
अभय सुपेकर
उत्तर महाराष्ट्रावर महायुतीची मांड पक्की झालेली आहे. तथापि सत्तेची हवा डोक्यात जाऊ न देता महायुती आणि पराभवातून धडा घेत महाविकास आघाडी किती वेगाने सावरून पुन्हा उभारी घेऊन कामाला लागते, यावर त्यांचे येथील भवितव्य अवलंबून असेल. महायुतीने पद्धतशीरपणे राबवलेली प्रचारयंत्रणा आणि त्यांच्या सरकारने चार महिन्यांत घेतलेले अनेक कल्याणकारी निर्णय जनता जनार्दनाच्या पसंतीला उतरले.
राज्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागले. महायुतीने 35 पैकी 33 जागा पटकावत लोकसभेत दिसलेली महाविकास आघाडीची लाट पूर्णपणे ओसरल्याचे सिद्ध केले. लोकसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिंडोरी, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नाशिक, काँग्रेसने धुळे व नंदुरबार मतदारसंघ जिंकले होते.
भाजपचा बालेकिल्ला जळगाव मात्र अभेद्य राहिला; या जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने पटकावल्या होत्या. यावेळी त्याच राष्ट्रवादीला (शरद पवार) आणि ठाकरेंच्या शिवसेनेला एकही जागा मिळवता आलेली नाही. ‘एमआयएम’ गतवेळच्या दोनपैकी केवळ मालेगाव मध्यची जागा कशीबशी राखू शकली, त्यांचे मौलाना मुफ्ती महंमद इस्माईल केवळ 175 मतांनी निवडून आले.
महायुतीने पद्धतशीरपणे राबवलेली प्रचारयंत्रणा आणि त्यांच्या सरकारने चार महिन्यांत घेतलेले अनेक कल्याणकारी निर्णय जनता जनार्दनाच्या पसंतीला उतरले. विशेषतः लाडकी बहीण, शेतकरी सन्मान, विविध समाजघटकांसाठी जाहीर केलेली महामंडळे, रोजगारनिर्मितीसाठी युवादूतसह उचलेली इतर पावले, त्यांना भत्ता देणे, शासन आपल्या दारीसारख्या उपक्रमातून प्रशासकीय कामांचा केलेला निपटारा या सगळ्याला मतदारराजाने साथ दिली. युवक, महिला आणि शिक्षित वर्गाची साथ सत्ताधाऱ्यांना मिळाली.
'बटेंगे तो कटेंगे' आणि 'एक हैं तो सेफ हैं' हा दिलेला नारा जातीय ध्रुवीकरणाऐवजी धार्मिक ध्रुवीकरण व एकवटीकरण करणारा ठरला. महायुतीतील राष्ट्रवादीसह भाजपमधील काही नेत्यांनी या मुद्दांना विरोध केला होता, तथापि त्यानेच मते खेचण्याचे काम केले, हे खरे. एकुणात सर्वच मतदारसंघात सरासरी सहा ते दहा टक्क्यांचा वाढलेला मतटक्का चित्र बदलणारा ठरला. विविध अभियान, जनजागृती अशा उपक्रमांद्वारे अस्मितेला आव्हान करणारी ठिकठिकाणी शेकडो छोटी-मोठी व्याख्याने. त्याद्वारे ‘एक हैं तो सेफ हैं’, या नाऱ्याला पूरक वातावरणनिर्मिती करून मते वळवण्याचाही कार्यक्रम झाला.
उत्तर महाराष्ट्रात मविआचे चार खासदार आणि महायुतीचे 33 आमदार असे विरोधाभासी चित्र आहे. आजच्या घडीला हे चित्र चक्रावणारे आहे. आगामी काळात महायुती व मविआ यांच्यात कुरघोडीचे राजकारण वाढण्याचीच शक्यता आहे. महापालिकांसह नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्या आखाड्यात याचे प्रतिबिंब उमटणार हे निश्चित! नाशिक, मालेगाव, धुळे व जळगाव अशा चार महापालिका या भागात आहेत. पराभवाच्या धक्क्यातून आघाडी कितपत सावरते, पुन्हा उभारी कसे घेते, यावर खूप अवलंबून असेल.
विजयाने हुरळलेले सत्ताधारी महायुतीचे आमदार किती प्रभावीपणे काम करतील, त्यावर पुढील दिशा स्पष्ट होईल. शिवसेनेचा नाशिकरुपी बालेकिल्ला या निकालाने नेस्तनाबूत झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय जादूची कांडी फिरवतात, यावरच त्यांचा करि्ष्मा येथे चालेल की नाही, हे ठरेल. राष्ट्रवादीचे (शरद पवार) भास्कर भगरे आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) राजाभाऊ वाजे हे मविआचे खासदार नेतृत्व किती पणाला लावतात, तळागाळात पोहोचून पुन्हा नवचैतन्य कितपत निर्माण करतात, यावर खूप अवलंबून असेल.
आजच्या घडीला तरी मजबूत महायुती आणि लेचीपेची महाविकास आघाडी असे चित्र आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते विखुरलेले आहेत. नंदुरबारमध्ये पक्षाने आयातीत उमेदवारांना ऐनवेळी रिंगणात उतरवले. त्यामुळे पक्षांतर्गत विरोध आणि नाराजी दोन्हीही सोसावे लागले. त्यातून काँग्रेस किती धडा घेते, त्यासाठी धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव किती प्रयत्न करतात आणि यंत्रणा राबवतात, यावर त्या पक्षाचे उत्तर महाराष्ट्रातील अस्तित्व दिसून येईल. महायुती सर्वार्थाने बळकट आहे. तथापि, दणदणीत विजय त्यांचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते कितपत जनहितासाठी, दिलेला शब्द पाळण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी वापरतात, हे महत्त्वाचे असेल.
लोकसभेवेळी कांद्याच्या प्रश्नाने उग्र रुप धारण केले होते. त्याची किंमत महायुतीने मोजली. कांदा, सोयाबीन, कापूस, केळी उत्पादकांसह फळबागाधारकांचे प्रश्न खूप आहेत. सिंचनाचे रखडलेले प्रकल्प, पायाभूत सुविधांच्या कामांच्या कार्यवाहीची कूर्मगती, रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकीकरण, एमआयडीसींचे बळकटीकरण करणे आणि रोजगारनिर्मितीच्या विविध प्रकल्पांच्या केलेल्या घोषणा कितपत कार्यवाहीत आणतात, यावर महायुतीची आगामी वाटचाल ठरेल. त्यामुळेच महायुती आणि महाविकास या दोघांना आत्मपरीक्षण करून विकासकामांचे अग्रक्रम ठरवून कार्यवाहीला लागेल, एवढेच खरे.
- तीन जिल्ह्यांतील विधानसभेच्या 42 पैकी महायुतीला तब्बल 36 जागा मिळाल्या.
- महाआघाडीला अवघ्या चार जागा.
- स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिका निवडणुकांवर या निकालाचे दूरगामी परिणाम
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.