Lok Sabha Election 2024 : आमदार राजू पारवे तरणार, की त्यांचा होणार 'मोहिते' किंवा 'छोटू भोयर'?

Ramtek Lok Sabha Constituency : रामटेकच्या गडावर 'मोहिते' आणि नागपूरच्या टेकडीवर 'भोयर' यांची झालेली 'पंचाईत' दोघांचीही राजकीय कारकीर्द संपुष्टात आणणारी ठरली.
Chotu Bhoyar, Raju Parve and Subodh Mohite
Chotu Bhoyar, Raju Parve and Subodh MohiteSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघावरून आणि त्यातही भाजपच्या उमेदवारीवरून वातावरण पेटले आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या राजकीय इतिहासाची पाने उलटवून बघितल्यास, तितक्याच रंजक, धक्कादायक आणि परिणामकारक घटना घडल्याच्या नोंदी आहेत. आता पुन्हा तशीच नोंद २०२४च्या रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसचे उमरेड येथील आमदार राजू पारवे सध्या महायुतीच्या अर्थात भाजपच्या वाटेवर आहेत. पक्ष वेगळा, चिन्ह वेगळे आणि प्रचारही भलतेच करणार. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत आमदार राजू पारवेंचा 'मोहिते' होणार की, 'छोटू भोयर' होणार, अशी चर्चा सध्या गृहजिल्ह्यात सुरू आहे. कारण रामटेकचा राजकीय इतिहास विसरता येणार नाही. नशिबाने भरभरून दिल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा नशिबानेच घात केला. त्यावेळी पक्ष बदलला नसता किंवा ऐनवेळी विमान चुकले नसते तर आज मोठ्या नेत्यांच्या यादीत त्यांचा समावेश असता.

एक निर्णय चुकल्याने या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत राजकीय अस्तित्वासाठी धडपड करण्याची वेळ मोहितेंवर ओढवली आहे. अशीच परिस्थिती काँग्रेस आमदार राजू पारवेंवर ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुबोध मोहिते राज्य सरकारचे अधिकारी असताना, सन १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांचे ते स्वीय सहायक होते. या दरम्यान मोहितेंचा राजकारणाशी प्रत्यक्ष जवळून संबंध आला. त्यावेळी भाजप नेत्यांशी खटकल्याने शिवणकर बंड करण्याच्या तयारीत होते. मात्र, मोहितेंच्या 'टीप'मुळे हे बंड फसले. या घडामोडीनंतर मोहितेंनी सरकारी नोकरी सोडत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सांगण्यावरून शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेकडून रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरत, सेना-भाजप युतीसह काही काँग्रेस नेत्यांच्या बंडखोरीमुळे मोहिते पहिल्याच प्रयत्नात खासदार झाले. त्यावेळी केंद्रात भाजपची सत्ता असल्याने लागलीच मोहितेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. त्यांची राजकीय गाडी सुसाट असतानाच शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत त्यांचे वाद टोकाला गेले. त्यामुळे मोहितेंनी मंत्रिपदासह खासदारकीचा राजीनामा देत, शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करत, मोहितेंनी रामटेक लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या विरुद्ध दंड थोपटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chotu Bhoyar, Raju Parve and Subodh Mohite
Ramtek Lok Sabha Election : भाजपचा ‘हा’ अट्टहास महागात पडणार, कार्यकर्ते राजीनामे देण्याच्या मनःस्थितीत !

शिवसेनेने माथ्यावर लावलेला ‘गद्दार' हा ठपका मोहितेंना पुसून काढता आला नाही. परिणामी मोहितेंचा दारुण पराभव झाला. त्यासाठी अतिआत्मविश्वासही कारणीभूत ठरला. हा सर्वांसाठीच मोठा धक्का होता. तेव्हापासून मोहिते आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी धडपडत आहेत. विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी मोहितेंना पुन्हा संधी चालून आली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना ताबडतोब दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबईला बोलावण्यात आले. मात्र, त्यावेळी नागपूर ते मुंबई थेट विमानसेवा नसल्यामुळे मोहितेंनी आधी पुणे येथे विमानाने जायचे व तेथून कारने तीन वाजेच्या आत मुंबई गाठण्याचे नियोजन केले. मात्र, दुर्दैव आड आले.

त्याचदिवशी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पुणे येथून दिल्लीला परत जायचे असल्याने सुरक्षेच्या कारणावरून कुठलेच विमान पुण्याच्या विमानतळावर उतरू देण्यात आले नाही. त्यामुळे मोहितेंचे विमान आकाशातच घिरट्या घालत राहिले. पुणे विमानतळावर मोहितेंचे विमान उतरले तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ निघून गेली होती. तेव्हापासून मोहितेंचे रुसलेले नशीब अद्याप फळफळले नाही. काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी त्यावेळी त्यांचा 'गेम' केला? अशी चर्चा आजही आहे. राष्ट्रपतींचे विमान रोखण्यात कोणाचा हात होता, हे अद्याप उघड झाले नाही.

मोहितेंनी नंतर काँग्रेस सोडली. राष्ट्रवादी काँग्रेस, विनायक मेटेंचा शिवसंग्राम, शिवसेना नंतर पुन्हा काँग्रेस असा त्यांचा प्रवास आजही सुरू आहे. सध्या ते अजित पवारांसोबत आहेत. अनेक वर्षांचे अंतर पडल्याने त्यांच्याकडे कार्यकर्ते व समर्थकसुद्धा शिल्लक राहिलेले नाहीत. जितक्या झपाट्याने मोहितेंचा राजकीय आलेख उंचावला होता, त्यापेक्षा दुप्पट वेगाने तो खाली कोसळला हे विशेष. मोहितेंनंतर भाजपचे नागपूर येथील ज्येष्ठ नगरसेवक व संघाचे स्वयंसेवक असलेले छोटू (डॉ. रवींद्र) भोयर यांचा निर्णयसुद्धा चुकला आणि त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येण्यास सुरुवात झाली.

नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत निष्ठावंत छोटू भोयर यांनी भाजपकडे तिकीट मागितली होती. मात्र, पक्षाने पुनर्वसन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट दिली. हीच संधी साधत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराज छोटू भोयर यांना आपल्या गळाला लावले. हुशार आणि संघाच्या तालमीत वाढलेले भोयरसुद्धा पटोलेंच्या गळाला लागले. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या स्वाक्षरीच्या पत्राने छोटू भोयर यांचा काँग्रेस प्रवेश घेत, त्यांना बावनकुळेंच्या विरोधात काँग्रेसने उमेदवारी दिली. प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी छोटू भोयर यांच्या विजयाची जबाबदारी घेतली. त्यामुळे भोयरही कामाला लागले. माध्यमांमध्ये येणाऱ्या खोडसाळ बातम्यांमुळे भोयर यांनाही सुरुवातीला बरे वाटू लागले.

आपणच निवडणूक लढू आणि विजयी होऊ, असा विश्‍वास छोटू भोयर व्यक्त करत राहिले. मात्र, पटोलेंनी ऐनवेळी भाजपमधून उमेदवार आयात केल्याने काँग्रेसमधील कार्यकर्ते दुखावले. नेते नाराज आणि कार्यकर्ते थंड होते. नव्या घरातील प्रवेशामुळे भोयर यांचीसुद्धा वैचारिक घुसमट सुरू झाली. अशातच मतदानाच्या आदल्या रात्री विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी बैठक घेत, छोटू भोयर यांचा प्रवेश चुकीचा असून, ते निवडून येणार नाहीत. आपण आणि आपला काँग्रेस पक्ष तोंडघशी पडू, अशी चर्चा पक्षाच्या वरिष्ठांकडे केली. त्यामुळे मतदानाच्या अवघ्या १२ तासांआधी प्रदेश काँग्रेस कमिटीने आपला उमेदवार बदलवण्याचा निर्णय घेतला. छोटू भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने समर्थन जाहीर केले. त्यामुळे भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले छोटू भोयर एकाकी पडले.

Chotu Bhoyar, Raju Parve and Subodh Mohite
Ramtek Loksabha Constituency Election : ...तर भाजपचे कार्यकर्ते वेगळा विचार करतील, रामटेकमध्ये ‘पोस्ट’ होतेय व्हायरल !

कुणी केला कुणाचा गेम ?

संघाचे स्वयंसेवक आणि भाजपचे निष्ठावान छोटू भोयर यांना फोडून काँग्रेसमध्ये आणल्याचा आनंद नेते साजरा करत होते. तेव्हा भोयर हे ‘स्लिपर सेल’ असून ते काँग्रेसमध्ये आले नाहीत, तर त्यांना पाठवण्यात आले आहे. असे बोलले जात होते. पुढे त्यांची निष्क्रीयता आणि ‘आखडता हात’ बघून काँग्रेस नेत्यांनाही त्याचा अंदाज आला. त्यानंतर नेत्यांनी वेगवान हालचाली सुरू केल्या. तेव्हा छोटू भोयर यांनी काँग्रेसचा ‘गेम’ केला, असे बोलले जात होते. पण ऐनवेळी उमेदवार बदलवून काँग्रेसनेच छोटू भोयर यांचा गेम करून टाकला. या सर्व भानगडीत दोघेही तोंडघशी पडले.

काँग्रेसने समर्थन दिले तरी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख निवडून आले नाहीत. त्‍यामुळे एकमेकांचा गेम केल्याचे समाधान भोयर आणि काँग्रेस नेत्यांमध्ये असू शकते. पण ३४ वर्षे भाजपशी निष्ठावान असलेल्या छोटू भोयर यांना आता भाजप पुन्हा जवळ करेल का? तिकडे काँग्रेसनेही त्यांचा ऐनवेळी हात सोडला. त्यामुळे भोयर यांची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे. रामटेकच्या गडावर 'मोहिते' आणि नागपूरच्या टेकडीवर 'भोयर' यांची झालेली 'पंचाईत' दोघांचीही राजकीय कारकीर्द संपुष्टात आणणारी ठरली. यात मोहिते आणि भोयर यांचा निर्णय चुकला आणि ते फसले. तशीच वेळ आता उमरेडचे आमदार राजू पारवे यांच्यावर येणार का? त्यांचा मोहिते किंवा छोटू भोयर होणार का? या संपूर्ण घटनाक्रमामागे अदृश्य शक्ती तर नाही ना, अशा चर्चांना पेव फुटले आहे.

Edited By : Atul Mehere

R

Chotu Bhoyar, Raju Parve and Subodh Mohite
Ramtek Lok Sabha Election : रश्‍मी बर्वे यांचा रामटेकमधून लढण्याचा मार्ग मोकळा, पण…

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com