Dharashiv Assembly Election : धाराशिवमधील सेनेच्या बालेकिल्ल्यात विधानसभेला कोण बाजी मारणार ?

Tanaji Sawant, Dyanraj Choghule, Rana Patil, Kailas Patil : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेच्या ओमराजे निंबाळकर यांनी बाजी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी येत्या काळात महाविकास आघाडीचे वर्चस्व असेल असे चित्र आहे.
Tanaji Sawant, Dyanraj Choghule, Rana Patil, Kailas Patil
Tanaji Sawant, Dyanraj Choghule, Rana Patil, Kailas Patil Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्याची ओळख 1995 नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला अशीच राहिली आहे. या ठिकाणी पाच पैकी तीन मतदारसंघावर सातत्याने शिवसेनेचे प्राबल्य राहिले होते. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीत गेल्या 28 वर्षांत दोन वेळेसचा अपवाद वगळता याठिकाणी शिवसेनेचा खासदार राहिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेच्या ओमराजे निंबाळकर यांनी बाजी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी येत्या काळात महाविकास आघाडीचे वर्चस्व असेल असे चित्र आहे.

धाराशिव जिल्ह्याची ओळख मात्तब्बर नेतेमंडळींचा जिल्हा अशीच राहिली आहे. डॉ. पदमसिंह पाटील हे राज्याचे गृह, ऊर्जा, पाटबंधारे खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. मधुकरराव चव्हाण हे परिवहन, पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री होते. राणाजगजीतसिंह पाटील हे काही काळ राज्यमंत्री होते. त्यासोबतच तानाजी सावंत (Tanaji Sawnat) सध्या आरोग्यमंत्री आहेत. (Dharashiv Assembly Election)

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशामुळे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरीकडे राज्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीचा परिणाम धाराशिव जिल्ह्यात झाला आहे. शिवसेनेचे दोन आमदार शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील पक्षीय बलाबल :

धाराशिवमध्ये ठाकरे सेनेचे आमदार आहेत. तुळजापूरमध्ये भाजपचे आमदार आहेत तर भूम-परंडा व लोहारा-उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. सध्या महायुतीचे तीन आमदार आहेत. तर महाविकास आघाडीचा केवळ एक आमदार आहे.

धाराशिव जिल्ह्यातील आमदार:

धाराशिव – कैलास पाटील (शिवसेना उद्धव ठाकरे गट)

तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील (भाजप)

उमरगा – ज्ञानराज चौगुले (शिवसेना शिंदे गट)

परंडा – तानाजी सावंत (शिवसेना शिंदे गट)

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काय घडलं :

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omprkash Rajenimbalkar) यांनी 3 लाख 30 हजार मताने महायुतीच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे सहाही मतदारसंघात निंबाळकर यांना तब्बल 50 हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी असल्याने महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीने ही निवडणूक सत्त्वपरीक्षा पाहणारी ठरणार आहे. या लोकसभा मतदारसंघात धाराशिवमधील चार तर लातूर जिल्ह्यामधील औसा तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

2019 ची विधानसभा निवडणुकीत काय घडले होत?

धाराशिव-कळंब विधानसभा :

2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय निंबाळकर यांचा पराभव करीत बाजी मारली होती. ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी देखील ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करताना कैलास पाटील यांची देखील उमेदवारी जाहीर केली. ओमराजे आणि कैलास पाटील यांनी धाराशिव विधानसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क निर्माण केला आहे.

या निवडणुकीत कैलास पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभा करणे महायुतीसाठी महत्वाचं असणार आहे. याठिकाणी ते दोघेही पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचा फायदा त्यांना होणार आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा कोणाला सुटणार याची उत्सुकता आहे. शिंदे गटाकडून मंत्री तानाजी सावंतचे पुतणे धनंजय सावंत, सुधीर पाटील, अनिल खोचरे यांचे नाव चर्चेत आहे तर भाजपकडून दत्ता कुलकर्णी, नितीन काळे यांच्या नावाची चर्चा आहे.

तुळजापूर विधानसभा :

2019 मध्ये माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राणा पाटील यांनी पारंपारिक मतदारसंघ सोडत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपकडून त्यांना उमेदवारीही देण्यात आली. त्यांनी काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांचा 23 हजार मताने पराभव केला होता.

आगामी निवडणुकीत राणा पाटील यांना भाजपचे पुन्हा उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा कोणाला सुटणार यावरून उमेदवार ठरणार आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री मधुकर चव्हाण, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे इच्छुक आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अशोक जगदाळे, जीवन गोरे यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

परंडा विधानसभा :

परंडा मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री तानाजी सावंत यांनी विजय मिळवला होता. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातेवाईक असलेल्या राहुल मोटे यांना पराभूत केले होते. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ते शिंदे सेनेसॊबत गेले. सध्या ते राज्याचे आरोग्यमंत्री आहेत.

येत्या काळात महायुतीकडून तानाजी सावंत हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत जागा कोणाच्या वाट्याला येणार यावरून उमेदवार ठरणार आहे. 2019 च्या निवडणुकीत सेनेचे आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी तानाजी सावंत यांना साथ दिली होती. आता माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शंकर बोरकर शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत. तर शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल मोटेही इच्छुक आहेत. या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला 80 हजार मताची आघाडी आहे. त्यामुळे ती जागा कोणाला सुटणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

उमरगा विधानसभा :

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते ज्ञानराज चौगुले यांनी हॅट्ट्रिक केली होती. हा मतदारसंघ अनुसुचीत जातीसाठी राखीव आहे. शिवसेनेतून निवडून आलेल्या ज्ञानराज चौगुले यांनी पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या दिलीप भालेराव यांनी त्यांना तगडी लढत दिली होती.

याठिकाणी लोकसभेत ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांना मोठी लीड मिळाली आहे.आगामी निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार असल्याने ज्ञानराज चौगुले यांनाच उमेदवारी मिळू शकते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट की काँग्रेस या पैकी कोणाला जागा सुटणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com