योगेश पायघन
Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या मेळाव्याने एका दगडात दोन पक्षी मारले असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यात अस्वस्थता निर्माण केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेवर कुरघोडीच्या तयारीत असलेल्या भाजपला मित्रपक्षाच्या ताकदीने विचार करायला भाग पाडले, तर दुसरीकडे ‘आम्हीच ओरिजिनल’ असे सांगणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची झोप उडाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या गणितांची मांडणी सर्वच पक्षांना सावधपणे करावी लागणार आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सोमवारी (ता. आठ) दौरा झाला. त्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका, विकासकामांचा आढावा आणि कार्यकर्ता मेळावा, असे तीन प्रमुख कार्यक्रम होते. पण, सायंकाळी झालेल्या मेळाव्याने शहराच्या राजकारणात हालचाल घडविली. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. त्यात शिवसेनेत इनकमिंगचा जोर वाढलेला आहे. कधी काळी कट्टर शिवसैनिक राहिलेले नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येत आहेत. त्यात महिलावर्गही मोठ्या संख्येने आकर्षित झालेला मेळाव्यात दिसून आला. अनेक पक्षांचे मेळावे झाले. त्या गर्दीचा उच्चांक मोडणारा हा मेळावा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
माजी महापौरांसह माजी नगरसेवकांची फौज, ग्रामीण भागातील विद्यमान आमदारांसह माजी आमदार आणि माजी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, इच्छुकांची गर्दी मेळाव्यात होती. शिवसेनेला सर्व जागांवर विजय मिळवायचाय, असे सांगताना महायुतीसोबत लढण्याचा निर्धारही एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखविला. स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या, तरच तुम्ही आमदार असे सांगत अप्रत्यक्ष जबाबदारी आमदारांवरही सोपविल्याचे यावेळी दिसून आले.
महायुतीत असलेल्या शिवसेनेची कोंडी केली जात असल्याचे राज्य स्तरावर चित्र आहे; तसेच स्थानिक पातळीवर गटातटात विभागल्या गेलेल्या शिवसेनेला धक्का देत मोठा भाऊ होण्याचे भाजपचे स्वप्न असून, त्यांनी त्यानुसार जोरदार प्रयत्नही सुरू केलेले आहेत. शिवाय स्वबळावर महापालिका लढविण्याची तयारी सुरू केली, तर शहरातील विकासकामांत लक्ष घालून श्रेय घेण्याचे धोरणही ठेवलेले आहे. तिकडे ठाकरे यांची शिवसेना ही भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील धुसफूस आणि त्या शिवसेनेतील गट-तट यामुळे आपणच ओरिजिनल शिवसेना असल्याचे सांगत तयारीला लागली असताना शिंदे यांनी मेळावा यशस्वी करत दोन्ही पक्षांना रणनीतीचा फेरविचार करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका निवडणुकीसाठी त्यांना नव्याने गणित मांडावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.