Loksabha Election 2024 : नेत्यांच्या भाषेची घसरणारी पातळी निवडणुकीनंतर वैरभाव कायम ठेवणार..?

Speeches of leaders in elections : गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेत्यांच्या भाषेचा स्तर खालावतो आहे. निवडणुकीच्या निमित्ताने त्यात आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama

Osmanabad Lok Sabha Constituency : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही नेत्यांच्या भाषेचा स्तर राज्यातील नागरिकांनी काळजी करावी इतक्या खालच्या थराला गेला आहे. वैयक्तिक टीकाटिपण्णी तर अस्वीकार्यच असली पाहिजे. याला काही सन्माननीय अपवाद आहेत. असंसदीय भाषा, वैयक्तिक टीका-टिपण्णी, आक्रस्ताळेपणा यामुळे निवडणुकीनंतरही नेते, कार्यकर्त्यांमध्ये द्वेषभाव कायम राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वीची घटना आहे. शिरूर मतदरासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील समोरासमोर आले. त्यावेळी कोल्हे यांनी वाकून आढळराव पाटील यांचे चरणस्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेतला. हे दृश्य मनोहारी असेच होते.

प्रत्येक उमेदवार जिंकण्यासाठीच निवडणूक लढवत असतो. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप हे काही नवीन नाहीत. ते सभ्य भाषेतही केले जाऊ शकतात. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. त्यामुळे भाषा जपून वापरावी, असे संकेत आहेत. या निवडणुकीत हे संकेत पायदळी तुडवले जात आहेत. नेते, कार्यकर्त्यांची मने कलुषित होत आहेत.

Tanaji Sawant
Muslim Reservation : कर्नाटकात मुस्लिम आरक्षण, मोदींचे 'ते' वक्तव्य आणि वस्तुस्थिती

2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातील काही नेत्यांच्या भाषेचा स्तर प्रचंड खालावला. तो कसा खालावत गेला, यावर खरेतर एखादा शोधप्रबंध होऊ शकतो. 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपची युती तुटली. दोन्ही पक्षांसाठी हा फार मोठा धक्का होता. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. सर्वाधिक आमदार असूनही भाजपला सत्तेच्या बाहेर राहावे लागले.

त्यावेळी दोन्ही बाजूंनी जो कलगीतुरा झाला, त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भाषेचा स्तर कधी नव्हे इतका खालावला. तो तसाच वाढत गेला. अडीच वर्षांनी शिवसेनेत फूट पडली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी भाषा, टीकेचा दर्जा आणखी खालावला. तो अद्याप कायम आहे. गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक नवीन शब्दांची भर पडली. त्याची लांबलचक यादी होऊ शकते.

भाषेचा दर्जा घसरण्याचे लोण जिल्हा, तालुका पातळीपर्यंत आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्याची पुन्हा प्रचीती येत आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात तर सुसंस्कृतपणाच्या चौकटी उद्धवस्त होत आहेत. धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत(Tanaji Sawant) हे फटकळपणासाठी ओळखले जातात. यापूर्वी अनेकवेळा त्यांच्या फटकळपणाचा अनुभव राज्याने घेतला आहे. धाराशिव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी 25 एप्रिलला शिवसेनेची बैठक घेतली. त्यानंतर बोलताना त्यांची जीभ घसरली.

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर धाराशिवचे शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांना भोवळ आली होती. त्याचा उल्लेख करत सावंत म्हणाले, की मी 65 वर्षांचा आहे, मला भोवळ येत नाही. मग त्याला (आमदार कैलास पाटील) कशी भोवळ आली? त्याला दिवस वगैरे गेलेत का? दिवस गेलेत याचा अर्थ महिला गर्भवती राहण्याशी आहे.

Tanaji Sawant
Beed Lok Sabha Constituency : राज्याचे लक्ष लागलेल्या बीडमध्ये होतेय 'रंगां'ची मुक्तहस्ते उधळण !

सावंत यांचा सांगण्याचा उद्देश असा होता की खासदार राजेनिंबाळकर(Omprakash Rajenimbalkar) आणि आमदार कैलास पाटील हे सतत नौटंकी करतात आणि त्यांच्या नौटंकीला जनता आता कंटाळली आहे. राजकीय नेते म्हणून अशी टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे, मात्र दिवस गेलेत का, हे मधे आणायची काही गरज होती का? स्त्रीत्वाला कमी लेखण्याची अशी वृत्ती राजकीय नेत्यांनी झुगारून द्यायला हवी. सावंत बोलत होते, त्यावेळी तेथे महिलाही असतील. महिला उपस्थित असतील तर हे ऐकून त्यांना काय वाटले असेल?

धाराशिव मतदारसंघातील प्रचारात एकमेकांचा एकेरी उल्लेख करणे, अरेतुरे करणे आता सामान्य झाले आहे. त्याला प्रेक्षकांकडून टाळ्या, शिट्ट्या मिळतात, हे आणखी चिंताजनक म्हणावे लागेल. विरोधकांसाठी एकेरी भाषेचा वापर करण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार, नेते आणि महायुतीचे नेतेही मागे नाहीत. याला काही नेते अपवाद आहे. सावंत यांनी मात्र कळस चढवला आहे. प्रचारादरम्यान वापरलेल्या भाषेमुळे निवडणुकीनंतर कटुता राहणार नाही, याची काळजी सर्वच नेत्यांनी घ्यायला हवी.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com