Maharashtra BJP: लोकसभेला दूध पोळले, आता भाजप ताक फुंकून पिणार, की...

Modi Shah Maharashtra Assembly Elections: विधानसभा निवडणुकीतही मोदी, शाह महाराष्ट्रात ठाण मांडणार आहेत. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारणार की पुनरावृत्ती करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Amit Shah narendra modi
Amit Shah narendra modi sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election: निवडणुकीच्या प्रचाराची दिशा राजकीय पक्ष विचारपूर्वक ठरवत असतात. 'नॅरेटिव्ह'ही तशाच पद्धतीने ठरवले जातात आणि त्यांची पेरणी केली जाते. गेल्या काही वर्षांत यात देश आणि राज्य पातळीवरही भाजपने आघाडी घेतली होती. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गेल्या 10-11 वर्षांत पहिल्यांदा असे झाले की भाजपच्या प्रचाराची दिशा चुकली, त्यांचे 'नॅरेटिव्ह बॅकफायर' झाले.

लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात ठाण मांडले होते. मोदी यांनी 18 प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यांच्या जाहीर सभांना प्रचंद गर्दी झाली होती. मात्र परिणाम उलटा झाला. महायुतीच्या जागा कमी झाल्या, भाजपच्या खासदारांची संख्या सिंगल डिजिटमध्ये आली.

महाराष्ट्राचा अंदाज मोदी, शाह यांना आला नव्हता. दोन प्रादेशिक पक्षांची फोडाफोडी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मर्यादा सोडून केलेल्या टीकेला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले होते.

विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुन्हा महाराष्ट्रात ठाण मांडणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या चुका ते दुरुस्त करणार की आपला मूळ अजेंडा पुढे रेटणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांत शिवसेना-भाजपची युती तुटली.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडली. ईडीने काही महत्त्वाचे नेत्यांना तुरुंगात डांबले. जे भाजपच्या बाजूने गेले त्यांची मात्र सुटका झाली. महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी पाहात होता. धार्मिक ध्रुवीकरण केले की लोकांना या सर्व घडामोडींचा विसर पडेल, असा भाजपचा होरा असावा. मात्र तो साफ चुकला होता.

गेल्या पाच वर्षांतील गढूळ राजकारणाचा लोकांना उबग आलेला होता. लोकांनी यासाठी कमी-अधिक प्रमाणात भाजपला जबाबदार धरले होते. ही बाब भाजपच्या लक्षात आली नाही किंवा आली असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महाराष्ट्रात प्रचारासाठी येणाऱ्या भाजप नेत्यांनी धार्मिक ध्रुवीकरणावर भर दिला.

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा केला आणि भाजपचा खेळ खऱ्या अर्थाने येथेच बिघडून गेला. हे सर्व प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे, असा समज लोकांचा झाला आणि भाजपची मोठी पीछेहाट झाली.

Amit Shah narendra modi
Maharashtra Election: भाजप, काँग्रेस बंडखोरीने घायाळ, खानदेशात ३५ पैकी १९ मतदारसंघात बंडखोरीचे पिक!

विधानसभेची निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुतीच्याही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून मोठा जोर लावला जात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 4 नोव्हेंबर रोजी चित्र स्पष्ट होईल आणि प्रचाराच्या तोफा धडाडू लागतील.

भाजप राज्यघटना बदलणार, या 'नॅरेटिव्ह'ने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बेजार करून टाकले होते. सहा महिन्यांनंतर विधानसभेची निवडणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीसारखे वातावरण आता नाही, असे काहीजणांना वाटत आहेत. सहा महिन्यांत वातावरणात फार मोठा बदल होत नाही, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

विधानसभेची रणनीती काय?

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी टीकेची झोड उठवली होती. एकमेकांवर टीका केली जातेच, मात्र पवार, ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी या नेत्यांनी निवडलेले शब्द महायुतीच्या अंगलट आले. मोदी, शाह यांच्यासह भाजपच्या राज्यातील नेत्यांनीही पवार, ठाकरे यांच्यावर तशाच भाषेत टीका केली होती.

त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची रणनीती काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला दूध पोळले आहे, त्यामुळे आता ताकही फुंकून पिणार की पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावरच येणार, यावरच समीकरणे अवलंबून असतील.

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येणार, असे वातावरण होते. तसा असा अंदाज सर्वच एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता, मात्र भाजपने सत्ता कायम राखली. त्यामुळे इकडे महायुतीचा आत्मविश्वास उंचावला आहे. या वाढलेल्या आत्मविश्वासातून महायुतीकडून लोकसभेसारखीच चूक होईल की सुधारणा होईल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Amit Shah narendra modi
हेच ते भाषण ज्यामुळे जरांगेंच्या अडचणी वाढल्या ; बघा काय म्हणाले जरांगे ? | Manoj Jarange Patil |

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com