Maharashtra Politics: मानलं बुवा... आपले राजकीय नेते तर 'शेक्सपियर'पेक्षाही जास्त हुशार!

Maharashtra Assembly Election 2024 : विरोधकांच्या मतांमध्ये फाटाफूट करण्यासाठी राजकीय नेते खेळी करत असतात. त्यातूनच नामसाधर्म्य असणारे उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्कल लढवली जाते. नावात काय आहे, असा संवाद जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपीयर यांनी एका नाटकात त्यांच्या पात्राच्या तोंडी घातला होता. नावात सर्वकाही आहे, हे शेक्सपियर यांना कळले नव्हते, आपल्या नेत्यांना मात्र ते कळले आहे.
Mahayuti | Mahavikas Aaghadi | William Shakespeare
Mahayuti | Mahavikas Aaghadi | William ShakespeareSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : जगप्रसिद्ध लेखक, नाटककार विल्यम शेक्सपियर यांनी त्यांच्या 'रोमिओ अँड ज्युलिएट' नाटकात ज्युलिएटच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ''what is in name? That which call a rose, by any other name would smell as sweet'' ज्युलिएट असे रोमिओला सांगत आहे. नाव हे फक्त नाव असते, त्याला काही अर्थ नसतो, असे तिला म्हणायचे आहे. ती एका माणसावर असलेले तिचे प्रेम व्यक्त करत आहे. हे प्रेम त्या माणसावर आहे, तो कोणत्या कुटुंबातून आला त्याच्या नावावर नाही.

यावरून आपल्याला असे म्हणता येईल की शेक्सपियरला नावाचे माहात्म्य कळलेले नव्हते. त्या काळात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या असत्या तर शेक्सपीयरने ज्युलिएटच्या तोंडी हे वाक्य घालण्यापूर्वी दहावेळा विचार केला असता. हा कल्पनाविलास मानला तरी नावात काय आहे, हे शेक्सपियरचे त्या नाटकातले दोन व्यक्तींमधील प्रेमाच्या संदर्भाने आलेले विचार राजकारणात लागू होत नाहीत. नावात खूप काही असते, हे वाक्य राजकारणात लागू होते.

विधानसभेच्या निवडणुकीत काही मतदारसंघांत नामसाधर्म्य असलेले दोन किंवा तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) विजयाचे अंतर लोकसभेप्रमाणे मोठे नसते. बहुतांश मतदारसंघातील उमेदवार 5 ते 10 हजार मतांच्या फरकाने विजयी होतात. या निवडणुकीतही काही मतदारसंघांत एकाच नावाचे एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना धडकी भरली आहे. सारख्याच नावांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, हा असे उमेदवार रिंगणात उतरवण्यामागचा हेतू असतो.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघामुळे हा मुद्दा आता प्रामुख्याने चर्चेत आला आहे. येथून शिवसेनेने आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गणेश धात्रक यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली आहे. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.

Mahayuti | Mahavikas Aaghadi | William Shakespeare
Maharashtra Assembly Election: नात्यात राजकारण..! 'आमदारकी'साठी कुठे पती-पत्नी तर कुठे बाप-लेक झुंजणार

नांदगाव मतदारसंघातून सुहास बाबूराव कांदे या नावाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. समीर भुजबळ यांच्या बंडखोरीमुळे आधीच अडचणीत आलेले सुहास कांदे हे त्यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारामुळे हैराण झाले आहेत. गणेश धात्रक नावाच्या आणखी एकाने अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचीही अडचण वाढली आहे.

नांदगावपाठोपाठ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातही सारख्याच नावाचे एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे महेश शिंदे यांच्यात लढत होत आहे. अन्य तीन उमेदवार असे आहेत जे प्रमुख उमेदवारांशी नामसाधर्म्य राखतात. महेश सखाराम शिंदे, महेश किसन शिंदे आणि शशिकांत जगन्नाथ शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

करमाळा मतदारसंघातून आमदार संजयमामा शिंदे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. संजय लिंबराज शिंदे आणि संजय वामन शिंदे या दोघांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून अभिजित पाटील नावाच्या अन्य चारजणांनीही अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.

लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात नामसाधर्म्यावरून खळबळ माजली होती. भाजपकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार रिंगणात होत्या. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे होते. भगरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारा एक उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात राहिला होता. भास्कर बाबू भगरे असे त्यांचे नाव.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे हे पेशाने शिक्षक. अपक्ष भगरे यांच्या नावासमोर सर असे विशेषण लावण्यात आले. या अपक्ष भगरे यांना तब्बल 1,03,632 मते मिळाली. राष्ट्रवादीचे भास्कर भगरे 5,77,339 मते मिळवून विजयी झाले. त्यांना 1,13,199 इतके मताधिक्य मिळाले. भारती पवार यांना 4,64,140 मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात कांद्याचा प्रश्न केंद्रस्थानी आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भगरे यांचे निभावून गेले.

Mahayuti | Mahavikas Aaghadi | William Shakespeare
Shivraj Patil Chakurkar : ...अखेर शिवराज पाटील चाकूरकरांनी सुनबाईंनाच दिला आशीर्वाद, म्हणाले...

उमरगा -लोहारा विधानसभा मतदारसंघात 1999 आणि 2004 च्या निवडणुकीतही उमेदवारांच्या सारख्याच नावांवरून मतदारांचा गोंधळ उडाला होता. या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेने प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधाच तशाच नावाचे दोन उमेदवार दोन्ही निवडणुकांमध्ये उभे होते. 1999 मध्ये प्रा. गायकवाड यांचा पराभव झाला. 2004 मध्ये ते विजयी झाले होते. 1999 मध्ये त्यांचा पराभव सारख्याच नावाच्या उमेदवारामुळे झाला, असे म्हणता येणार नाही, मात्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

कवठेमहंकाळ मतदारसंघात कै. आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याशी नामसाधर्म्य असणाऱ्या तीन उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. तोपर्यंत अशा उमेदवारांची मनधरणी केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com