशीही चर्चा व्हायची. महाराष्ट्राला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांच्या नेतृत्वात झालेले कुरघोड्यांचे राजकारण त्यांच्यासाठी घातक ठरते की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एका पराभवामुळे एखाद्या नेत्याचे राजकारण संपत नाही, हे खरे आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही हे लागू होते. मात्र केंद्रातील भाजप सरकारला महाराष्ट्रामुळे फटका बसला, हे पक्षश्रेष्ठी सहजासहजी विसरू शकणार नाहीत. भाजपला यावेळी स्पष्ट बहुमत मिळाले नाही. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रातून 48 पैकी 41 जागा मिळाल्या होता. त्यात भाजपच्या 23 जागा होत्या. या निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या आहेत.

एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या जागा मिळून महायुतीच्या खासदारांची संख्या 17 झाली आहे. केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमतासाठी 32 जागा कमी पडल्या आणि महाराष्ट्रात 24 जागांचा फटका बसला. भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात महाराष्ट्रात महायुतीला कमी मिळालेल्या जागाही कारणीभूत ठरल्या. याची जबाबदारी अर्थातच फडणवीस यांच्यावर येऊन पडली. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलीही.

खरंतर फडणवीस यांच्या विरोधात बोलण्याची पक्षात आजही कोणामध्येही हिम्मत नाही, मात्र दबक्या आवाजात, वेगळ्या दष्टीकोनातून चर्चा सुरू झाली आहे. विनोद तावडे यांचे नाव वारंवार समोर येत आहे. एकनाथ खडसे यांना भाजपसोबत आणल्यानंतर तावडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

Bjp-Devendra Fadnavis
Modi Cabinet 3.0 : ...म्हणून मोहोळ यांना मंत्रिपदी संधी दिली अन् उदयनराजेंना डावललं!

पक्षसंघटनेत राष्ट्रीय पातळीवर तावडे यांनी केलेल्या कामाची दखल राज्यातील नेते घेऊ लागले. त्यांना महत्वाची जबाबदारी मिळेल, अशी चर्चा करू लागले. तावडे यांनी खडसे यांच्यासाठी पुढाकार घेतला नसता तर रावेरसह अन्य काहा जागांवर भाजपला फटका बसला असता, असे सांगितले जाऊ लागले. खडसेंना भाजपमध्ये घेण्याबाबत फडणवीस आणि त्यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन हे अनुकूल नव्हते, हे त्यांच्या वक्तव्यांवरून समोर आले.

विनोद तावडे यांना लवकरच मोठी संधी मिळेल, असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. अर्थात, ती मान्य होणारच नव्हती. अपयश आले असले तरी पक्षश्रेष्ठी फडणवीस यांना तातडीने बाजूला करू शकत नाहीत, कारण त्यांच्या तोडीचा नेता सध्या तरी त्यांना राज्यात दिसत नसावा.

(Edited By Jagdish Patil)

गेल्या दहा वर्षांत फडणवीस यांनी राज्यभरात आपल्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. फक्ष फोडाफोडी, पक्षांची नावे, पक्षांची चिन्हे पळवणे, काँग्रेसमधील बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेणे, या बाबी फडणवीसांच्या अंगलट आल्या आहेत. असे असले तरी पक्षातून फडणवीस यांना आव्हान देऊ शकेल, असा एकही नेता राज्यात नाही. पक्षश्रेष्ठीही फडणवीस यांना इतक्यात बाजूला सारतील, अशी शक्यता दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com