Loksabha Election 2024 : प्रचारातून मूळ मुद्दे गायब; विरोधक मोदी, शाहांच्या जाळ्यात अडकले?

I.N.D.I.A Alliance News : ...असे असताना विरोधक मोदी, शाहा यांच्या जाळ्यात अडकून त्यांच्या 'पिच'वर जाऊन खेळतात की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
I.N.D.I.A Alliance
I.N.D.I.A AllianceSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha election campaign : निवडणुकांचा प्रचार हा नेहमीच भरकटत जात असतो, म्हणजे मूळ मुद्दे गायब होतात आणि नको त्या मुद्द्यांवर चर्चा सुरू होते. निवडणुकीचे मुद्दे, प्रचाराची दिशा ठरवण्यात अलीकडच्या काळात भाजपने सर्वांवर मात केली आहे. भाजप आपल्या वाटेल त्या दिशेने प्रचार वळवण्यात बहुतांश वेळा यशस्वी झालेला आहे. भाजपच्या यशाचा आलेख चढता राहण्यात या रणनीतीचा वाटा मोठा आहे.

सीएसडीएसने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात लोक कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर मतदान करणार, हे समोर आले आहे. लोकांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांना सर्वाधिक महत्व दिल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. लोकांचे हेच खरे प्रश्न आहेत. मात्र प्रचारात या मुद्द्यांना म्हणावे तितके स्थान मिळत नसल्याचे दिसत आहे. आपल्याला जे मुद्दे अडचणीचे ठरणार आहेत, त्यावरून लक्ष वळवून प्रचार भावनिक मुद्द्यांवर आणण्यात, विरोधकांची टिंगलटवाळी करण्यात भाजपचा हात कुणीही धरू शकणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

I.N.D.I.A Alliance
Supriya Sule Vs Ajit Pawar : 'काय चुकलं तिचं? भाऊ फितूर झाला; स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला'

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit shah) हे नुकतेच राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी त्यांच्या भाषणांत मूळ मुद्दे बाजूला सारले. अर्थात लोकांनी याला किती महत्व दिले किंवा लोक किती प्रमाणात भुलतील हे निकालानंतर स्पष्ट होईल. असे असले तरी विरोधक मात्र मोदी, शाह यांनी ठरवलेल्या 'पिच'वरच जाऊन खेळतात की काय, असे चित्र दिसत आहे.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची शिवसेना नकली आहे, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस नकली आहे, काँग्रेस अर्धी राहिली आहे, अशी टीका मोदी, शाह यांनी केली. अशा परिस्थितीत तिन्ही पक्ष महायुतीचा पराभव करू शकत नाहीत, असे ते म्हणाले. कोणती शिवसेना नकली किंवा कोणती राष्ट्रवादी नकली हे काही लोकांचे मुद्दे होऊ शकत नाहीत. प्रचंड महागाई, बेरोजगारी, शेतमालाला भाव, पाणीटंचाई हे लोकांचे मूळ मुद्दे आहेत.

हे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना माहीत नाही, असे समजणे म्हणजे शुद्ध वेडेपणाच ठरेल. उलटपक्षी, त्यांना याची पूर्ण जाणीव असल्यामुळेच ते अशा मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष वळवत आहेत. विरोधकही त्याला बळी पडत आहेत. मोदी, शाह यांच्या या टीकेला विरोधकांनी जरूर उत्तर द्यावे, मात्र त्याचवेळी लोकांचे मुद्देही सोडू नयेत.

I.N.D.I.A Alliance
India Politics 2024 : भारतीय राजकारणातील ‘Noob’ कोण? उत्तर देताना मोदींनाही हसू आवरेना

ठाकरेंची शिवसेना नकली, शरद पवारांची राष्ट्रवादी नकली, असे म्हणणे राज्यातील लोकांना रुचेल काय, याची काळजी मोदी, शाह यांना फीडबॅक देणाऱ्या येथील नेत्यांनी घेतलेली दिसत नाही. नेत्यांना आपल्या पक्षात घेणे, ही वेगळी बाब आणि एखादा राजकीय पक्षच फोडून त्याला आपल्यासोबत घेणे, ही पूर्णपणे वेगळी बाब आहे.

भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यामुळे नाही म्हटले तरी लोकांमध्ये नाराजी आहे. पवार, ठाकरेंचे पक्ष नकली म्हणत असताना भाजपसोबत आलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी खरे पक्ष आहेत, असे मोदी, शाहांना म्हणायचे असते. यातून त्यांना अनेक बाबी साध्य करायच्या असतात. शरद पवार, उद्धव ठाकरे यांना डिवचणे, आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवणे या त्या बाबी. महाराष्ट्र यावर कसा व्यक्त होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महागाई, बेरोजगारीचे मुद्दे विरोधकांकडून प्रभावीपणे मांडले जात नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी जागावाटप आणि उमेदवारीवरून नाराजी निर्माण झाली आहे. ती दूर करण्यातच नेत्यांचा वेळ जात आहे. केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी काही कायदे मंजूर केले होते. या कायद्यांना शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध झाला होता. शेतकऱ्यांनी देशव्यापी आंदोलन केले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी ते कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली होती.

I.N.D.I.A Alliance
Lok Sabha Election: मोदी हा चेहरा नाही, तर भुताटकी; संजय राऊतांचं वादग्रस्त विधान, नेमकं काय म्हणाले?

आपल्या निर्णयांवर सदैव ठाम राहणाऱ्या मोदी सरकारसाठी ही मोठी नामुष्की होती. कायदे मागे घेणे म्हणजे सरकारचे अपयशच. या मुद्द्याचा तर विरोधकांना विसरच पडल्याचे दिसत आहे. ना देशात, ना राज्यात, विरोधकांनी कुठेही हा मुद्दा प्रचारात आणलेला नाही. कोरोनाची स्थिती हाताळण्यात भाजपशासित राज्यांना मोठे अपयश आले होते. हा मुद्दाही विरोधकांनी अद्याप प्रचारात आणलेला नाही. विरोधकांना मोदी, शाहा किंवा भाजप नेत्यांच्या वैयक्तिक टीकेला जरूर उत्तर द्यावे, मात्र त्यांच्या जाळ्यात अडकून त्यांच्या 'पिच'वर जाऊन खेळू नये. अन्यथा लोकांचे जीवनमरणाचे प्रश्न बाजूला पडण्याचा धोका आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com