Latur Lok Sabha Election 2024 : लातूरच्या देशमुखांचा 'मास्टरस्ट्रोक', लढाई मात्र सोपी नाही, कसोटी लागणार

Lok Sabha Election 2024 : लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देणे हा लातूरच्या देशमुखांचा मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असे असले तरी देशमुखांसाठी लढाई सोपी नाही. लातूर मतदारसंघात भाजपची ताकदही बरोबरीची आहे.
Amit Deshmukh, Shivaji Kalge
Amit Deshmukh, Shivaji KalgeSarkarnama

Latur Political News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा यात समावेश होता.

लातूरच्या देशमुखांच्या बाबतीतही संशयाचे धुके निर्माण झाले होते. अशोक चव्हाण यांचा अनुभव पाहता लोकांना देशमुखांबाबतची चर्चाही खरी वाटू लागली होती. देशमुखांनी अखेर ती चर्चा खोटी ठरवली.

काही महिन्यांपूर्वी लातूर येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार अमित देशमुख यांचे बंधू अभिनेता रितेश देशमुख यांचे भाषण गाजले होते. एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे त्यांनी राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थितीवर भाष्य केले होते.

राज्याला आज तुमची गरज आहे, पुढाकार घ्या, असे आवाहन त्यांनी अमित देशमुख यांना केले होते. त्यानंतर पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आणि अमित देशमुखांसह त्यांचे काका, माजी मंत्री दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) हेही सक्रिय झाले.

गेल्या सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांमध्ये मरगळ पसरली होती. देशमुख सक्रिय झाल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये उत्साह पसरला आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघातून देशमुख काका, पुतण्यांनी डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे. देशमुखांचा हा निर्णय मास्टस्ट्रोक समजला जात असून, तो भाजपसाठी डोकेदुखीचा ठरला आहे.

भाजपने खासदार सुधाकर श्रृंगारे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. खासदार श्रृंगारे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ते मतदारसंघातील आमदारांना विश्वासात घेत नाहीत, त्यांच्याशी समन्वय ठेवत नाहीत, असे सांगितले जात होते.

त्यामुळे श्रृंगारे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपमध्ये गटबाजी निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे. आता मात्र चित्र बदलत आहे. भाजपने जिल्ह्यातील सर्व आमदारांना श्रृंगारे यांच्या विजयासाठी कामाला लागण्याची सूचना केली आहे. त्यामुळे एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला खेचून घेण्यासाठी देशमुखांची कसोटी लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशमुख काका, पुतण्यांनी ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख याही डॉ. काळगे यांच्यासाठी प्रचारात उतरल्या आहेत.

उमेदवारी देताना जातीय समीकरणांचा विचार सर्वच पक्षांकडून केला जातो, यात आता नावीन्य राहिलेले नाही. डॉ. काळगे (Shivaji Kalge) हे जंगम समाजाचे आहेत. लिंगायत समाजात जंगम गुरुस्थानी असतात.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर (Archana Patil Chakurkar) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशमुखांनी ते आधीच गृहीत धरले असावे.

अर्चनाताई भाजपमध्ये प्रवेश करणार याची चाहूल माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतरच त्यांना लागली असावी. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील (Basavraj Patil) हे शिवराज पाटील चाकूर यांचे मानसपुत्र समजले जातात.

Amit Deshmukh, Shivaji Kalge
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या मैदानात 'या' वाघिणी फोडताहेत पुरुष प्रतिस्पर्ध्यांना घाम!

लिंगायत समाज काँग्रेसपासून दुरावला जाऊ नये, याची काळजी घेत असतानाच विजयाची शक्यता अधिक असलेला उमेदवार निवडण्यास देशमुख काका, पुतण्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

याद्वारे त्यांनी विधानसभा निवडणुकीचीही काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी मतदारसंघात महायुतीची ताकदही बरोबरीची आहे. लातूर शहरचे प्रतिनिधित्व अमित देशमुख, तर लातूर ग्रामीणचे प्रतिनिधित्व त्यांचे बंधू धीरज देशमुख करतात.

अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीरचे आमदार संजय बनसोडे हे अजितदादा पवार गटाचे आहेत. निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपचे आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघाचा लातूर लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून आले असून, ते देशमुखांच्या पाठीशी आहेत.

वंचित बहुजन आघाडीने लातूर मतदारसंघातून नरसिंहराव उदगीरकर यांना रिेंगणात उतरवले आहे. येथे वंचित आघाडीचा फटका महाविकास आघाडीला बसणार की महायुतीला, याबाबत ठोस असे सांगता येत नाही.

2014 च्या निवडणुकीत श्रृंगारे यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांच्यावर 2,89,111 मतांनी विजय मिळवला होता. त्याआधीच्या म्हणजे 2014 च्या निवडणुकीत भाजपचे सुनील गायकवाड यांनी काँग्रसेचे दत्तात्रेय बनसोडे यांचा 2,53,395 मतांनी पराभव केला होता.

या दोन्ही निवडणुकांत काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मते पावणेचार लाखांच्या घरात होती. मतांची ही तूट भरून काढण्यासाठी देशमुख काका, पुतण्या आणि काँग्रसचे उमेदवार डॉ. काळगे यांची कसोटी लागणार आहे.

महागाई, बेरोजगारी हे मुद्दे काँग्रेसच्या मदतीला धावून येणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम कोणावर होतो, याकडेही नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. विजयासाठी जशी काँग्रेसची कसोटी लागणार आहे, त्याचप्रमाणे भाजपलाही ही जागा राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे, हे मात्र निश्चित.

R

Amit Deshmukh, Shivaji Kalge
Solapur Lok Sabha 2024: 'सिद्धेश्वर'ची चिमणी, मोहिते पाटील, निष्क्रीय खासदार, पुन्हा मोदी! सोलापुरात स्वागत आहे..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com