Manoj Jarange Home: मराठा आरक्षणावरून सरकारला घाम फोडणारे जरांगे पाटील राहतात 20 बाय 20 च्या घरात

Manoj Jarange Patil Sabha : 20 बाय 20 च्या पत्र्यांच्या साध्या घरात राहणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली आहेत.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange House : राज्यभरातून मराठा समाज एकवटला होता. काही जण शेकडो किलोमीटरचा प्रवास सायकलवर करून दाखल झाले होते. काहीजण लहान मुले, महिलांसह दुचाकीवरून आले होते. गर्दी इतकी प्रचंड होती की, त्यामुळे लाखो लोकांना सभेच्या स्थळापर्यंतही पोहोचणे शक्य झाले नाही. मराठा आरक्षणासाठी 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटी (जि.जालना) येथे झालेल्या सभेचे हे चित्र.

या सभेला कोणी मोठा नेता येणार नव्हता की, कोणी मोठा अभिनेता, सेलेब्रिटी येणार नव्हता. 20 बाय 20 जागेतील पत्र्यांच्या घरात राहणाऱ्या एका कफल्लक माणसाला ऐकण्यासाठी हे लाखो लोक आले होते. मनोज जरांगे पाटील असे या कफल्लक माणसाचे नाव. ते कफल्लक असले, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असले तरी समाजासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. आजपर्यंत अनेकांना संपादन करता आला नाही इतका विश्वास त्यांनी मराठा समाजाकडून मिळवला आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange Rally News : जरांगेंचे बंद फेसबुक अकाउंट चोवीस तासांत सुरू...

गणेशनगर, गोरीगंदारी (ता.अंबड,जि.जालना) येथे मनोज जरांगे पाटील यांचे घर आहे. त्याचे क्षेत्रफळ 20 बाय 20 इतके आहे. आगदीच साध्या असलेल्या या घराचे छत पत्र्यांचे आहे. या घरात ते वडील, पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहतात. मातोश्री जरांगे पाटील यांच्या बंधूंसोबत राहतात. त्यांच्या मालकीची दोन एकर शेती असून, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अशा साध्या घरात राहणारे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी संघर्ष योद्धा ठरले आहेत.

गेल्या दीड महिन्यापासून हा माणूस घरी आलेला नाही. अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण केल्यानंतर सरकारने एक महिन्यात मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेऊन राज्यभरात जनजागृती दौरा केला. त्यांच्या दौऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरकारच्या आश्वासनाला एक महिना पूर्ण झाल्याच्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबरला त्यांनी अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा घेऊन सरकारला पुढील 10 दिवसांत आरक्षण देण्याचे अल्टिमेटम दिले.

Manoj Jarange
Manoj Jarange Rally News : मराठा संघर्षयोद्धा लेकीला चक्कर येताच हळवा झाला..

सभेनंतर ते पुन्हा उपोषणस्थळी गेले. तेथे आता साखळी उपोषण सुरू आहे. मोर्चासाठी आलेले काही कार्यकर्ते त्यांना भेटले. त्यावेळी त्यांच्याजवळ एकच माणूस होता. जरांगे पाटील यांचे पाय सुजलेले होते. कोणताही बडेजाव नाही की मोठेपणा नाही... भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी अत्यंत नम्रपणे संवाद साधला. मराठा समाजासाठी आरक्षण मिळवणारच, असा निर्धार त्यांनी या कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांना चार एकर शेती होती. त्यापैकी दोन एकर शेती त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनासाठी विकली. त्यातून मिळालेल्या रकमेतून त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. आरक्षणाच्या या लढ्यामुळे त्यांना कुटुंबीयांकडे लक्ष देता आले नाही.

अर्थातच त्यांना पक्के घरही बांधता आले नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय कच्च्या घरात राहतात. २० बाय २० चे हे पत्र्यांचे हे घर आहे. या घरात त्यांचे वडिल, पत्नी, मुलगा आणि मुलगी राहतात. घराच्या अंगणात झाडे आहेत. तेथे त्यांचे वडील पहुडलेले असतात. या घराला एका बाजूने पत्र्याचे शेड आहे. फरशाही अत्यंत साध्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे हे कौटुंबिक जग!

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला म्हणून अंतरवाली सराटीला गेलेले जरांगे पाटील दीड महिन्यापासून घरी परतलेले नाहीत. आरक्षण मिळाल्याशिवाय घरी येणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. कोणत्याही पक्षाच्या राजकीय सभांसाठी गर्दी कशी जमवावी लागते, हे आता सर्वांना माहीत झालेले आहे.

जरांगे पाटील यांच्या 14 आॅक्टोबरच्या सभेला झालेली गर्दी ही राजकीय पक्षांसाठी जणू इशाराच असावा. जरांगे पाटील यांची भाषाही अत्यंत साधी, थेट मनाला हात घालणारी आहे. त्यांची भूमिका प्रामाणिक आहे. त्यामुळेच 20 बाय 20 च्या पत्र्यांच्या घरात राहणारा हा माणूस मराठा समाजाच्या गळ्यातला ताईत बनला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Manoj Jarange
Manoj jarange patil speech : लाखोंच्या गर्दीतही जरांगेंना पोलिसांची काळजी ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com