Vinod Tawde: तावडेंनी राष्ट्रीय राजकारणात कसं कमबॅक केलं ? मोदी, शाह, नड्डांनंतर पक्षात प्रमुख स्थान

National Politics: तीन राज्यातील निवडणुकीच्या यशात 'तावडे पॅटर्न' कसा उपयोगी ठरला ?
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama
Published on
Updated on

संजय परब :

Mumbai : राज्याच्या राजकारणातून 2019 नंतर बाहेर फेकले गेलेले भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी चार वर्षांत पुन्हा एकदा आपल्या नावाचा दबदबा तयार केला असून त्यांचा कॅनव्हास हा आता राज्यापुरता मर्यादित न राहता तो राष्ट्रीय पातळीवर विस्तारला आहे. विशेष म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन लोकसभा’ या लक्ष्याची निर्मिती केलीय आणि याकरिता पायाभूत नियोजन समितीत जी तीन नावे निश्चित केली आहेत, त्यात प्रमुख चेहरा आहेत ते सध्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावर कार्यरत असलेले तावडे.

त्यांच्या साथीला असतील महासचिव सुनील बन्सल आणि तरुण चुग. ही समिती भाजपच्या लोकसभा प्रचाराची दिशा ठरवतील. तावडे आपल्या होम ग्राऊंडवर ‘डॅशिंग’ बॅटिंग करायला सज्ज झाले असून लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे उद्दीष्ट त्यांच्या टीमने ठेवले आहे. हरयाणा, उत्तराखंड, राजस्थानमध्ये भाजपची नीट घडी बसवणारा राष्ट्रीय नेता अशी प्रतिमा तयार झालेल्या तावडे यांच्या नेतृत्वाखाली आता महाराष्ट्रातही तोच ‘तावडे पॅटर्न’ राबवला जाणार आहे. याच पॅटर्नच्या वाटेवरून पुढे तावडे यांचे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे दार उघडू शकते, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vinod Tawde
Vinod Tawde : धक्कातंत्र, मुख्यमंत्रिपदासाठी भाजपची विनोद तावडेंना पसंती ?

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये यश मिळवल्यानंतर भाजपने प्रस्थापित चेहऱ्यांना बाजूला सारत कोरे करकरीत चेहरे मुख्यमंत्रिपदावर आणले. राजस्थानची विशेष जबाबदारी असलेल्या तावडे यांनी भजनलाल शर्मा यांच्यासारखा पहिल्यांदा आमदार झालेला चेहरा मुख्यमंत्री म्हणून दिला.

शर्मा यांच्या नावाची घोषणा राजनाथ सिंह यांनी केली असली तरी तावडे यांनी शर्मा यांच्यासारखे नवीन नाव पुढे आणताना माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची समजूत काढून त्यांना शांत करण्यात आपले राजकीय कसब पणाला लावले आणि हाच आता तावडे पॅटर्न ठरलाय. हा पॅटर्न सध्या बिहारमध्ये सुद्धा राबवला जात असून तावडे यांच्याकडे या राज्याचे प्रभारीपद सुद्धा आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यांत भाजपचा विस्तार झाला तर बहुमतापासून त्यांना कोणी रोखू शकणार नाही, असे नियोजन करत तावडे टीम कामाला लागली आहे.

Vinod Tawde
Winter Session 2023 : तुमचे खासदार कमळ चिन्हावर लढणार का ? उत्तर देतांना नेत्यांच्या तोंडाला फेस..

‘फडणवीस करिष्मा’च्या चलतीनंतर महाराष्ट्रातून बाजूला केले गेलेल्या तावडे यांनी हताश न होता गेल्या चार वर्षांत भाजपच्या कोअर टीममध्ये कमालीची एन्ट्री घेतली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यानंतर आता तावडे यांना पक्षात प्रमुख स्थान आहे. याआधी अशी मोठी मजल महाराष्ट्रातून फक्त प्रमोद महाजन यांनी मारली होती. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर महाजन यांचे भाजपमध्ये वजन होते.

मुख्य म्हणजे महाजन यांच्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नियुक्त झालेले तावडे हे दुसरे मराठी नेते ठरलेत. 2019 मध्ये महाराष्ट्रातून तावडे यांच्यासह सुनील देवधर, पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यानंतर वर्षभरात महासचिव झालेल्या तावडे यांनी पुढच्या वर्षात राष्ट्रीय सरचिटणीसपदी झेप घेत आपल्या राजकीय कौशल्याचा ठसा उमटवला.

मोदी आणि शाह यांच्या वर्तुळात आपले खास स्थान निर्माण करणे, ही बाब भाजपच्या बड्या बड्या नेत्यांना जमलेली नाही, ती तावडे यांनी करून दाखवली आहे. यात कमालीचा संयम तर होताच, पण कुठेही जाहीर वक्तव्य न करण्याची पक्षाची शिस्त सुद्धा त्यांच्यात दिसली होती. तावडे पुढे जात असताना पंकजा, देवधर खूप मागे पडले असून ते अजून सचिव पदावर अडखळत राहिले आहेत.

Vinod Tawde
Sharad Pawar : शरद पवारांचा प्लॅन, फुटीरांच्या मनात धडकी भरवणारा

राष्ट्रीय सरचिटणीस पदापर्यंत मजल मारताना तावडे (Vinod Tawde) यांना भाजप आणि पक्षाशी संबंधित संघटना कार्याचा प्रदीर्घ अनुभव कामाला आला आहे. 1980 ते 1995 या काळात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले. त्यातील दहा वर्षे ते ते अभाविपचे पूर्णवेळ प्रचारक होते. 1995 मध्ये पक्षात सक्रिय झाल्यापासून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, विधान परिषदेचे 13 वर्षे सदस्य, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि 2014 मध्ये बोरिवली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या तावडे यांनी शिक्षण, युवक कल्याण व क्रिडा, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विभाग, संसदीय कार्य असे विविध विभाग एकहाती सांभाळले होते.

तावडे यांच्यासह एकनाथ खडसे, पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे पत्ते कट करत 2019 च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी फक्त आपला चेहरा पुढे ठेवला होता. या निवडणुकीतील मोठ्या यशानंतर देशात फडणवीस यांची प्रतिमा आणखी उंचावत गेली. भविष्यातील ते पंतप्रधान असल्याचे पक्षात आणि पक्षाबाहेर सुद्धा बोलले गेले. तशी एक यंत्रणा सक्रीय करण्यात आली होती. फडणवीस यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा आशीर्वाद असल्याचा या चर्चेतील एक भाग होता.

दुसऱ्या बाजूला मोदी यांच्यानंतर पंतप्रधान म्हणून आपल्या नावाच्या मागेपुढे कोणी असता कामा नये, यासाठी शाह डोळ्यात तेल घालून दक्ष आहेत. फडणवीस यांच्या नावाची चर्चा त्यांच्या कानावर आल्यापासूनच ते फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, याची काळजी घेताना दिसत आहेत, असे बोलले जाते.

बाहेरून आलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रिपद आणि अजित पवार यांच्याकडे तिजोरीची चावी देत दिल्लीने फडणवीस यांना एकप्रकारे चेकमेट दिला. आता फडणवीस यांची कसोटी आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लागणार आहे. भाजपला अपेक्षित 45 जागा मिळाल्या नाही तर विधानसभा निवडणूक आणि त्यानंतरचे मुख्यमंत्रिपद त्यांच्यासाठी कठीण होऊन बसेल. अशावेळी पक्ष विनोद तावडे यांना पुढे आणून सत्तेची सूत्रे त्यांच्या हाती देऊ शकतात.

भाजपच्या मिशन लोकसभासाठी नियुक्त केलेल्या पायाभूत समितीत प्रमुख असलेल्या तावडे यांच्यावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्र तसेच राज्यांतील नेत्यांचे दौरे ठरवणे याची जबाबदारी तर असेलच. पण, ज्या ठिकाणी मागच्या वेळी भाजप (BJP) दुसऱ्या क्रमांकावर होता, त्या जागी उमेदवार निश्चित करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.

यामुळे महाराष्ट्रात फडणवीस यांना तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागणार आहे. सत्तेच्या राजकारणात दिवस तसेच राहत नाहीत, हे तावडे यांनी दाखवून दिले आहे. याचमुळे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत जी काही मोजकी नावे असतील त्यात तावडे हे नाव नक्कीच पुढे असेल.

Vinod Tawde
Congress News: तेलंगणाप्रमाणे काँग्रेस आतातरी मरगळ झटकणार की नाही...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com