Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभेतील मतांची आघाडी ठरविणार सीमा हिरे यांचे राजकीय भवितव्य?

Seema Hiray News : उमेदवार गोडसे असले तरीही या मतदारसंघात अप्रत्यक्षपणे भाजपच्या आमदार सीमा हिरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Seema Hiray| Hemant Godse
Seema Hiray| Hemant GodseSarkarnama

प्रमोद दांडगाव्हाळ -

Nashik News, 24 May : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीचे खासदार हेमंत गोडसे उमेदवार आहेत. त्यांना प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा (BJP) आहे. या संदर्भात महायुतीने प्रत्येक आमदाराला विशेष रसद पुरवून जबाबदारी दिली होती. लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले.

यामध्ये महायुतीचे खासदार गोडसे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी जोरदार लढत दिली. वाजे यांना हमखास आघाडी देणाऱ्या मतदारसंघात शिवसेनेने नाशिक पश्चिम मतदार संघाचा समावेश केला आहे. शिवसेनेची व्युहरचना यशस्वी झाल्यास त्याचा सगळ्यात मोठा फटका उमेदवार खासदार गोडसे यांना बसेल.

उमेदवार खासदार गोडसे (Hemant Godse) असले तरीही या मतदारसंघात अप्रत्यक्षपणे भाजपच्या आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभा मतदारसंघात ज्याला सर्वाधिक आघाडी मिळेल. तो पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवर दावा करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे गेली दहा वर्ष नाशिक पश्चिम मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सीमा हिरे यांची आमदारकी पणाला लागलेली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात अतिशय टोकदार राजकारण सुरू आहे. यामध्ये भाजपच्या काही नगरसेवकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची कोंडी होऊ शकते. येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात अतिशय मातब्बर नेते आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar), महानगर प्रमुख विलास शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष अविनाश शिंदे, माजी आमदार अपूर्व हिरे, भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, नाना महाले, मनसेचे नेते दिलीप दातीर, बाळासाहेब पाटील, जगन पाटील आदींचा त्यात समावेश आहे. या सर्व नेत्यांचे आपले मतांचे पॉकेट्स आहेत. त्यामुळे येथून हेमंत गोडसे यांना हमखास लीड मिळेल, असा महायुतीच्या नेत्यांचा दावा आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघात यंदा मतदानाचे प्रमाण देखील वाढले आहे. विविध नेत्यांचा सक्रिय सहभाग हे त्याचे कारण आहे. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी अनेक जण बाशिंग बांधून तयार आहेत.

लोकसभेची उमेदवारी हुकलेले दिनकर पाटील यांनी विधानसभेसाठी पक्षाकडून नक्कीच शब्द घेतला असणार. याशिवाय जगन पाटील हे भाजपचे इच्छुक आहेत. त्यामुळे आमदार हिरे यांना उमेदवारीसाठी स्पर्धा करावी लागणार हे स्पष्ट आहे.

महायुतीमध्ये मनसेचा देखील समावेश आहे. या पक्षाचे दिलीप दातीर यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. सीमा हिरे या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून देखील या मतदारसंघावर दावा केला जाण्याची शक्यता आहे.

उपस्थितीत महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष आणि विविध नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, अशा स्थितीत खासदार गोडसे यांना मताधिक्य मिळाले तरी ते कोणामुळे मिळाले यावरून नवाब सुरू होऊ शकतो. त्यामुळे नेत्यांमधील श्रेयवादाचा नवा अंक मतदारांना पाहायला मिळेल.

महाविकास आघाडीचे उमेदवार वाजे यांच्या प्रचाराची धुरा जिल्हाप्रमुख बडगुजर यांच्यावर होती. पक्षाच्या यंत्रणेवर देखील त्यांची चांगली पकड आहे. विधानसभेचे उमेदवार म्हणून ते मतदारांमध्ये चर्चेत आहेत. शिवसेनेला चांगले मताधिक्य मिळाल्यास केवळ बडगुजर यांचा दावाच नव्हे तर, भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान देण्यात ते यशस्वी होतील. मतदारांवर देखील त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकेल.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com