राज्यात पाच वर्षांपूर्वी नवी राजकीय समीकरणे जुळत होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली होती. त्यावेळच्या राज्यपालांनी घेतलेली भूमिका आणि राज्यात लागू केलेली राष्ट्रपती राजवट आणि नंतर त्यांनी पार पाडलेला बहुचर्चित पहाटेचा शपथविधी हे वादाचे विषय ठरले होते. अशातच आणखी एक गंभीर बातमी समोर आली होती. त्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते, अशी ती बातमी होती.
या फोन टॅपिंगचे आरोप महाराष्ट्र केडरच्या वरिष्ठ आय़पीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांच्यावर झाले होते. शुक्ला या फडणवीस यांच्या निकटवर्तीय आहेत, असे सांगितले जाते. फडणवीस मुख्यमंत्री असताना रश्मी शुक्ला यांची राज्य गुप्तचर विभागाच्या पोलिस आयुक्तपदी नेमणूक झाली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या गंभीर आरोपाला निवडणूक आयोग आणि सरकारनेही दाद दिली नाही. त्यामुळे आणखी एक नॅरेटिव्ह सेट करण्याची संधी महाविकास आघाडीला मिळाली आहे. रश्मी शुक्ला पोलिस महासंचालक असल्याने निवडणूक प्रकिया पारदर्शक होणार नाही, हे ते नॅरेटिव्ह.
रश्मी शुक्ला या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. शुक्ला या भाजपच्या एजंट असल्याप्रमाणे काम करतात, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. शुक्ला या 1996 ते 1999 दरम्यान नागपूर ग्रामीणच्या पौलिस अधीक्षक, तर 1999 ते 2002 पर्यंत नागपूरच्या पोलिस उपाय़ुक्त होत्या. फडणवीसांच्या काळात त्या पु्ण्याच्या पोलिस आयुक्त बनल्या, त्यामुळे त्या फडणवीस यांच्या निकटवर्तीय आहेत, अशी चर्चा सुरू झाली.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दोन-तीन महिन्यांतच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप केला होता. फडणवीस यांनी तो आरोप फेटाळून लावला होता. पूर्वीच्या सरकारने स्पायवेअर पेगाससचा वापर करून अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली होती, पेगासस घेण्यासाठी अधिकारी इस्त्रायलला गेले होते का, याची चौकशी करणार असल्याचा इशारा त्यावेळी देशमुख यांनी दिला होता.
सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी फेब्रुवारी 2020 मध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी फोन टॅपिंगची तक्रार दिल्याचे देशमुखांनी सांगितले होते. फोन टॅपिंगप्ररकणी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात अखेर पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
2015 ते 2019 दरम्यान झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणांची पडताळणी करण्याचा निर्णय राज्य विधीमंडळाच्या 2021 च्या पावसाळी अधिवेशनात घेण्यात आला आणि तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. समितीने शासनाला अहवाल दिला होता. त्यानुसार पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर या प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट मिळाली.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि महायुतीचे सरकार आले. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. विरोधकांनी इतके गंभीर आरोप केल्यानंतरही सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आणि रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय आहेत, या 'परसेप्शन'ला बळकटी मिळाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगासमोरही गाऱ्हाणे मांडले, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
रश्मी शुक्ला या पोलिस महासंचालक पदावर असल्यामुळे विधानसभा निवडणूक निपःक्षपातीपणे होणार नाही, असे विरोधकांना वाटत आहे. विरोधकांनी गंभीर आक्षेप घेतलेले असतानाही निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली नाही. विरोधक कसे चूक आहेत, त्यांच्या आरोपांत तथ्य नाही, असा बचाव सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून केला जाऊ लागला आहे आणि हाच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे. आमचे फोन आजही टॅप होताहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही रश्मी शुक्ला यांच्यावर आक्षेप घेतला आहे. सरकार, निवडणूक आयोगाकडून त्याला दाद मिळेनाशी झाली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना महायुती सरकारच्या विरोधात आणखी एक नॅरेटिव्ह तयार करण्याची संधी मिळाली आहे. रश्मी शुक्ला या पोलिस महासंचालक असल्याने निवडणूक निपःक्षपातीपणाने होणार नाही, असे ते नॅरेटिव्ह आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे त्या नॅरेटिव्हला बळ मिळत आहे. विरोधकांनी गंभीर आक्षेप घेतले की संबंधित अधिकाऱ्याला बदलले जाते. रश्मी शुक्ला यांच्याबाबतीत मात्र सरकारने ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते रश्मी शुक्ला यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.