Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या वादाला काही काळासाठी पूर्णविराम मिळाला, असे वाटत असतानाच आता जागावाटपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. ठाकरे गटाने 140 जागांवर दावा केल्याचे सांगितले जात आहे. त्यापाठोपाठ काँग्रसनेही 130 जागांवर दावा केल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात विधानसभेच्या 388 नव्हे 288 जागा आहेत, हे ठाकरे गटाला कुणीतरी सांगायला हवे. महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांना काही मित्र पक्ष आणि अपक्षांनाही सामावून घ्यावे लागणार आहे. याचा विसर या पक्षांना पडल्याचे चित्र दिसत आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसने दावा केलेल्या जागांची संख्या 270 होते. मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काय करायचे? अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आघाडी, युतीतील पक्ष जास्त जागांवर दावा करत असतात. दावा केला म्हणून तितक्या जागा मिळतात, असेही नाही. मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसच्या दाव्यांमुळे या दोन्ही पक्षांत आणि महाविकास आघाडीतही तणाव निर्माण निर्माण झाला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील मतदारांनी महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला. त्यामुळे खरेतर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये समंजसपणा येणे अपेक्षित होते, मात्र हे दोन्ही पक्ष करत असलेल्या दाव्यांमुळे त्यांच्यात अतिआत्मविश्वास निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीत एकजूट राहिली तर मतदार पाठिशी राहणार, असाही एक संदेश त्या यशामागे होता. मात्र आता या दोन्हा पक्षांकडून केल्या जात असलेल्या अवास्तव दाव्यांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्याला काय करायचे आहे आणि कसे करायचे आहे, याबाबत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षालाच उत्तम जाणीव असल्याचे आणि त्या पक्षाची वाटचाल त्याच दिशेने सुरू असल्याचे दिसत आहे. उर्वरित दोन्ही पक्ष, म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटाला एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच अधिक रस असल्याचे दिसत आहे. राजकारण कसे करायचे असते, सर्वकाही संपलेले असतानाही शांतपणाने उसळी कशी घ्यायची असते, हे या दोन्ही पक्षांनी शरद पवार यांच्याकडून शिकायला हवे.
जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका झाल्या, मात्र काही जागांवरून तिढा कायम राहिला आहे. हा तिढा घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्ली गाठली आहे. या नेत्यांनी समंजसपणाने हा तिढा येथेच सोडवला असता तर ते आणखी फायदेशीर ठरले असते. 288 पैकी 150 जागांवरील तिढा सुटला असल्याची माहिती आहे. उर्वरित जागांवरील तोडगा राज्यात निघत नसल्यामुळे काँग्रेसचे नेते दिल्लीला गेल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आम्हाला अमुक जागा हव्यात, अशी मागणी केल्याचे किंवा अवास्तव जागांची मागणी केल्याचे अजून तरी समोर आलेले नाही. लोकसभेला या पक्षाने सर्वात कमी 10 जागा लढवल्या होत्या आणि 8 जिंकल्या होत्या. या पक्षाचा 'स्ट्राइक रेट' सर्वाधिक आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्याला जिंकता येतील अशाच जागा हेरल्या होत्या आणि ताकदीचे उमेदवार निवडले होते. विधानसभा निवडणुकीतही त्यांची रणनिती अशीच दिसून येत आहे. त्यामुळे या पक्षाचे काम शांतपणे सुरू आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेसच्या तुलनेत ग्राऊंडवर शरद पवार यांच्या पक्षाचे काम उजवे दिसत आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तिसऱ्या की चौथ्या दिवशीच शरद पवार बाहेर पडले होते. ते सक्रिय झाल्यामुळे त्यांच्या पक्षात इनकमिंग वाढले आहे. हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सत्ता कायम राखली. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षातील इनकमिंग कमी होईल, असे वाटत होते, मात्र तो अंदाज खोटा ठरला.
महाविकास आघाडीला निवडणूक जिंकायची असेल तर ठाकरे गट आणि काँग्रेसलाही शरद पवार यांच्याप्रमाणेच काम करावे लागेल. महाविकास आघाडीत शरद पवार आहेत, ही ठाकरे आणि काँग्रेससाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे, हे लोकसभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे. जागांच्या अवास्तव मागणीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. ठाकरे गटाची 140 जागांची मागणी पूर्ण होणार नाही, हे सांगण्यासाठी कोणाही राजकीय विश्लेषकाची गरज नाही. काँग्रेसच्या मागणीबाबतही तसेच आहे. अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठीच्या अवास्तव मागणीमुळे फायदा होणार नाही, हे ठाकरे गटाने लक्षात घ्यायला हवे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.