Maharashtra Politics: ठाकरे-पवार-पटोलेंच्या वज्रमुठीचा दणका भाजपला विधानसभेच्या निवडणुकीतही बसणार

Maha Vikas Aghadi: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये उत्कृष्ट समन्वय असल्याचे चित्र दिसून आले. मोठ्या यशामागचे हे एक गुपित आहे. आघाडीने असाच समन्वय कायम राखला तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीच्या नाकीनऊ येतील.
Maha Vikas Aghadi
Maha Vikas AghadiSarkarnama

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत उत्कृष्ट समन्वय दिसून आला. त्याच्या बळावरच घवघवीत यश मिळाले. सांगली मतदारसंघात वाद निर्माण होऊनही तिन्ही पक्षांनी संयम बाळगला, त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला नाही. असाच समन्वय विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly) टिकून राहिली तर महायुतीला घाम फोडण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

महाविकास आघाडीतील (MVA) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न होता, कारण आमदार, खासदार, पक्षाचे आणि चिन्हही हिरावले गेले होते. काँग्रेसची परिस्थितीही अशीच होती. दोनवेळेस मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते काँग्रेस सोडून भाजपच्या आश्रयाला गेले होते. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करावी, असे काहीही शिल्लक राहिलेले नव्हते.

अस्तित्व टिकवणे, कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणे हीच कामे त्यांना करायची होती. आपला 'कॉमन' राजकीय शत्रू एकच आहे आणि तो आपल्याला कायमचा संपवायला निघाला आहे, हे तिन्ही पक्षांनी योग्यवेळी ओळखले होते. त्यामुळे तिन्ही पक्षांनी तडजोडी केल्या. याउलट महायुतीत सुरुवातीपासून कुरबुरी झाल्या.

अजितदादा पवार यांचा महायुतीतीतल प्रवेश भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) निष्ठांवत कार्यकर्त्यांना आवडलेला नव्हता. अजितदादांचा उमेदवार असलेल्या उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघात, 'घड्याळाला मतदान कसे करायेच? मोदींसाठी मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागत आहे', अशा शहाजोगपणाच्या पोस्ट काही संघ स्वयंसेवकांनी समाजमाध्यमांवर केल्या होत्या.

Maha Vikas Aghadi
Supriya Sule: घर, पक्ष फोडणारे आता आकडेमोड करताहेत; सुप्रिया सुळेंचा रोख फडणवीसांकडे?

हा शहाजोगपणा त्यांना चांगलाच नडला. त्यामुळे बहुजन समाजात वेगळा संदेश गेला. तसा संदेश अजितदादा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंतही गेला असेल. भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागला. सलग पाचवेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांची उमेदवारी कापावी लागली. शेवटच्या टप्प्यात शिंदे यांनी जोर लावल्यामुळे त्यांना 15 जागा तरी मिळाल्या आणि त्यांचे सात उमेदवार विजयी झाले.

सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसला देण्यात आली. त्याच्या बदल्यात सांगली शिवसेनेला देण्यात आली. तसे करताना आमदार विश्वजित कदम, अपक्ष म्हणून निवडून आलेले विशाल पाटील यांना विश्वासात घेण्यात आले नाही, असे सांगितले जाते.

सांगलीत तसे पाहिले तर शिवसेनेचा विस्तार नाही. त्यामुळे कदम, पाटील यांनी ही जागा सोडवून घेण्यासाठी दिल्लीपर्यंत धाव घेतली, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे मागणी केली, मात्र उपयोग झाला नाही. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पडेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र नेत्यांनी संयम बाळगला. विशाल पाटील निवडून आले, त्यानंतर पुन्हा गोंधळाची शक्यता निर्माण झाली होती. यावेळीही नेत्यांनी संयम बाळगला.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसची एकच जागा निवडून आली होती. त्यात 12 जागांची भर पडली, म्हणजे काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आले. काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. अपक्ष म्हणून विजयी झालेले विशाल पाटील हेही काँग्रेससोबत आल्याने हा आकडा 14 वर गेला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हुरूप आला. त्यांनी लागलीच मुख्यमंत्रिपदाची गणिते मांडली. अर्थात, मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल, असे संकेत त्यांनी दिले. पक्षश्रेष्ठींनी त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.

Maha Vikas Aghadi
Ajit Pawar: राष्ट्रवादीतील एक आमदार 'फितूर'; खुद्द अजितदादांनीच सांगितलं...

महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत यश मिळाले, याची जाणीव करून दिली. नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतरही महाविकास आघाडीत खळखळ झाली नाही. सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर आदींचे नेतृत्व झळाळून निघाले, काँग्रेससाठी चांगले संकेत आहेत. योग्य समन्वय राहिल्यास विधानसभा निवडणुकीतही ही झळाली कायम राहू शकते.

महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार ढोबळमानाने महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळू शकते, हे सध्याच्या चित्रावरून दिसत आहे. तिन्ही पक्षांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केले आहे. या दोन्ही नेत्यांना राज्यात मोठी सहानुभूती आहे. ती विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शरद पवार यांनी माढा मतदारसंघात घडवून आणलेल्या घडामोडी भाजपला घाम फोडणाऱ्या आहेत. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीतही महायुतीला बसणार आहे. तिन्ही पक्षांतील दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून वाटचाल केली तर विधानसभा निवडणुकीतही भाजपसह महायुतीतील पक्षांना घाम फुटेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com