
India Vs Pakistan Update : पलहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केले. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमाभागात गोळीबार, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला जात आहे. भारतीय लष्कराने हे सर्व हल्ले परतवून लावत पाकड्यांना अस्मान दाखवले आहे. भारताच्या अत्याधुनिक युध्दसामुग्रीने दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्याबरोबरच पाक लष्कराचे मनसुबे नेस्तनाबूत केले. सीमाभागात निर्माण झालेल्या या युध्दजन्य स्थितीत दिवंगत मनोहर पर्रीकर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
भारत पाकिस्तानला पाणी पाजत असताना सोशल मीडियात अनेक युझर्सकडून दिवंगत पर्रीकरांची आठवण काढली जात आहे. याचे कारणही तसेच आहे. भारताने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरसाठी ज्या राफेल विमानांचा वापर केला, ती विमाने, त्याचप्रमाणे पाकची ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच उध्वस्त करणाऱ्या एस-400 म्हणजेच सुदर्शन ही एअर डिफेन्स सिस्टीम भारतात आणण्यामध्ये पर्रीकर यांचा मोठा वाटा होता.
यूपीए सरकारच्या काळात 2007 मध्ये विमानखरेदीची प्रक्रिया सुरू झाली होती. 2012 मध्ये राफेल विमाने घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. पण करारातील काही अटींमुळे ही प्रक्रिया लांबली. नोव्हेंबर 2014 मध्ये पर्रीकर संरक्षणमंत्री झाल्यानंतर 2015 मध्ये जुना करार रद्द करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट फ्रान्स सरकारकडून ही विमाने खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. त्याबाबत 2016 मध्ये झालेल्या करारावर संरक्षणमंत्री म्हणून पर्रीकरांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर जूलै 2020 मध्ये ही विमाने भारतात दाखल झाली.
राफेल विमान खरेदीचा करार एवढा सोपा नव्हता. करारातील अटी-शर्ती, भारत आणि फ्रान्स सरकारच्या मागण्या... अशा अनेक अडचणी होत्या. पण पर्रीकर यांनी त्यातून मार्ग काढत हा करार घडवून आणला. त्याच विमानांनी दहशतवाद्यांची नऊ कॅम्प उध्वस्त केली आहेत. या विमानांपाठोपाठ पर्रीकरांनी भारतात आणलेल्या एस-400 या एअर डिफेन्स सिस्टीमनेही आपला ताकद दाखवून दिली आहे.
पाकिस्तानने भारतावर ड्रोन, क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानांनी केलेले हल्ले एस-400 या यंत्रणेने हाणून पाडले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यावेळी ही यंत्रणा पूर्णपणे सक्रीय असेत. ही यंत्रणा भारताने रशियाकडून घेतली आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये भारताने रशियाकडून ही यंत्रणा खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यावेळी पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते. पण संरक्षणमंत्री असतानाच त्यांनी ही यंत्रणा खरेदी करण्याबाबतची तयारी सुरू केली होती. या प्रक्रियेत त्यांच्यामुळे भारताचे जवळपास 50 हजार कोटी रुपये वाचविल्याचे सांगितले जात होते.
भारताआधी ही यंत्रणा चीनने रशियाकडून खरेदी केली होती. त्यामुळे भारतासाठी हा एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करार महत्वाचा मानला जात होता. मागील दोन दिवसांत या सुदर्शन चक्रने आपल्या लौकिकाला साजेशी कमाल करून दाखवत पाकिस्तानचे हल्ले हवेतच उध्वस्त केले. भारताने यावेळी पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात पहिल्यांदाच राफेल आणि एस-400 या यंत्रणेचा वापर केला आणि त्याच्या ताकदीची प्रचिती आली. त्यामुळे पर्रीकरांच्या दुरदृष्टीला देशवासियांकडून सलाम केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.