Shivsena politics: 'गुन्हेगारांच्या आश्रयदात्यांचा शोध घ्या', म्हणत शिंदेंच्या माजी आमदाराने साधला निशाणा!

Former MLA Gyanraj Chougule : गुन्हेगार आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमरगा येथील माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
eknath shinde and devendra fadnavis
eknath shinde and devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मराठवाड्यासह राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले. गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या आणि गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्यांविरुद्ध राज्यभरात संतापाची लाट आली. देशमुख यांच्या हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी गुन्हेगारी कृत्यांमध्ये घट झालेली नाही. त्यामुळे सरकारला बॅकफूटवर जावे लागले. कर्नाटक सीमेलगतच्या उमरगा (जि. धाराशिव) शहरातही गुन्हेगारी कृत्ये सातत्याने घडत आहेत. यावरून आता सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारानेच निशाणा साधला आहे.

उमरगा शहरात दोन दिवसांपूर्वी एका तरुणावर चौघांनी सशस्त्र हल्ला केला. त्याच्या काही दिवस आधीच गावठी पिस्तूल आणि कोयत्यासारखी हत्यारे बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी उमरगा शहरातून अटक केली होती. गेल्या काही वर्षांत शहर आणि परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, खुनाचे सहा ते सात प्रकार घडले आहेत. शहर आणि परिसरात गुन्हेगारांच्या काही टोळ्या कार्यरत असल्याचे सांगितले जाते. या गुन्हेगारांच्या टोळ्यांसह त्यांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली आहे.

चौगुले यांनी हे निवेदन पोलिस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. या निवेदनात चौगुले यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साद घातली आहे. उमरगा-लोहारा मतदारसंघ 2009 मध्ये आरक्षित झाला. त्यानंतर चौगुले हे सलग तीनवेळा विजयी झाले. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

eknath shinde and devendra fadnavis
साम, दाम, दंड, भेदाने शिवसेनेला धडा शिकवू : नीलेश राणे

उमरगा शहर हे कर्नाटकच्या सीमेवर वसलेले आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती भागातून वैद्यकीय उपचार आणि बाजारपेठेसाठी उमरगा शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. असे असले तरी उमरग्याची बाजारपेठ सोलापूर आणि लातूरच्या प्रभावामुळे चिंताग्रस्त असते. उमरग्यातील बहुतांश नागरिक खरेदीसाठी सोलापूर, लातूरला पसंती देतात. अशातच गुन्हेगारी कृत्ये वाढल्याचा परिणाम उमरग्याच्या बाजारपेठेवर होऊ शकतो, अशी चिंता चौगुले यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडी सरकारचा कार्यकाळ वगळला तर 2014 नंतर आतापर्यंत राज्याचे गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढ होणे आणि गुन्हेगारांच्या टोळ्यांना आश्रय दिला जात असल्याचा चौगुले यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. उमरगा आणि परिसरात गुंडांच्या टोळ्यांना आश्रय देणारे कोण आहेत, याचा उल्लेख मात्र चौगुले यांनी निवेदनात केलेला नाही. दरम्यान, यासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

एखाद्या प्रकरणात कारवाई करा किंवा करू नका, असे फोन पोलिसांना जातच असतात, त्यात नवीन काहीही नाही. गंभीर गुन्हेगारीच्या प्रकरणांतही पोलिसांवर कारवाई न करण्यासाठी दबाव टाकला जात आहे का, असा प्रश्न चौगुल यांनी निवेदनात उपस्थित केला आहे. त्यांना वाटणारी शंका खरी असेल तर ते गंभीर समजली पाहिजे. बाहेरून होणाऱ्या हस्तक्षेपामुळेच कारवाई करण्यात पोलिस असमर्थ ठरत आहेत, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. पोलिसांनी दबाव झुगारून काम करावे, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

eknath shinde and devendra fadnavis
BJP vs Shivsena UBT : ठाकरेंनी अमित शहांना दिलेलं आव्हान महाजनांच्या जिव्हारी; म्हणाले, "त्यावेळी तुम्ही झोपला होता का?"

गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी जनआंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला आहे. विरोधकांची धार बोथट झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षच अनेकवेळा विरोधकाची भूमिका बजावताना दिसत आहेत. उमरग्यातही असेच होत आहे. महायुतीत राज्य पातळीवर जे सुरू आहे, ते आता तालुका पातळीवरही घडू लागले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांत सर्वकाही आलबेल नाही, हे वेगळे सांगण्याची गरज राहिलेली नाही. गुन्हेगारी टोळ्या, त्यांच्या आश्रयदात्यांवर कारवाईची मागणी योग्यच आहे. गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांचे समुपदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकडे मात्र यंत्रणांचे, सरकारचे दुर्लक्ष झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com