Congress News: तेलंगणाप्रमाणे काँग्रेस आतातरी मरगळ झटकणार की नाही...?

Mallikarjun Kharge News: रस्त्यावर उतरून जनतेची लढाई लढणाऱ्यांचा शोध पक्षाने घ्यायला हवा
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर काँग्रेसने तेथे नेतृत्वात खांदेपालट केली आहे. प्रदेशाध्यक्षपदी जीतू पटवारी यांची निवड करण्यात आली असून, विरोधी पक्षेनेतेपदीही उमंग सिंघार या तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. पक्षातील मातब्बरांचा विरोध डावलून तेलंगणात काँग्रेसने २०२१ मध्ये रेवंथ रेड्डी यांची प्रदेशाध्यपदी निवड केली होती. तसाच प्रयोग काँग्रेसला राजस्थान आणि मध्यप्रदेशातही करता आला असता, मात्र कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांच्यासमोर पक्षश्रेष्ठी हतबल झाल्याचे चित्र होते. अहंकारी ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून ईडीला न घाबरता धाडसाने दोन हात करणाऱ्या, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या नेत्यांचा आता काँग्रेसने शोध घेतला पाहिजे.

मध्य प्रदेश पाठोपाठ राजस्थानातही काँग्रेसकडून पक्षसंघटनेत बदल केले जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीदरम्यान कमलनाथ यांनी झोकून देऊन प्रचार केला नव्हता, असे सांगितले जात आहे. त्याउलट शिवराजसिंह चौहान यांनी झंझावाती प्रचार केला होता. कमलनाथ यांचे पुतणे रतुल पुरी यांच्यावर मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. हा ३५४ कोटी रुपयांचा गैरव्यहार असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे कदाचित कमलनाथ प्रचारात फारसे सक्रिय झाले नसावेत, अशी चर्चा आहे. यात कितपत तथ्य आहे, हे सांगता येत नाही. मात्र काँग्रेसने आता ज्येष्ठ नेत्यांना सन्मानाने बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची पद्धतच रूढ करायला हवी. भाजपने तिन्ही राज्यांत धक्कातंत्र वापरून नव्या नेत्यांना संधी का दिली, यावर काँग्रेसने सकारात्मकपणे विचार करायला हवा.

Congress News
Sharad Pawar: मी अजूनही तरुणच...लवकरच नवा इतिहास घडविणार! पवारांचा निर्धार...

रेड्डी हे पायाला भिंगरी लावून फिरत होते...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून काँग्रेसला खूप काही शिकता आले असते. मात्र तसे झाले नाही. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजपला चारीमुंड्या चीत केले होते. डी. के. शिवकुमार हे कारागृहात जाऊन आले, मात्र ते ईडीसमोर नमले नाहीत. विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्व नॅरेटिव्ह त्यांनी धुळीस मिळवले. काँग्रेसमध्ये असे धडाडीचे नेते सर्वत्र आहेत, त्यांना योग्य वेळी योग्य संधी देणे गरजेचे आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी हे आणखी एक उदाहरण. तेलंगणात माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावे, लागेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. रेवंथ रेड्डी यांच्यामुळे ही किमया साधली गेली, भलेही मग काँग्रेसचा विजय काठावरचा का असेना. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रेड्डी हे पायाला जणू भिंगरी लावून फिरत होते, लोकांमध्ये मिसळत होते. लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी ते पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलने करत होते. मध्यप्रदेशात असे चित्र दिसले नाही, तसे ते महाराष्ट्रातही दिसत नाही.

बोलघेवड्या नेत्यांना बाजूला सारून...

राजस्थानात माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि तरुण नेते सचिन पायलट यांच्यातील वाद अखेरपर्यंत मिटलाच नाही. त्यामुळे काँग्रेसला पराभवाला सामोरे जाव लागले. गेहलोत यांचा अहंकार आणि त्यांच्या बाजूने असलेल्या संख्याबळामुळे पक्षश्रेष्ठींचे हात बांधले गेले. त्यामुळे सचिन पायलट बाजूला पडले आणि लोकांमध्ये चुकीचा संदेश गेला. पराभवानंतर तरी गेहलोत यांना बाजूला सारून काँग्रेस पायलट यांना समोर आणण्याचे धाडस दाखवणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. परिस्थिती सुधारत आहे चित्र निर्माण होत असतानाच काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यामुळे बोलघेवड्या नेत्यांना बाजूला सारून रस्त्यावर उतरून जनतेची लढाई लढणाऱ्या नेत्यांचा काँग्रसने शोध घेतला पाहिजे.

Congress News
Salim Kutta Case: बडगुजरांची भेट कुठे झाली? सलीम कुत्ताला नाशिक पोलिस घेणार फैलावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com