
काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या कोल्हापूर, सोलापूर, सांगली या दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये गेल्या काही वर्षांत भाजपने शिरकाव केला आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये भाजपची ताकद आहे. आता केंद्र व राज्यात सत्ता असल्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत महायुतीचे पारडे जड असून, महाविकास आघाडीसमोर आव्हाने आहेत.
कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाल्यापासून गटातटाचे सुरू असलेले राजकारण गेल्या तीन निवडणुकांमध्ये संपून पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर महायुतीमध्ये गेलेल्या दोन नवीन पक्षांमुळे युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी विभागणी झाली आहे. राज्य, केंद्रातील सत्तेमुळे जिल्ह्यात महायुतीचे पारडे जड असून, महाविकास आघाडीला प्रचंड झगडावे लागणार आहे. नगरपालिकांमध्ये काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांमधून राजकारण केले जाईल, असे दिसते.
कोल्हापूर महापालिकेत गेल्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी नेतृत्व केले. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या मदतीने ती सत्ता खेचण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नव्हते.
महापालिकेतील ८१ प्रभाग कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघांत विभागले आहेत. दोन्हींचे नेतृत्व युतीचे आमदार करत आहेत. त्यामुळे महायुतीकडे भाजपचे खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मुश्रीफ, शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर तर त्याच गटाचे आमदार प्रकाश आबिटकर पालकमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात आघाडीचे काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील यांना उभे ठाकावे लागणार आहे. सत्तेमुळे युतीतील पक्षांकडे इच्छुकांचा ओढा वाढणार आहे.
काँग्रेसमधील माजी पदाधिकारी, नगरसेवक युतीत जातील असे वातावरण आहे. त्यामुळे युतीतील पक्षांना इलेक्टिव्ह मेरीट असलेल्या उमदेवारांची वाणवा नसेल. तुलनेने महाविकास आघाडीला मात्र तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत.
इचलकरंजी महापालिका झाल्यानंतर पहिलीच निवडणूक होत आहे. तिथे भाजपचे माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे वजन मोठे आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, रवींद्र माने, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विठ्ठल चोपडे यांचीही महायुतीला मदत होऊ शकते. त्यांच्याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसकडेच जबाबदारी राहील.
जयसिंगपूर नगरपालिकेतील सत्ता शाहू आघाडीकडे होती. महायुतीचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची ताकद वाढली आहे. पन्हाळा नगरपालिकेत आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाची सत्ता होती.
तिथे स्थानिक आघाड्यांच्या भूमिकेवर लढती स्पष्ट होणार आहेत. कागलमध्ये मुश्रीफ यांची सत्ता होती. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले समरजितसिंह घाटगे यांचे आव्हान असेल. गडहिंग्लजमध्ये जनता दलाने भाजप, शिवसेनेला घेऊन सत्ता स्थापन केली होती. यावेळी महाविकास आघाडी व महायुतीत लढत होण्याची चिन्हे आहेत. वडगावात युवक क्रांती आघाडीची सत्ता होती.
मलकापूरमध्ये जनसुराज्य शक्ती, भाजपची सत्ता होती. दोन्ही ठिकाणी स्थानिक आघाड्यांद्वारेच निवडणूक लढवली जाईल. कुरुंदवाड नगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती. भाजपने स्वतंत्रपणे लढवली होती. हातकणंगलेमध्येही काँग्रेसची सत्ता होती. या निवडणुकीत महायुतीतील पक्षांचे आव्हान असेल.
शिरोळमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी प्रणीत शाहू आघाडीची सत्ता होती. मुरगूडमध्ये शिवसेनेची सत्ता होती. आजऱ्यामध्येही पक्षांबरोबर स्थानिक गटांना महत्त्व आहे. हुपरीमध्ये भाजप, ताराराणी आघाडीची सत्ता होती. या ठिकाणी समीकरणे बदलणार आहेत. चंदगडमध्ये स्थानिक गटांच्या माध्यमातूनच निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.
दहा लाख लोकसंख्येच्या आसपास असलेल्या सोलापुरात लिंगायत समाज व तेलुगु भाषिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के आहे. आज हे दोन्ही समाज भाजपसोबत दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश कोठे यांच्या निधनाने राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापुरात फक्त लेटरपॅड आणि व्हिजिटिंग कार्डपुरताच उरला आहे. काँग्रेसकडे खासदार प्रणिती शिंदे यांच्या रूपाने युवा नेतृत्व आहे, परंतु त्यांची कार्यपद्धती आणि स्वभाव यांमुळे कार्यकर्ते नाराज आहेत. विधानसभेचा निकाल आणि नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतूनही त्यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. त्या फक्त स्वत:च्या निवडणुकीपुरताच विचार करतात, असा आरोप अधिक गडद होऊ लागला आहे.
सोलापूर महापालिकेसह जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, अकलूज (ता. माळशिरस), करमाळा, कुर्डुवाडी, मंगळवेढा, अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ, सांगोला या ११ नगरपरिषदा व अनगर (ता. मोहोळ) नगरपंचायतींमध्ये निवडणूक होईल. बार्शीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत, अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनी नगरपरिषदेच्या माध्यमातून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात तगडा सामना होऊ शकतो.
पंढरपूर नगरपरिषदेत भाजप आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील व मोहोळचे आमदार राजू खरे आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ११ पैकी ५ आमदार भाजपचे, ४ आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, एक शेतकरी कामगार पक्षाचा व एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असल्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे राजकारण सोलापुरात स्थिर करून देण्यात विष्णुपंत कोठे यांचा मोठा वाटा आहे. कोठे परिवार ४० वर्षात महापालिकेच्या राजकारणापलिकडे कधी गेला नाही. सुरुवातीला विष्णूपंत कोठे यांना आमदारकी व खासदारकी मिळेल, अशी समर्थकांना अपेक्षा होती. त्यांना किंवा त्यांच्यानंतर महेश कोठे यांनाही संधी मिळाली नाही.
महेश कोठे यांनी चार वेळा प्रयत्न केले, मात्र अपयश आले. विष्णूपंत कोठे यांचे नातू देवेंद्र कोठे २०२४ मध्ये पहिल्याच प्रयत्नात भाजपकडून आमदार झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी महेश कोठे यांचे झालेले निधन, सोलापुरातील तेलुगु भाषकांचा चेहरा म्हणून आमदार कोठे यांच्या बाजूने सहानभुतीची सुप्त लाट आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपकडे आहेत, तर त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत. मोहिते-पाटील घराणे सध्या भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांच्या जवळ आहे.
अकलूज नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक होणार आहे. मोहिते-पाटलांच्या राजकीय भूमिकेचा परिणाम शेजारच्या नगरपरिषद निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. अकलूजमध्ये मोहिते-पाटील यांना कडवे आव्हान देण्यासाठी भाजपचे माजी आमदार राम सातपुते सज्ज झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे थंड पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या राजकीय हालचालींना गती आली आहे. जिल्हा परिषद व दहा पंचायत समित्यांसह जिल्ह्यातील आष्टा, इस्लामपूर, तासगाव, विटा, जत, पलूस या नगरपरिषदांसह जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणुक होणार आहे.
सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतरची पक्षांतरे यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा आता चांदोली ते जतपर्यंत भाजपच्या प्रभावाखाली आला आहे. तथापि आजही काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मातब्बर नेते आहेत. मात्र त्यांच्यासमोर एकजूट हेच आव्हान असेल. जिल्ह्यात महायुती आणि महाआघाडी अशी थेट लढत होण्याऐवजी स्थानिक स्तरावर तडजोडी होऊन नवी समीकरणे होण्याची शक्यता आहे.
लोकसभेतील पराभवासमोर भाजपने विधानसभेला सांगली, मिरज या दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची कुमकही त्यांच्या सोबतीला आहे. त्यांच्यासमोर सत्तेविना हतबल झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेसमधून निलंबित जयश्री पाटील यांचा गट असा काहीसा सामना असेल. तथापि विरोधकांचे हे असेच चित्र असेल अशी खात्री मात्र आजघडीला देता येत नाही. काँग्रेसच्या बळावर खासदार झालेले विशाल पाटील यांची भूमिकेची खात्री नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात सत्तामहर्षींना आटोक्यात ठेवणे हे भाजपच्या सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे आमदारद्वयींसमोरचे आव्हान असेल.
तासगावच्या होमग्राऊंडवर माजी खासदार संजय पाटील यांच्या गटासमोर पुन्हा एकदा आर.आर. पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने उभा असेल. तासगाव नगरपालिकेत संजय पाटील यांनी अपवाद वगळता आपले वर्चस्व कायम राखले आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सलग दोन पराभवाने ते काहीसे खचले आहेत. आबांच्या पश्चात आता आमदार रोहित पाटील तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरले आहेत.
विटा नगरपरिषदेत पुन्हा एकदा पारंपरिक पाटील-बाबर गटातच खरा सामना असेल मात्र ती नव्या समीकरणांसह. दिवंगत माजी आमदार अनिल बाबर यांच्या पश्चात आमदार झालेले चिरंजीव सुहास इथे शिंदे सेनेच्या झेंड्याखाली लढतील. त्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांची साथ असेल. पारंपरिक वर्चस्व असलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाची धुरा आता एकहाती वैभव पाटील यांच्याकडे आली आहे.
आष्टा नगरपालिकेत दिवंगत विलासराव शिंदे व आमदार जयंत पाटील गटाच्या आष्टा शहर विकास आघाडीची म्हणजेच राष्ट्रवादीची सत्ता होती. येथे पहिल्यांदाच भाजपकडून आव्हान देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र इथे आष्ट्यात शिंदे गट जयंत पाटील यांच्यासोबत की स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट नाही.
येथील निवडणूक जयंतरावांची राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी अशी होण्याची शक्यता अधिक आहे. जयंत पाटील व विलासराव शिंदे गट एकत्र असू शकतील असे सध्याचे चित्र आहे. इस्लामपूर नगरपालिकेत पुन्हा एकदा जयंत पाटील विरुद्ध सर्व विरोधक अशीच लढत असेल. विरोधकांमध्ये आता पुन्हा एकदा निशिकांत पाटील, विक्रम पाटील, आमदार सदाभाऊ पाटील, सम्राट महाडीक,आनंदराव पवार अशी नेत्यांची मांदियाळी असेल.
पलूसमध्ये काँग्रेसची धुरा आमदार विश्वजित कदम यांच्याकडे असेल. विरोधी स्वाभिमानी विकास आघाडीचे संस्थापक बापूसाहेब येसुगडे यांच्या आघाडीचे नेतृत्व आता नीलेश येसुगडे यांच्याकडे असेल. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे अरुण लाड यांचीही इथे भूमिका असेल.
महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत झाल्यास चुरस पहायला मिळेल. जत नगरपालिकेत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेस अशी तिरंगी लढतीची शक्यता आहे. सध्या काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांची सत्ता होती. त्यांना आमदार गोपीचंद पडळकर आव्हान देण्यासाठी नवी जुळणी करतील. अलीकडेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी आमदार विलासराव जगताप कोणती भूमिका घेतात, हे महत्त्वाचे असेल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.